“सोमेश्‍वर’च्या अध्यक्षासह संचालकांवर गुन्हा

बारामती न्यायालयाचा आदेश; एकास दमदाटी व शिवीगाळ केल्याचे प्रकरण
सोमेश्वरनगर, – बारामती तालुक्‍यातील सोमेश्वर कारखाना प्रशासनाने फसवणूक करीत दमदाटी व शिवीगाळ केल्या प्रकरणी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने 26 जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बारामती न्यायालयात अमित कैलास तावरे (रा. पाहुणेवाडी ता. बारामती) यांनी दाद मागितली होती. तावरे यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक (क्र. एमएच 42 युए 7279) सोमेश्वर कारखान्याला भाडेतत्त्वावर दिला होता. या ट्रकवर बारामती येथील श्रीराम फायनान्सचे कर्ज होते. या कर्जाचा 20 हजार रुपये प्रतिमाह असा हप्ता होता. कारखाना प्रशासनाने हा हप्ता फायनान्स कंपनीकडे भरण्याचे मान्य केले होते. मात्र, कारखान्याने हे हप्ते भरले नसल्याचे तावरे यांच्या लक्षात आले. यावर तावरे यांनी कारखान्याकडे यार्ड मध्ये लावलेल्या आपल्या ट्रकची मागणी केली. मात्र, त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. तसेच ट्रक देणार नसल्याची धमकी दिली.
याबाबत फिर्यादी तावरे यांनी दि. 26 ऑक्‍टोबर 2016ला सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळ व कार्यकारी संचालकांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांकडून काहीच कारवाई होत नसल्याने त्यांनी न्यायालयाचे दाद ठोठावले होते, त्यामुळे न्यायालयाने दि. 26 ऑगस्टला कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह, कार्यकारी संचालक व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)