सोशल मीडिया : ट्रोलिंगचा भयावह राक्षस… 

नम्रता देसाई 

लोककथेतील पात्र आणि चालूकाळातील जीवन यांचा एकमेकांवरील प्रभाव आणि परिणामाची एक नवीन गोष्ट सध्या दरदिवशी घडत आहे. ट्रोल! सध्याचे जगणे बघितले तर रोजचाच संघर्ष हा केंद्रीय अथवा राज्य पातळीवरील विविध राजकीय, सामाजिक भूमिका याभोवती होणाऱ्या चर्चेने अधिकतर प्रभावित होते. ट्रोल ही उत्तर युरोपियन लोककथेतील पात्राचे एक रूप आहे. भारतावर पाश्‍चिमात्य गोष्टींचा पगडा राहिला आहे. तो “सोशल मीडिया वॉर’ या संदर्भातदेखील लागू आहे. 

भारतात वर्ष 2012 आणि 2013 पासून रिलायन्स कंपनीने इंटरनेट सुविधा स्वस्त करायला सुरुवात केली. दरम्यान, राष्ट्रीय पातळीवर निवडणूकांचे पडघम सुरू झाले होते. कोणतीही कंपनी आपली गुंतवणूक “सिक्‍युअर’ करण्याचा विचार करून ध्येयधोरणे ठरवते. अगदी ती गोष्ट तंतोतंत जुळून येताना बघायला मिळाली. आधी “बफरिंग होत’ रडतखडत चालणारे इंटरनेट तुफान वेगाने सुरू झाले. लागलीच सर्वपक्षीयांनी थेट अमेरिकेन मतदान प्रक्रिया प्रभावित करण्याची सोशल मिडीयाच्या वापराची पद्धत आणली.

ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून एखाद्या व्यक्‍तीच्या बद्दल रितसर अपप्रचार करताना चारित्र्य, जगणे, नातेसंबंध आणि घरगुती संबंध, वैवाहिक हितसंबंध यावर चिखलफेक सुरू झाली. त्यावरून समर्थक आणि विरोधक अशा प्रत्येक विचारांच्या दोन फळ्या तयार झाल्या. यात कुटुंबवत्सल पद्धतीने सहज मतप्रदर्शन करणारेही भरडले जाऊ लागले.
छापील माध्यमात शब्दसंख्या, मांडणीपद्धत, तथाकथित संस्कारी अपशब्द-वर्जित भाषा वर्तमानपत्रात छापली जाते. पण जेव्हा गाव वस्तीत बसलेली मुलं त्यांच्या घरात, भवतालात बोलतात ती भाषा आणि शहरांमधल्या गल्ली बोळात बोलली जाणारी भाषा एकमेकांसमोर उभी ठाकतात, तेव्हा शहरी विरुद्ध ग्रामीण, राजकीय विरुद्ध अराजकीय, कार्यकर्ते विरुद्ध केवळ मतदार असे गट, तट, त्यातून पुढे पंथ उदयास येतात. नव्याने मैत्री करायला घर, घराचा आवार, शाळा, महाविद्यालये आणि शिकवण्या, गावातील पार सोडून आपल्या विचारांचे भासणारे व्हर्च्युअल विश्‍वातले लोक जवळ येऊ लागले.

कधी एखादा राष्ट्रीय पातळीवर राजकीय हेतूने विषय गाजवायचा तर “हॅश्‍टॅग ट्रेंड’ करण्यासाठी भावनिक खेळी खेळणे असो, की एखाद्या सामाजिक प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी सुरू झालेल्या चर्चेला वेगळं वळण लावणे असो, सगळे “ट्रोल’ या विशेषणात येणारे आहेत. पण तरी त्याला म्हणावा तसा तोडगा मिळालेला नाही. अननुभवी अभिमन्यू आतमध्ये तर आला पण त्या रिंगणाभोवती काय सापळा आहे, याची समज; आणि मग तिथे जायचे की नाही, यासाठी आवश्‍यक पेशन्स सोशल मीडिया वापरणारे ठेवू शकत नाहीत.

मग एखाद्या विषयावर झालेल्या शेरेबाजीमुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या काहींनी आत्महत्या केल्याचेही बघायला मिळते. खरं तर एखाद्याच्या आत्महत्येला कारणीभूत म्हणून संबंधित अकाउंट वापरकर्त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याची तरतूद असायला हवी. पण कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी पोलीस तक्रार व त्यापूर्वी सायबर पोलिसांची तपासणी व शोध या प्रक्रियेविषयी असलेली असंवेदनशीलताही आणखी काही आत्महत्या होण्याला कारण ठरू शकतात.

