‘स्टार प्रवाह’ वाहिनीची दशकपूर्ती

प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देण्याच्या हेतूने स्टार प्रवाह वाहिनी उदयास आली आणि बघता बघता १० वर्ष झाली… मनोरंजनाचा हा प्रवाह गेली १० वर्ष अखंडपणे सुरु आहे तो प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच. रसिक प्रेक्षकांचं निर्व्याज प्रेम हाच या प्रवाहाचा श्वास. या दहा वर्षात प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि घरातल्या कुटुंबाचा सदस्य वाटणारी पात्र स्टार प्रवाह या वाहिनीने दिली. त्या पात्रांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं आणि त्यामुळेच दहा वर्षांचा हा टप्पा गाठणं शक्य झालं. नवनवे प्रयोग करण्याचं बळ मिळाल्यामुळेच ‘विठुमाऊली’ सारखी पौराणिक मालिका करण्याचं शिवधनुष्य स्टार प्रवाहने उचललं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाची गोष्ट मालिकेच्या रुपात पहिल्यांदाच उलगडली आणि घरबसल्या लाडक्या विठ्ठलाचं प्रेक्षकांना दर्शन होऊ लागलं. अठ्ठावीस युगं विठेवर उभ्या असणाऱ्या या दैवताची साथ देणारी रखुमाई प्रत्येक गृहिणीचा आदर्श आहे. “तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालंना…एकल्या विठुरायाला हो संसार पेलंना…”या ओळीच खरतर खूप काही सांगून जातात. रुक्मिणीशिवाय विठ्ठल अपूर्ण आहे. स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाकं असली तरी संसार रथाचा तोल सावरला जातो तो स्त्रीमुळेच. रुक्मिणीची असंख्य रुपं दररोज आपल्या अवतीभवती वावरत असतात. कधी मुलीच्या, कधी बहिणीच्या, कधी पत्नीच्या तर कधी आईच्या रुपात.

स्टार प्रवाहवरील मालिकांमधून स्त्रीची हीच वेगवेगळी रुपं पाहायला मिळतात. ‘कर्ता पुरुष नाही, तर कर्ती स्त्री’ असं ठमकावून सांगणारी ‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा प्रत्येकालाच प्रेरित करते. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेणारी मधुरा परिस्थीतीपुढे मात्र कधीच झुकत नाही. समोर येणारं प्रत्येक आव्हान स्वीकारुन ती स्वाभिमानाने लढा देते. मधुराची हिच जिद्द आज कित्येक तरुणींना लढण्याचं नवं बळ देतेय.

‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवती म्हणजे आदर्श सून आणि आदर्श पत्नी यांचा उत्तम मिलाफ. श्रीमंत कुटुंबात वाढलेली रेवती लग्न होऊन देशमुखांच्या घरात आली. श्रीधरची परिस्थीती गरीब असली तरी मोठ्या मनाची रेवती त्यात सामावून गेली. आता तर संसारासोबतच रेवतीने शिक्षणाचा ध्यासही घेतलाय. इच्छेपुढे आभाळही ठेंगणं असतं. स्त्री शिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंबाला ती योग्य दिशा देऊ शकते. त्यामुळेच तर लग्नानंतरदेखिल रेवती म्हणजेच ‘छोटी मालकीण’ आपलं शिक्षिका होण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे. लग्नानंतर संसारातच अडकून न राहता आपले छंद आपल्या आवडी-निवडी प्रत्येक स्त्रीने जपायला हव्यात याचा आदर्श रेवतीने घालून दिलाय.

‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा म्हणजे कर्तृत्ववान स्त्रीचं चालतं-बोलतं उदाहरण. पेशाने डॉक्टर असणारी नेहा घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना कुठेही कमी पडत नाही. घर-संसारासोबतच आपलं ध्येय गाठणं आणि समाजात स्वत:ची ओळख निर्माण करणं किती महत्त्वाचं आहे याचं पुरेपुर भान तिला आहे. परी आणि अक्षयला तिने जन्म दिला नसला तरी पोटच्या मुलांप्रमाणे ती त्यांचा सांभाळ करते. म्हणूनच तर आई ते यशस्वी डॉक्टर हा मेळ साधणं तिला उत्तमरित्या जमलंय. संसार आणि स्वकर्तृत्व यांचा मेळ साधणाऱ्या असंख्य स्त्रियांचं नेहा प्रतिनिधित्व करते.

‘ललित २०५’ मालिकेतील भैरवी म्हणजे जुन्या नव्या विचारांमधला दुवा. नव्यासोबतच जुन्या रुढी, परंपरा जपणं तिला महत्त्वाचं वाटतं. विखुरलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी भैरवीचे अखंड प्रयत्न सुरु आहेत. यासोबतच घरातल्या थोरामोठ्यांचा सन्मान भैरवीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सासू-सुनेच्या नात्याला तिने मैत्रीचं कोंदण दिलंय. सासु-सुनेचं हेच मैत्रीपूर्ण नातं नव्या बदलांची नांदी म्हणता येईल.

विविधरंगी नात्यांची गुंफण सांधणारी स्टार प्रवाह ही वाहिनी म्हणूनच तर गेली १० वर्ष प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)