पुणे : स्टीलच्या झाऱ्याने मारहाण करत पत्नीची हत्या

पुणे – पतीने पत्नीस स्टीलच्या झाऱ्याने मारहाण करत डोके जमिनीवर व भिंतीवर आपटून हत्या केली. तसेच भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीस व मुलासह जबर मारहाण केली. घरी उशीरा आलेल्या मुली व मुलाला घरात घेतल्याच्या कारणावरुन रागाच्या भरात हे कृत्य करण्यात आले. याप्रकरणी पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुधा रवी केसरी (45, रा. चव्हाण कॉम्पलेक्‍स गृहरचना संस्था मर्यादीत, धनकवडी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा पती रवी नंदलाल केसरी (55) याला अटक करण्यात आली आहे. संदिप रवी केसरी (24) याने फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी संदिप व त्याची बहिण बुधवारी घरी आल्यावर त्याला सुधा यांनी घरात घेतले. याचा राग रवी यांना आल्याने त्यांनी सुधा यांच्याशी भांडणे केले. रागाच्या भरात त्यांनी सुधा यांच्या डोक्‍यावर स्टीलच्या मोठ्या झाऱ्याने मारहाण केली. तसेच त्यांचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटले. भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या संदिपला हाताने मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या हाताचा चावा घेण्यात आला. तर, त्याच्या बहिणीचे डोके काचेवर आपटून तीलाही मारहाण करण्यात आली.

मारहाणीत सुधा यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपी रवी याने घरातून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर तात्काळ घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सहायक पोलीस निरीक्षक सी. एम. सुर्यवंशी, एस. पी. यादव, पोलीस उपनिरीक्षक पी. वा. ताटे यांनी भेट दिली. दरम्यान रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपीस जेरबंद करण्यात आले.

यासंदर्भात झोन 2 चे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले की, आरोपीचा स्वभाव रागिट होता. बुधवारी रात्री मुलगा व मुलगी बाहेर गेले होते. ते उशीरा घरी आल्याने त्यांना घरात घ्यायचे नाही, असे त्याने पत्नीला बजावले होते. मात्र पत्नीने दार उघडून दोघांनाही घरात घेतले. याचा राग मनात धरुन त्याने प्रथम मुलांना व पत्नीला मारहाण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)