सोनियांच्या नेतृत्वाखाली संसद आवारात निदर्शने

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीतील घोटाळ्याच्या प्रकरणी सरकारवरील आपला हल्ला अधिक तीव्र करताना युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी संसद भवनाच्या आवारात जोरदार निदर्शने केली. या विमान खरेदी प्रकरणातील आक्षेपांवर सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी सोनियांच्या समवेत खासदार गुलामनबी आझाद, राज बब्बर, आनंद शर्मा, अंबिका सोनी, कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा, आम आदमी पक्षाचे सुशिल गुप्ता इत्यादी सहभागी झाले होते. संसद भवन आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ ही निदर्शने झाली. या घोटाळ्याची संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमून चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणात पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी आणि यशवंत सिन्हा यांनीही राफेल व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप केल्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य आता वाढले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज कॉंग्रेसनही या प्रकरणी सरकारच्या विरोधातील आपली धार अधिक तीव्र केली. फ्रांस सरकारशी मोदी सरकारने राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. या करारातील विमानांच्या किंमती सरकारने जाहीर केलेल्या नाहींत. या किंमती जाहीर कराव्यात अशी कॉंग्रेसची प्रमुख मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)