सोन्या-रुप्याच्या पावलानी गौराई आली

पिरंगुट –आली आली गौराई, सोन्या रुप्याच्या पावलाने आली
आली आली गौराई, धन धान्याच्या पावलाने आली
मुळशी तालुक्‍यात गौरी पूजन उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्त महिलांनी गौरीसमोर विविध प्रकारची आकर्षक सजावट केली होती.
सोनपावलांनी काल मंगळवारी भाद्रपद शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा गौरीचे घरोघरी आगमन झाले. आगमन झाल्यावर भाजी भाकरीचा नैवैद्य दाखविण्यात आला. बुधवारी गौरी पूजन असल्याने महिला वर्गाने जय्यत तयारी केली होती. गेल्या तीन दिवसांपासून गौरीच्या स्वागतासाठी महिलांसाठी लगबग चालू होती. गौरी समोर आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.गौरीच्या स्वागतासाठी महिलांनी विविध प्रकारचे पदार्थ केले होते. लाडू, करंजी, चिवडा, अनारसे, चकली आदी पदार्थ महिलांनी ठेवले होते. तसेच विविध प्रकारच्या मिठाईंचा त्यात समावेश होता. पिरंगुट येथील सुनीता बाळासाहेब पवळे यांनी केलेली गौरीची आरास विशेष आकर्षण ठरली. त्यांनी गौरी नंदीवर विराजमान केल्या होत्या. त्याचबरोबर गौरीसमोर ठेवलेली विविध प्रकारची लहान भांडी विशेष ठरत होती. त्याचबरोबर मुशक रूपातील विविध वाद्य करणाऱ्या जवळपास 15 मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. यानिमित्त ठिकठिकाणी महिलांनी हळदी कुंकू समारंभासाठी गर्दी केली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)