सोसायट्यांचा कचरा विकत घेणार

पिंपरी – शहरातील सोसायट्यांना शंभर किलोपेक्षा अधिक वजनाचा कचरा घेणार नसल्याचे कळविले आहे. शंभर किलोवरील कचरा सोसायटीमध्येच जिरविण्याची सुचना महापालिकेने केली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रश्‍न पडले आहेत, तर सोसायट्यांनी सुका कचरा दिल्यास त्यांना तो विकत घेण्याची तयारी संत गाडगेबाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेने दर्शविली आहे. त्यामुळे कचरा द्या, पैसे घ्या असा उपक्रम या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.

केंद्र शासनाने सोसायट्यां मधील ओल्या कचऱ्यासंदर्भात अध्यादेश काढला. यामध्ये सोसायटीमधील 100 किलोवरील फक्त ओला कचरा घ्या, अशा सुचना केल्या आहेत. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही सोसायट्यांना 100 किलो वरील कचरा सोसायट्यांमध्येच जिरविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सुका व घातक असणाऱ्या कचऱ्याचे आम्ही करायचे काय? असा सवाल सोसायटीमधील नागरिक करत आहेत.

यासाठी संत गाडगेबाबा स्वयंरोजगार सहकारी संस्थेने पुढाकार घेतला आहे. कचरा द्या व पैसे घ्या अशी योजना या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. संस्थेच्या पुढाकाराने सफाई सेवकांकडून सोसायटीमधील कचरा उचलला जात आहे. यामध्ये संत तुकाराम नगर येथील सुखवाणी कॅम्पस हौसिंग सोसायटी, चिंचवड येथील सुखवाणी ब्लीस हाऊसिंग सोसायटी, सुखवाणी सफायर हौसिंग सोसायटी आदी ठिकाणी या उपक्रमाची सुरूवात झाली आहे. शहरातील इतर सोसायट्यांनी प्रतिसाद दिल्यास बेरोजगारांना रोजगार मिळेल असा दावा, संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.

सोसायट्यांनी प्रतिसाद दिल्यास मोशी कचरा डेपोवर येणारा ताण कमी होईल, अशी आशा या वेळी संस्थेने व्यक्त केली. संस्थेच्या माध्यमातून सुका व घातक कचरा पुननिर्मितीसाठी पाठविला जातो. सुका कचरा 300 ते 500 किलो जमल्यास सोसायटीला महिन्याकाठी सुमारे 45 हजार आर्थिक उत्पन्न मिळू शकेल, असा दावा संस्थेच्या वतीने करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)