स्कॉर्पिओ कालव्यात कोसळून चालकाचा मृत्यू

दावडी येथील दुर्घटना ः चासकमान धरणातून पाणी सोडल्याने कालवा तुडुंब
राजगुरुनगर  -दावडी (ता. खेड) येथील दावडी ते धामणटेक रस्त्यावरील गाडगेवस्तीजवळ स्कॉर्पिओ गाडी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कालव्यात कोसळून वाहनचालक पिंटू उर्फ राजेंद्र धनाजी गव्हाणे (वय 40) याचा पाण्यात बुडून गाडीतच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारस घडली आहे.
याबाबतची माहिती अशी की, आज मंगळवारी (दि. 29) सकाळी सव्वानऊच्या सुमारास राजेंद्र गव्हाणे हा गव्हाणेवस्ती येथील त्यांच्या घरातून स्कॉर्पिओ गाडी (एमएच 14 -2052) घेऊन दावडी येथे गव्हाचे कट्टे आणण्यासाठी निघाला होता. गाडी गाडगेवस्तीजवळ असलेल्या चासकमान कालव्यावरील पुलाजवळ आली असता राजेंद्रचा गाडीवरील ताबा सुटून गाडी सुमारे 40 फूट खोल चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यात कोसळली. चासकमान डाव्या कालव्यातून 550 क्‍युसेक वेगाने आवर्तन सुरू आहे. त्यामुळे कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.
वाहनचालक पिंटू उर्फ राजेंद्र धनाजी गव्हाणे स्कॉर्पिओ गाडीसह पाण्यात पडल्याने गाडीसह बुडाला. जवळच शेतात काम करणाऱ्या महिलेने गाडी कालव्याच्या पाण्यात पडल्याचे पाहिल्यामुळे त्या महिलेने जवळच असलेल्या गाडगेवस्तीमधील तरूणांना आवाज देऊन मदतीसाठी बोलावले. स्थानिक तरूणांनी लगेचच धावपळ करून दोर आणून पाण्यात बुडालेल्या गाडीस दोर बांधले; परंतु पाण्याचा वेग जास्त असल्याने तरूण पाण्याबरोबर वाहून जात होते. मात्र तरीही काही तरूणांनी पाण्यात बुडी मारून गाडीस दोर बांधले. तोपर्यंत काही जणांनी ट्रॅक्‍टर आणल्यावर ट्रॅक्‍टरचे सहाय्याने व स्थानिक तरूणांनी दोराचे सहाय्याने अपघातग्रस्त गाडी पाण्याबाहेर आणण्यात यश मिळवले. जवळच असलेल्या ‘खेड एसईझेडमधील’ मदतकार्य पथक घटनास्थळी हजर झाले होते, तोवर गाडी पाण्याबाहेर काढण्यात आली होती. गाडी पाण्याबाहेर आल्यावर काचा फोडून राजेंद्र याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह दोरीने बांधून व तरूणांनी उचलून कालव्याबाहेर काठावर आणण्यात आला. अपघातग्रस्त स्कॉर्पिओ क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली. या घटनेत वाहन चालक पिंटू उर्फ राजेंद्र धनाजी गव्हाणे याचा बुडून मृत्यू झाल्याने दावडी गावावर शोककळा पसरली. अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)