सौरभ लग्नाला तयार झाला

पौंगडावस्थेतून वयात आलेली मुले ही निर्णय घेण्याच्या क्षमतेबाबत साशंक असतात, असे अनेकदा आढळून येते. मात्र, आपल्याला काय आवडत आहे, याचा एकांगी विचार करतच ते आपल्या स्वत:च्या आयुष्याकडे पहात असतात. मात्र, प्रत्येक गोष्टीला दुसरीही एक बाजू असते, हे त्यांना मान्यच नसते किंवा मान्य करायला जड जाते. अशाच एका युवकाची झालेली मानसिक उलघाल…
सौरभ तसा पहिल्यापासूनच ठराविक लोकांमध्ये मिक्‍स होणारा, खरं तर कलाकारच! पण फार कमी लोकांशी जमत असल्याने त्याचा हा “स्ट्रॉंग पॉईंट’ फार कमी जणांना माहीत असावा. किमान 28 वर्षांच्या सौरभची शाळेतली प्रगती तशी ठीकठाक होती. शिवाय 10 वी नंतर त्याने वाणिज्य शाखेची पदवीही मिळवली. पण तो त्यामध्ये फार रमला नाही. त्याचा कल होता तो फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीकडे. त्या क्षेत्रात नोकरी करता-करताच त्याने स्वतःचा बिझनेस सुरू केला.
मग काय सौरभला स्थळं सांगून यायला लागली. पण तो मात्र ही गोष्ट मनावर घेत नव्हता. अशातच काही महिन्यांपूर्वी तो वैतागून मला भेटायला आला. तो म्हणाला, “माझी उद्या क्‍लायंट मीटिंग आहे आणि माझ्या आईनं नेमका मुलगी बघण्याचा घाट घालून ठेवलाय. मला उद्या पहिली ऑर्डर मिळण्याची शक्‍यता आहे तर हे असं… मी फोटो पाहून फक्त “मुलगी ठीक आहे’ असं म्हणालो; तर लगेच हिने पत्रिका जुळवून हा कार्यक्रम पण ठरवला. लग्न, नवीन जबाबदारी या सगळ्याची माझी मानसिक तयारी झालेली नसताना यांची इतकी घाई का?’
त्याचं सारं बोलणं ऐकून घेतल्यावर मी म्हणाले, “”हे बघ सौरभ लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. हे मान्य आहे की, तू त्या मुलीचा अजून विचार केला नाहीस. पण तुला मुलगी बघायला काय हरकत आहे? आणि तू नोकरीत सेटल झालायस. आता नवीन व्यवसाय सुरु करतोयस. तुझं स्वत:चं घर आहे, आई-वडिलांचा सपोर्ट आहे; तर तू लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे? एकदा मुलीला भेटून तर ये.’ तो जायला तयार झाला. पण त्याला अजून काहीतरी सांगायचं असावं, असं वाटलं…
तो परत आल्यानंतर मात्र त्याच्याशी सविस्तर बोलायचं ठरवलं; आणि तीन-चार दिवसातच तो पुन्हा भेटायला आला. आल्यापासूनच तो अस्वस्थ असल्याचे जाणवत होते. त्याला थोडं शांत होऊ दिलं; आणि या अस्वस्थतेमागील कारण विचारले आणि साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला. सौरभला एक मुलगी आवडत होती. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण घरचे याला मान्यता देतील का? त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, याची त्याच्या मनात भीती होती आणि अलीकडेच त्याचे त्या मुलीबरोबर छोट्या छोट्या कारणांवरून वादही होत होते. ती मुलगीसुद्धा कदाचित या नात्याबाबत गोंधळली असावी.
सौरभला विश्‍वासात घेऊन त्याच्या आईला बोलावून घेतले व या गोष्टीची त्यांना कल्पना दिली. सौरभच्या घरच्यांची याविषयी काही तक्रार नव्हती. पण त्यांच्यातील वादाचे कारण जाणून घेण्यासाठी काही दिवसांनी तिला व सौरभला भेटायला बोलावले आणि या भेटीतून आणि बोलण्यातून असे लक्षात आले की, सौरभच्या जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षा, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्या मुलीच्या अपेक्षा आणि दृष्टीकोन यात बरीच तफावत आहे आणि त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते; आणि त्यामुळे हे नातं पुढे न्यावं असं तिला वाटत नव्हतं. पण हे सांगावं कसं हे मात्र तिला कळत नव्हतं.
हे सारं समजल्यावर सौरभ मात्र हादरून गेला. त्याच्या मते, “इतकं छान नातं असताना तिला माझ्याबद्दल असं का वाटावं? मी तिला जोडीदार म्हणून योग्य वाटत नव्हतो… आणि मी मात्र…’
पण या सर्वाबाबत त्याच्याशी सविस्तर बोलल्यावर तो शांत झाला. त्याने सावरण्यास थोडा वेळ घेतला. पण चांगली गोष्ट म्हणजे त्याने गोंधळून चिडून त्या मुलीला काही बोलण्यापेक्षा तिच्या या मतांचा आणि निर्णयाचा आदर केला.
त्याच्या आईला या साऱ्याची कल्पना देऊन त्याला थोडा वेळ द्यायला सांगितला. या मधल्या काळात तो मला पुन्हा येऊन भेटला. केलेल्या मार्गदर्शनाला त्याने चांगला प्रतिसाद दिला आणि या साऱ्यातून बाहेर पडला आणि मुख्य म्हणजे त्याने पाहिलेली मुलगी त्याच्या अपेक्षांमध्ये बसणारी आहे हे लक्षात आल्यावर तिला होकारही दिला. नुकताच त्यांचा साखरपुडाही झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)