सोलापूर महामार्गावर वाळूचे ट्रक निष्पापांचे यमदूतच!

हडपसर – मांजरी बुद्रुक हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळेवाडी फाटा ते लक्ष्मी कॉलनी दरम्यान वाळूच्या ट्रक अनधिकृतपणे रात्रंदिवस उभ्या केल्या जात आहेत. रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या या वाळूच्या ट्रकमुळे अनेक अपघात घडत आहेत. याशिवाय वाळू ट्रकच्या आडून येथे जुगार, मद्यपान, असे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील सोसायटीधारकांना त्यांच्या उपद्रवाचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.

कवडीपाट टोल नाका ते लक्ष्मी कॉलनी दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाळूच्या ट्रक या निष्पापांचे यमदूत ठरत आहेत. वाळूतस्करांनी स्थानिक एजंटाच्या मध्यस्थीने प्रशासकीय यंत्रणेशी जुळते घेत सर्व नियमांना पायदळी तुडविण्यास सुरुवात केली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर वाळूची वाहने अहोरात्र क्षमतेपेक्षा दुप्पट वाळू घेऊन धावतात. त्यातच भरीसभर म्हणून मांजरी बुद्रुक हद्दीत शेवाळेवाडी फाटा, जुना जकात नाका, गुंड वस्ती, मांजरी उपबाजार याठिकाणी रस्त्यावरच वाळूच्या ट्रक उभ्या केल्या जात आहेत. काही स्थानिक एजंटांकडून हे वाळू व्यावसायिक पोलीस, महसूल व आरटीओ प्रशासनाशी मिळतेजुळते घेत असल्यानेच वारंवार तक्रार करूनही येथील अनधिकृत उभ्या राहणाऱ्या वाळू ट्रकवर कारवाई होत नसल्याचा आरोप पुणे-सोलापूर रस्त्यावरील निसर्ग डेव्हलपर्स, कुसुम ऍसोसिएट्‌स, पी. एस. व्हिलासह काही सोसायट्यांनी केला आहे. यासंदर्भात हडपसर वाहतूक शाखेला पत्रही दिले आहे.

मुख्य रस्त्यावरून सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच या वाळूच्या ट्रक उभ्या केल्या जात आहेत. सोसायटीत वाहने जाताना त्यांना त्रास होत आहे. वाळूच्या ट्रक हलविण्यास सांगितल्यास ट्रक चालकांकडून एकत्र येत सोसायटीधारकांना अर्वाच्च भाषा वापरली जात आहे. याशिवाय ट्रकमध्ये व दोन ट्रकच्या मधील अंतरात बसून मद्यपान केले जात आहे. मद्यपान केल्यानंतर सोसायटीसमोर गेटवर तर कधी रस्त्यावरच लघुशंका करत असल्याने सोसायटीमधील महिलांची मोठी कुचंबना होत आहे. महिला सदस्य सोसायटीमधून वाहने घेऊन बाहेर पडताना या वाळू ट्रकचालकांकडून अनेकदा अरेरावी होत असल्याचे त्रस्त महिला सांगत आहेत. त्यामुळे येथील अनधिकृत वाळू व्यावसायिकांच्या थांब्याला लगाम घालावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान याबाबत हडपसर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, आमच्याकडून नियमित कारवाई केली जात आहे. नुकतीच चार ट्रकवर कारवाई करून त्याबाबत तहसीलदार, आरटीओ आणि पोलीस विभागाला पत्रव्यवहार व संपर्क करून कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)