सोपानकाका पालखीचा माळेगावच्या मुक्‍काम यंदाही रद्द

वाघापूर -क्षेत्र सासवड येथील संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे क्षेत्र पंढरपूरकडे काही दिवसांवर प्रस्थान आले आहे. त्या दृष्टीने सोपानदेव पालखी सोहळा समितीच्या वतीने तशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान पालखी सोहळ्यातील माळेगाव (ता. बारामती) येथील मुक्काम यावर्षीही रद्द करण्यात आला आहे. तसेच मागील वर्षीही तिथीचा क्षय असल्याने तो रद्द करण्यात आला होता. दरम्यान 2016 ते 20 या संपूर्ण कालावधीत तिथीचा क्षय असल्याने येथील मुक्‍काम रद्द होणार आहे, अशी माहिती संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त ऍड. गोपाळ गोसावी यांनी दिली.

सासवड (ता. पुरंदर) येथील संत सोपानकाका मंदिरात पालखी सोहळा नियोजनाबाबत सर्व दिंडी प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ऍड. गोसावी यांनी दिंडी चालक आणि मालक यांना सोहळ्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी सोहळा प्रमुख श्रीकांत गोसावी, अध्यक्ष राममहाराज कदम, सचिव धनाजी चोरघे, वारकरी महामंडळाचे माजी अध्यक्ष माधव शिवनेकर, चोपदार मनोहर रनवरे, हरिभाऊ शिंदे, कीर्तनकार दत्तात्रय फरांदे, तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कुंभारकर, अण्णासाहेब डांगे, तसेच पालखी सोहळ्यातील सहभागी दिंडी चालक आणि मालक, विश्वस्त उपस्थित होते.

यावेळी गोपाळ गोसावी म्हणाले की, पालखी सोहळा सुरू असताना मंगळवारी (दि. 27) जून रोजी बारामती येथून प्रस्थान झाल्यानंतर भवानीनगर येथे जास्त काळ सोहळा थांबत होता. मात्र, या वर्षीपासून भवानीनगर पूर्वी पिंपळी येथून जाताना याच ठिकाणी दुपारचा नैवद्य आणि आरती होऊन याच ठिकाणी जास्त वेळ विश्रांती घेतली जाईल. त्यानंतर भवानीनगर येथून केवळ दर्शनासाठी काही काळ थांबून बोरी – बेलवडी फाटा मार्गे लासुर्णे येथे मुक्‍कामास जाईल.

दरम्यान या वर्षी सोहळ्यात आणखी 10 दिंड्या वाढल्याची माहिती चोपदार मनोहर रनवरे यांनी दिली. यापूर्वी 80 दिंड्या होत्या. त्यामध्ये 10 वाढल्याने दिंड्यांची संख्या 90 इतकी झाली आहे. यामध्ये रथाच्या पुढे 27 दिंड्या राहणार असून रथाच्या पाठीमागे 63 दिंड्या राहतील असे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी वारकऱ्यांच्या आणि दिंडी मालकांच्या वतीने सूचना मांडताना हभप सुनील महाराज यादव यांनी सांगितले की, पालखी सोहळा पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर इतर दिंडीतील चालक आणि विणेकरी यांना देवाच्या दर्शनासाठी वीणा भेट घेण्यासाठी पास मिळतात. त्याचप्रमाणे संत सोपानकाका सोहळ्यातील वीणेकऱ्याना पास मिळावा यासाठी देवस्थानाने प्रयत्न करावा, अशी सूचना मांडली. त्यावर प्रमुख विश्वस्त गोपाळ गोसावी यांनी याबाबत माहिती घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी करण्यात आलेल्या सूचना
* पंढरपूर येथे सोहळा गेल्यानंतर यात्रेच्या काळात शौचालयासाठी शासनाचे अनुदानित शौचालय उपलब्ध आहेत. नदीच्या किनारी पंढरपूर पालिकेने तेथे उभारले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनी ही सेवा उपलब्ध होण्यासाठी दिंडीच्या मालक आणि चालकांनी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करावी, जेणेकरून ऐनवेळेत फारसा त्रास होणार नाही.
* दिंडी परतीच्या मार्गावर सर्व दिंडी चालकांनी आपल्या दिंडीमध्ये किमान दोन विणेकरी राहतील याची दक्षता घ्यावी.
* दिंडीतील प्रत्येक ठरवून दिलेल्या जागेवरच मुक्काम करावा. तसेच पालखी सोहळ्याच्या जास्त पुढे न जाता सोहळ्याबरोबरच प्रवास करावा.
* दिंडी मुक्कामाच्या ठिकाणावर नियमितपणे कीर्तन सेवा झालीच पाहिजे, याची प्रत्येक दिंडी मालक आणि चालक यांनी काळजी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)