सौंदर्याने रद्दीतून बनविला आकर्षक गणपती!

कोपरगाव – हस्तकलाकारांच्या कलेचे दर्शन कुठे घडेल, याचा काही नेम नाही. टाकावूपासून टिकावू वस्तू बनविणे आपल्याला ऐकून माहीत असते; परंतु कोपरगावच्या 12 वर्षाच्या सौंदर्या बनसोड या मुलीने टाकावू कागदाच्या रद्दीपासून चार फुटाचा आकर्षक गणपती बनवला आहे. कागद व चिकटपट्‌यांचा वापर करून तिने सुबक गणेशमूर्ती तयार केली आहे. सौंदर्याने बनविलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात येणार आहे.
सौंदर्याला वयाच्या पाचव्या वर्षापासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनविण्याचा छंद आहे. टाकावू वस्तूपासुन विविध प्रकारची खेळणी बनविणे, शोभेच्या वस्तू तयार करणे, भिंत्तीचित्र रेखाटणे, ती रंगसंगतीने सजविणे अशा छंदाबरोबरच मोठमोठया रांगोळया काढण्याचा ती विक्रम करीत आहे.
सौंदर्याने शिर्डी येथे प्रसादलयाच्या प्रांगणात रामनवमी उत्सवाच्या काळात साईबाबांची सुबक रांगोळी प्रतिमा रेखाटली होती. तब्बल एक हजार चौरस फुटांची ही रांगोळी साईभक्तांचे आकर्षण ठरली होते. अनेक साईभक्तांनी आपल्या मोबाईलमध्ये ही रांगोळी जतन करून ठेवली आहे.
सौंदर्या ही कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सातवीत शिकत आहे. तिने आपल्या शाळेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांची पाचशे फुटांची रांगोळी प्रतिमा काढली होती, तर तिने स्वतःच्या घराच्या छतावर साईबाबांची प्रतिमा 800 फुटांमध्ये रेखाटली होती. विशेष म्हणजे तिला कोणत्याही कला शिक्षकाचा क्‍लास नाही. कोणाचे मार्गदर्शन नाही. ती स्वतःच्या कल्पनेतून वेगवेगळ्या कला साकारत असते. सौंदर्याचे वडील संदीप बनसोड व आई मीना बनसोड यांचे तिला सर्व प्रकारचे सहकार्य मिळत असल्याने तिची कला बहरत आहे. संदीप यांनी तिच्या कलेच्या हट्टासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले आहेत. आपल्या कलाकार मुलीने तिच्या कल्पनांना मूर्त रुप द्यावे, एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. भविष्यात जागतिक उच्चांकाची रांगोळी सौंदर्याच्या हातून काढून घेण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. तब्बल अकरा एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रांगोळीने रेखाटण्याची तयारी सौंदर्या करीत आहे. त्यासाठी लागणारी योग्य जागा, आवश्‍यक रांगोळी यांची जमवाजमव व इतर तयारी सुरू आहे. या कामी अनेकांनी त्यांना मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. कमी वयात सर्वांत मोठी रांगोळी काढण्याची सौंदर्याची जिद्द इतरांसाठी प्रेरणादायी आहे. सध्याची मुले-मुली पालकांकडे महागडे मोबईल, फॅशनेबल कपडे, चैनीच्या वस्तूसाठी हट्ट करतात; पण सौंदर्याचा हट्ट जगावेगळा आहे. तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तिचे वडील जीवाचे रान करीत आहेत. सौंदर्याच्या कलेचा व तिच्या पालकांचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)