सोरतापवाडीत लिली, गुलछडी रूसली

बाजारभाव नसल्याने फुलांचे भाव कवडीमोल

उरुळी कांचन, दि. 18 (वार्ताहर)- सध्या लग्नसराईत मोठ्या धुमधडाक्‍याने साजरी होत आहे. लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. फटाके वाजवून अनाठाई खर्च केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या लिली, गुलाब, झेंडू, गुलछडीसह भाजीपाल्याला बाजार नसल्यामुळे शेतकरी ऐन लग्नसराईत मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. हवेली तालुक्‍यातील सोरतापवाडी, तरडे, शिंदवणे, कुजींरवाडी, लोणीकाळभोर, थेऊरसह इतर भागात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन घेतले. अगोदर या भागातील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद झाल्यापासून या भागातील शेतकरी ऊसाऐवजी फुले व भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हवेली तालुक्‍यातील सोरतापवाडी पूर्वी गुलाबाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द होते. मात्र, दिवसेंदिवस औषधे तसेच रासायनिक खतांच्या किमती वाढल्या. मात्र, गुलाबाचे बाजारभाव वाढत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गुलाब काढून त्याजागी लिली, गुलछडीची लागवड केली. सध्या सोरतापवाडी गावात 35 ते 40 एकर लिली तर 30 ते 35 एकर गुलछडी आहे. मात्र, लग्नसराईत लिलीची गड्डी दोन ते एक रुपयाला जात असल्यामुळे केलेला खर्चसुध्दा निघत नाही. अशी माहिती आप्पासाहेब लोणकर व गोविंद चौधरी यांनी दिली. याबाबत सोरतापवाडी येथील शेतकरी दिपक चौधरी यांनी सांगितले की, सध्या लिलीला बाजारभाव नाही. लग्नसराईत जोरात असूनसुद्धा 2 ते 3 रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे तोडणीचा खर्च सुध्दा निघत नाही. आम्ही दररोज पहाटे चारच्या फुले तोडण्यास सुरुवात करतो. तर नऊपर्यंत 1500 ते 2000 लिलीची तोडणी करतो. बाजारभाव नसल्यामुळे आम्ही घरीच फुले तोडतो. आप्पासाहेब लोणकर यांनी सांगितले की, 50 कळयाची एक गड्डी बांधतो. दरवर्षी लग्नसराईत चांगला बाजारभाव मिळतो. यावर्षी कांद्याबरोबर फुलालाही बाजारभाव नसल्यामुळे आर्थिक नियोजन कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. याबाबत फुलांचे वाहतूक करणारे टेम्पोचालक सचिन चौधरी यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तेवढाच माल येतो. मात्र, बाजारभाव का नाही, हे आम्हाला समजनेसा झोले आहे. त्यामुळे शेतकरी गोणीमध्ये जास्त माल भरतात. याबाबत फुलांचे व्यापारी राजेंद्र मोहिते यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे फुलांची आवक आहे. मात्र, ग्राहक कमी असल्यामुळे बाजारभाव कमी झाला आहे. सध्या लग्नात अनेकजण विविध प्रकारचा सेट उभा करीत असल्यामुळे फुलाला मागणी कमी होत चालली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)