सोनसाखळी चोरीतून निवडणूक लढविण्याचे मनसुबे

प्रतिष्ठित राजाभाऊ निघाला सराईत चोर : 44 गुन्हे उघड, लातूरमध्ये आलिशान घर

पुणे- शहर, जिल्ह्यात सोनसाखळी आणि पर्स चोरी गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या दोन सराईतांना पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांनी तब्बल 44 गुन्ह्यांमध्ये लांबविलेले सोन्याचे, चांदीचे दागिने, दोन मोटार सायकली आणि 10 मोबाइल असे एकूण 30 लाख 79 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यांनी आणखी गुन्हे केले आहेत. त्या अनुषगांने पोलीस तपास करत असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे आणि सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजु खेमु राठोड उर्फ राजाभाऊ खेमराज राठोड (वय 34, रा. वडगाव शेरी, मूळ एकंबी लमाणताडा, उजनी, ता. औसा, जि. लातूर) आणि शंकरराव उर्फ शिवा रामदास बिरादार (वय 34, रा. कदमवस्ती, लोणीकाळभोर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. उघड झालेल्या 44 गुन्ह्यात 22 पर्स हिसकावणे, 19 सोन साखळी आणि 3 वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

राजु हा मुख्य सुत्रधार आहे. त्याचे दुसरीपर्यंत शिक्षण झाले आहे. प्रथम तो बिगारी कामगार होता. यानंतर वायरमन म्हणून काम केले. तर, एमएसईबीद्वारे दिले जाणारे वीज मिटर आणि वायरिंग दुरूस्तीचीही कामे सुरू केली. परंतु, त्यातून जास्त उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे चोऱ्यांचा मार्ग स्वीकारला. लातूरमध्ये एक गुन्हा केल्यानंतर त्यात पैसेही मिळाले व कोणाला समजलेही नाही. त्यानंतर त्यांने सोन साखळी चोरीचा सिलसिलाच सुरू केला. लातूरमध्ये अनेक वर्ष या घटना सुरू होत्या.

पोलीस हैराण होते. यादरम्यान या पैशांमधून राजु हा राजाभाऊ झाला आणि त्याने सामाजिक कार्य करण्यास सुरूवात केली व तो शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती झाला. तसेच, राजकारणाला सुरूवात केली. त्यानंतर लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही भरला. परंतु, तेथील काही राजकारण्यांच्या विनंतीमुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला. एक मोठा बंगलाही बांधला. लातूर पोलीस या चोरट्याच्या मागावर होते. त्यावेळी पोलिसांनी सापळा कारवाईत सोन साखळी हिसकावताना रंगेहात पकडले. त्यावेळी तो प्रतिष्ठीत असणारा राजाभाऊ निघाला. यानंतर शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. कारागृहात असताना त्याची शंकरराव उर्फ शिवा याच्यासोबत ओळख झाली.

राजु उर्फ राजाभाऊ कारागृहातून बाहेर आला. परंतु, लातूरमध्ये राहून उपयोग नसल्याने तो पुण्यात आला. काही दिवसांनी शिवादेखील कारागृहातून सुटला. तोही पुण्यात आला. दोघांनी परत गुन्हे करण्यास सुरूवात केली.
शहरात पर्स हिसकावणारे आणि सोन साखळी चोरट्यांनी चांगलाच गोंधळ घातला होता. गुन्ह्यासाठी विशेषत: ते महिलांना टार्गेट करत होते. रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात सकाळच्या वेळेत त्यांनी जास्त गुन्हे केले आहेत. त्यावेळी युनिट-5 ला राजु राठोड बाबात माहिती मिळाली. त्यानुसार, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष तासगांवकर आणि पथकाने दोघांना ताब्यात घेतले.

जप्त माल आणि किंमत
सोने- 856.46 ग्रॅम- 23 लाख
चांदी- दोन अंगठ्या- साडेचार हजार
रोख रक्कम- 3 लाख 99 हजार
वाहने- 2 दुचाकी- 2 लाख
10 मोबाईल व इतर वस्तू- 1 लाख 11 हजार

चौकट 2
जुना मुंढवा रस्त्यावर टाकले हॉटेल
चोरीतून मिळालेले 15 लाख रुपये गुंतवणूक त्याने जुना मुंढवा रोडवर व्हेज-नॉनव्हेजचे नंदीनी नावाचे हॉटेल सुरू केले होते. तेथे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 1,200 रुपयांपासून, 5 हजार रुपयापर्यंतच्या थाळी त्याने ठेवल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)