“सौ.’ च्या उमेदवारीसाठी “श्रीं’ ची नेत्यांकडे फिल्डिंग

मलकापूर रणांगण : कडाक्‍याच्या थंडीतच मलकापूरचा आखाडा तापला

उमेश सुतार

कराड – संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मलकापूर नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक मातब्बरांच्या दांड्या गुल झाल्या आहेत. तर ओबीसीसाठी आरक्षित प्रभागातील “श्री’नी आपल्या “सौ’साठी फिल्डिंग लावली असून यासाठी नेत्यांची मनधरणी केली जात आहे. एकंदरीतच कडाक्‍याच्या थंडीतच मलकापूरचा आखाडा चांगलाच तापला असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी चिठ्ठ्या टाकून नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. या आरक्षणामुळे अनेकांचा अक्षरश: भ्रमनिरास झाला आहे. नगरपरिषद मान्यतेनंतर थेट नगराध्यक्ष होण्याचा मान ओबीसी महिलेसाठी मिळणार असल्याने प्रभागातील लढतीवर सर्वाच्याच नजरा लागल्या आहेत. मात्र पूर्ण बहुमतासाठी कॉंग्रेससह राष्ट्रवादी व भाजपात प्रामुख्याने चांगलीच चुरस लागणार आहे.

मलकापूर नगरपरिषदेला क वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली. शहरात एकूण नऊ प्रभाग आहेत. तर एकूण 19 नगरसेवक निवडूण द्यायचे आहेत. मात्र नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे. येथील नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा मिळाल्यापासून याठिकाणी नगराध्यक्षपदाचे नेमके आरक्षण काय पडते. याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती.

सत्ताधारी कॉंग्रेस गटाचे मनोहर शिंदे व भाजपतर्फे अतुल भोसले यांच्या गटात चुरस आहे. सत्ताधारी गटाचे मनोहर शिंदे यांना थोपविण्यासाठी अनेक मातब्बरांनी एकमेकांचे हातात हात घालून राजकिय व्युहरचना केली आहे. तर शिंदे यांनी मलकापूरमध्ये आत्तापर्यत केलेल्या विकासकामांचा मुद्दा घेवून रणांगणात उतरण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय पडते, याची वाट पाहणाऱ्या भोसले गटाने अद्यापही त्यांची भुमिका जाहीर केलेली नसली तरी अंतर्गत डावपेच सुरु झाले आहेत. त्यामुळे मलकापूरच्या यावेळच्या लढती अटीतटीच्या व चुरशीच्या होणार, यात कसलीच शंका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)