“स्कूल चलें हम’ – राज्यभरात शाळा सुरू

संग्रहित छायाचित्र

-शाळा प्रवेशोत्सव यंदाही साजरा होणार

पुणे – राज्यभरातील जिल्हा परिषद व महापालिका तसेच बहुतांशी अनुदानित शाळा या आजपासून सर्वत्र सुरू होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जाणार असून विद्यार्थ्यांचे स्वागत फूल देऊन, पुस्तके, वही देऊन करण्यात येणार असल्याचे जिल्ह्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी हारुन आत्तार यांनी सांगितले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेविषयी आकर्षण वाटावे यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी प्रवेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही याबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांकडून सूचना आल्या असून त्यानुसार प्रवेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे आत्तार यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आत्तार म्हणाले, “सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके पोहचविण्यासाठी सर्व शाळांवर आधीच पुस्तके पाठविण्यात आली आहे. शाळांच्या मुख्याध्यापकांना तेथील लोकप्रतिनींधना शाळेत बोलवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शक्‍य तितक्‍या चांगल्या, स्वच्छ वातावरण निर्माण करता येईल तेवढे करण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याच्या सूचना दिल्या आहेत.’

“आरटीई’ विद्यार्थ्यांचा पहिला दिवस कधी?
सर्वत्र आजपासून ठिकाणी शाळा प्रवेशोत्सवाचे वातावरण आहे, तरीही “आरटीई’ अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी मात्र निराशाच आहे. सध्या “आरटीई’ची दुसरी प्रवेश फेरी सुरू आहे. 16 हजारांपैकी फक्‍त 50 टक्‍के म्हणजे 8 हजार जागा शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित जागा कधी भरल्या जाणार, त्या खरोखरच पूर्ण भरल्या जातील का, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत आहे. याबाबत आत्तार म्हणाले, “दुसऱ्या फेरीदरम्यान अजून एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)