सोमेश्‍वर कारखाना कर्जातच्या खाईत जाण्यापासून रोखा

सोमेश्वरनगर- सहविजनिर्मितीसह विस्तारवाढीचा 112 कोटीचा प्रकल्प मागील अनुभवाप्रमाणे पावणेदोनशे कोटीवर जाईल. आधीचे 82 कोटी कर्ज अहवालानुसार दिसते. त्यामुळे प्रकल्पवाढीचा प्रस्ताव थांबवून कारखाना कर्जाच्या खाईत जाण्यापासून रोखा, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 23) अजित पवार यांच्याकडे केली. याबाबत पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याने 1 फेब्रुवारीच्या विशेष सर्वसाधारण सभेत विस्तारवाढ करून गाळपक्षमता अडीच हजार टनांनी वाढविण्याचा विषय तसेच त्यासोबत सहविजनिर्मितीप्रकल्प वाढविण्याचा विषय मंजूर केला. यासाठी 112 कोटींचा खर्च होणार असल्याचे दाखवून सभासदांचे प्रतिटन 200 रूपये कपात करण्याचे ठरविले आहे. शेतकरी कृती समितीने या प्रस्तावास विरोध करत वेगळा प्रस्ताव अजित पवारांपुढे ठेवण्यासाठी वेळ मागितली होती. काकडे विरूद्ध पवार हा वाद यानिमित्ताने प्रथमच बाजूला ठेवला जाऊन समझोत्याची भूमिका समोर आली. यानुसार बारामती होस्टेल येथे सतीश काकडे, भाऊसाहेब भोसले, अजय कदम, जालिंदर जगताप, दिग्विजय जगताप, कल्याण भगत, बाळासाहेब जगताप, शहाजी जगताप, अविनाश जगताप, सुरेश शेंडकर, ज्योतिराम जाधव, संजय घाडगे, अमर चव्हाण आदी पवार यांच्यासोबत एक तासाची बैठक पार पडली.
कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या कारभाराचे पाढे पवार यांच्यापुढे वाचले. अजूनही कारखान्यावर 82 कोटींचे कर्ज बाकी असल्याचे दाखवून दिले. अशातच 112 कोटींचा प्रकल्प केल्यास वाढीव किमती धरून कारखाना पुन्हा कर्जात अडकेल. संचालक मंडळ वार्षिक वीस कोटीचा हप्ता येईल असे म्हणत असले तरी तो वाढेल आणि एफआरपी देण्यातही अडथळे येतील. तसेच संचालक जादा ऊस आहे म्हणून विस्तारवाढ मागतात परंतु तसा ऊसच उपलब्ध नाही. सभासदांचा दहा लाख टन आहे व अन्य गेटकेन आहे. त्यासाठी 112 कोटींच्या प्रस्तावाऐवजी दोन बॉयलर कारखान्याकडे जुने आहेत ते सुरू करावेत व कारखान्याच्या मिलमध्ये दुरूस्ती करावी. त्यामुळे दीड ते दोन हजार टनांनी गाळपक्षमता वाढेल. सध्या साडेपाच हजारांनी कारखाना चालतो तो साडेसात हजारांनी चालला तर तेरा लाख टनांचे सुद्दा गाळप होईल. गेटकेनधारकांचाही उस आणला जाईल, अशी भूमिका काकडे यांनी मांडली. शासनाला स्वस्तात वीज मिळत असल्यामुळे सहविजनिर्मिती प्रकल्पांची जादा दराची वीज घेण्यास शासन टाळाटाळ करत असल्याचा मुद्दा काकडे यांनी माडंल्यावर पवार यांनी त्यास सहमती दर्शविल्याचेही काकडे यांनी सांगितले.
एकंदरीत चर्चेनंतरर पवार यांच्याकडून सहविजनिर्मितीप्रकल्प रद्द होईल व विस्तारीकरणाबाबतही ते विचार करतील, अशी अपेक्षा काकडे यांनी व्यक्त केली. याशिवाय कार्यकर्त्यांनी ऊस तोड नीट होत नाही अशा तक्रारी केल्या आहेत. व्यवस्थापनातील लोकांचा ऊस लवकर जातो आणि सामान्य माणसाचा मागे राहतो, वाहतूकदारही नाराज आहेत, सभासदही नाराज आहेत अशा तक्रारी केल्याची माहिती काकडे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)