संघटित गुन्हेगारी अथवा विशिष्ट उद्देशाने केली जाणारी शेरेबाजी ही मानसिक तणाव वाढवणारी असते. अशा वेळी सोबतीची खात्री किंवा ञ्चचशढे अशा चळवळी डिजिटल रूपात मूळ धरू लागल्या. मधल्या काळात भारतात घडलेल्या बलात्कार व हत्यांच्या घटना बघितल्यावर त्यावर उमटलेल्या विपरित परिणाम करणाऱ्या घटना, प्रतिक्रिया व गोष्टी बघितल्या तर भारतीय लोकशाही मूल्य व समोरच्याला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे याची झालर बनवून अतिशय अश्‍लाघ्य बोलणं सुरू होते. समाजात राहणाऱ्या समाज घटकाची, जात, विशिष्ट पद्धतीने समर्थन किंवा धार्मिक, राजकीय भूमिका यावरून ज्या ठिकाणी तंटा तयार केला जातो तो बराचसा भावनिकतेचा चतुराईने वापर करून केलेला डाव असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे.

हे प्रकार सुरू होऊन “बिझनेस वॉर’पर्यंत आपण येऊन ठाकलो आहोत. त्यामुळे अनेकांना आपण ग्राहक बनवले जात आहोत, हा ट्रॅप लवकर समजला पाहिजे. नाहीतर हे बदनामी सत्र माणसाला माणसाशी बोलताना “डिजिटल डिक्‍लरेशन आणि अल्गोरिदम’ यामध्ये असा काही जखडून टाकेल की मौखिक परंपरा म्हणून काही कधी अस्तित्वात होती हे समजणारदेखील नाही.

आपण इंटरनेट मायाजालाचे ग्राहक अधिक आणि या काळाआधी अस्तित्वात असणाऱ्या गप्पागोष्टींचा विसर पडलेली बजबजपुरी ठरू. गावोगावी अभ्यासासाठी फिरताना जाणवते की आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी कमी आणि आपल्या थेट आयुष्यावर कोणताही प्रभाव न टाकणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय गोष्टी जनरल नॉलेज म्हणून एकत्र करून बसलेलो असतो. पण सहज गप्पा हा धागा मात्र हरवला आहे. रोज दैनंदिन जीवनात सुद्धा हे “पॉलिटिकल बॅटल’ आणि पाश्‍चात्य शक्तींचा प्रभाव आणि अमल कायम असल्याचे दिसून येते. मालिकांमध्ये असणाऱ्या घरांसारखी आखीव-रेखीव जीवनशैलीत थाट शोधणारे आपण इंटरनेट बाजारपेठेचा नित्य नवा ग्राहक असतो.

 …पण लक्षात कोण घेतो? 

कधी अलीबाबाच्या गुहेच्या गोष्टीनुसार आपण एक एक फुली करून आपला कार्यभाग साधणारे बनणार? किती दिवस इतरांच्या घरात काय घडतंय त्यावरून बोजड व्याख्या संज्ञा याच्या माऱ्यात येऊन झुंडीचा भाग बनणार आहोत? “ट्रोल बिझनेस इज ऑल अबाऊट टॅपिंग!’ जोपर्यंत तुम्ही बोटांनी स्क्रीन क्‍लिक करत रहाल तोपर्यंत तुमच्याशिवाय इतर काही लोक मोठी रक्‍कम कमावत राहणार आहेत. या भयाने हा वापर बंद करावा असे मात्र नाही. आपण लिहित आहोत त्याची विस्तृत माहिती आणि चौफेर अभ्यास असेल तरच त्याविषयी लिहा. पण दोन्हीमध्ये जो लहानसा फरक आहे तो नक्‍कीच समजून घ्या. ट्रोल हे तुम्हाला प्रत्यक्ष जगात प्रभावी करणारे संज्ञापनाचे एक भाकित आहे. जे आज भवितव्य बनले आहे! फक्त बाण झेलणं आणि कढ काढणंच यात होत राहणार की, पहिल्यांदा स्वतःत काही भरसुद्धा घालून घेणार याचा साकल्याने विचार करणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)