सोनजाई देवस्थानला “क’ वर्ग दर्जा प्राप्त व्हावा 

महंत जगदीश गिरी : भूमिपूजन समारंभात केले प्रतिपादन 

वाई – सोनजाई देवीच्या मंदिराचा विकास झाल्यास पर्यटन वाढीसाठी सहकार्य मिळेल. त्यासाठी हे देवस्थान शासनाने ” क’ वर्ग देवस्थान म्हणून घोषित करावे व त्यासाठी तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, असे प्रतिपादन भीमा-शंकर येथील मठाधिपती श्रीमहंत जगदीश गिरी महाराज यांनी सोनजाई देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेल्या पाण्याच्या स्कीमचे भूमिपूजन समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना केले.

-Ads-

यावेळी पुसेगावच्या सेवागिरी मठाचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, झिरपवाडी (फलटण) चे अमृतगिरी महाराज, भांडवली (माण) चे महेशगिरी महाराज, सत्यानंदगिरी महाराज, सोनजाई मंदिराचे विश्‍वस्त मंगलगिरी महाराज, तुकाराम गिरी महाराज, कुंडलगिरी महाराज, आनंदगिरी महाराज, प्रा. विष्णु खरे, धनंजय राजपुरे, ठेकेदार राजेश पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

महंत जगदीशगिरी महाराज म्हणाले, सोनजाई देवीचे मंदिर अतिशय पुरातन असून या देवीला येणाऱ्या भक्तांची संख्या प्रचंड आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक दरवर्षी नवरात्र उत्सव व प्रत्येक महिन्यातील देवीच्या वारादिवशी येत असतात. सोनजाई देवीचे मंदिर हजारो फुट उंचीवर असल्याने या ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असते. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना याची झळ बसून सोयी-सुविधांपासून वंचित राहतात. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सोनजाई देवस्थान ट्रस्टने आपल्या परीने अनेक अडीअडचणींवर मात करून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु पाण्याची टंचाई जाणवत असल्याने या ठिकाणची शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

यावर मात करण्यासाठी देवस्थान ट्रस्टने अतिशय धाडशी पाऊल टाकत नागेवाडी धारणा शेजारी शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहीर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरातील नागरिकांचे व स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असून तमाम महाराष्ट्रातील भक्तांसह लोकप्रतीनिधिनी सोनजाई मंदीर परिसरातील प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात लक्ष घालून शासन दरबारी पाठपुरावा केल्यास या ठिकाणच्या पर्यटन वाढीसाठी मोलाचे सहकार्य मिळणार आहे. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमच मार्गी लागण्यास सहकार्य मिळेल असेही ते म्हणाले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विहिरीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)