सोलापूरचा गणेश जगताप खुल्या गटात विजेता

पुणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा : साबा कोहलीला पराभवाचा धक्‍का
पुणे – सोलापूरच्या गणेश जगतापने पंजाबच्या साबा कोहलीला 6-5 असे एका गुणाच्या फरकाने पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटाच्या विजेतेपदाला गवसणी घातली. पुण्याच्या सचिन येलभरने कृष्णाला पराभूत करताना तिसरे स्थान राखले.

कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सोलापूरचा गणेश जगताप व पंजाबचा साबा कोहली यांच्यात झालेल्या खुल्या गटाच्या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. गणेश जगतापने लपेट डाव टाकताना दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर लगेचच साबा कोहलीने भारंदाज डाव टाकताना 2 गुण मिळवत लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर लढतीतील चुरस वाढतच गेली.
गणेशने रोलिंग करताना 2 गुण कमावले. परंतु साबाने गणेशला बाहेर ढकलताना 2 गुणांची कमाई करत पुन्हा एकदा बरोबरी साधली. गणेशने साबाला दोन वेळा सर्कलच्या बाहेर ढकलताना प्रत्येकी एक गुणाची कमाई केली. परंतु त्यानंतर साबाला केवळ 1 गुणाची कमाई करता आली. निर्धारित वेळ संपल्याने सोलापूरचा गणेश जगताप विजेता ठरला.

त्याआधी अत्यंत चुरशीच्या उपान्त्य लढतीमध्ये सोलापूरच्या गणेश जगतापने पुण्याच्या सचिन येलभरला तर पंजाबच्या साबा कोहलीने पुण्याच्या विकास जाधवला पराभूत करताना खुल्या गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

याशिवाय 65 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अक्षय हिरागुडेने पुण्याच्या निखिल कदमला 12-3 असे पराभूत करताना विजेतेपद पटकावले. त्याचप्रमाणे 74 किलो वजनी गटात कोल्हापूरच्या कुमार शेलारने श्रीधर मुळीकला 9-5 असे पराभूत करताना विजेतेपद पटकावले. चुरशीच्याअंतिम लढतीत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने बीडच्या अमोल मुंढेला पराभूत करताना 86 किलो गटाचे विजेतेपद पटकावले.

अन्य गटांच्या कुस्त्यांमधील 46 किलो वजनी गटात अजय फुलपगारने ऋषिकेश काळेल याला 5-2 असे पराभूत करताना विजेतेपद पटकावले. 57 किलो वजनी गटात पुण्याच्या सागर मरकडने कोल्हापूरच्या विक्रम मोरेला 12-2 असे पराभूत करताना विजेतेपद पटकावले. त्याचप्रमाणे 79 किलो गटात कोल्हापूरच्या रणजीत नलावडेने अहमदनगरच्या अजित शेळकेला 4-2 अशा फरकाने पराभूत करताना विजेतेपदाला गवसणी घातली. 42 किलो वजनी गटात शुभम शिंदेने प्रथमेश धरवडकरवर 6-0 अशा तांत्रिक गुणांच्या सहाय्याने विजेतेपद पटकावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)