सौर ऊर्जेचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न 

लवकरच होणार अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषद 
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य परिषदेची पहिली सभा येत्या 2 ऑक्‍टोबरला भारतात होणार असून त्यासोबत इंडियन ओशन रिम असोसिएशनची दुसरी अक्षय ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक तसेच जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि प्रदर्शन 2018 हे सगळे कार्यक्रम 2 ते 5 ऑक्‍टोबरदरम्यान नवी दिल्लीत होणार आहेत. भारत एकूण वीज निर्मितीत सौर ऊर्जेचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी या परिषदेचा उपयोग होणार आहे.
संयुक्‍त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँन्टोनिओ गुटेरस यांच्या प्रमुख उपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते एका संयुक्त कार्यक्रमात या तिन्ही महोत्सवांचे उद्‌घाटन होईल. त्याशिवाय सौर सहकार्याशी संबंधित व्यापार आणि तांत्रिक वस्तूंचे प्रदर्शनही या दरम्यान नोएडा येथे आयोजित केले जाईल.
केंद्रीय नवीकरण आणि अक्षय ऊर्जा विभागाने हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. भारताचा उपक्रम असलेल्या आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याचे उद्‌घाटन 2015 साली पॅरिस येथे पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या हस्ते झाले होते. सौर ऊर्जेच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या देशांमध्ये या पर्यायी ऊर्जेचा शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यासाठी अनेक देशांदरम्यान एक करारही करण्यात आला.
हवामान बदलाच्या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी पर्यायी ऊर्जा म्हणून सौर ऊर्जेचा विकास आणि वापर करण्याचे धोरण भारत सरकारने स्वीकारले आहे. या सौर सहकार्य सभेत विविध देशातले 121 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या सभेत जागतिक सौर कार्यक्रम तयार केला जाईल तसेच काही करार होण्याची शक्‍यता आहे. दुसऱ्या कार्यक्रमात नवीकरणीय आणि अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे तसेच त्यासाठी गुंतवणूक आमंत्रित करणे यासाठी प्रयत्न केले जातील. या परिषदेत 600 हून अधिक उद्योजक सहभागी होणे अपेक्षित आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)