सोनगाव खतनिर्मिती प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे

विरोधी पक्षनेता अशोक मोने:चौकशी करण्याची मागणी करणार

सातारा – सातारा शहरापासून जवळ असलेल्या सोनगाव कचरा डेपोत शहरातील कचरा टाकला जातो त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आल्याने याठिकाणी 15 कोटी रुपये खर्चून खतनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यापैकी 4 कोटीच्या कामास सुरुवात झाली आहे परंतु या कामाची देखरेख होत नसून सुपरवायझर, अधिकारी, पालिका कर्मचारी यापैकी कुणीच तिथे काम सुरु असताना थांबत नाही. त्यामुळे ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

नागरिकांचे कोटयावधी रुपये खर्च करुन असा प्रकल्प उभा राहणार असेल तर भविष्यात ते किती काळ सेवा देऊ शकेल याबाबत साशंकता आहे. नगराध्यक्षा आणि पदाधिका-यांनी पालिकेतील केबिनमध्ये टक्केवारीवर भांडण्यापेक्षा प्रत्यक्ष काम सुरु असलेल्या ठिकाणी वारंवार पाहणी करावी असा टोला पालिकेचे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे लगावला. तसेच या प्रकल्पाची जिल्हाधिका-यांनी त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सातारा शहरापासून जवळ असलेल्या सोनगाव कचरा डेपोतील खतनिर्मिती प्रकल्पाच्या कामाची पाहणी मंगळवारी विरोधी पक्षनेते अशोक मोने, नविआचे पक्षप्रतोद अमोल मोहिते, नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी केली. यापूर्वी अशी पाहणी केली असता नगरपालिकेचे कोणतेच कर्मचारी, अधिकारी उपस्थित नव्हते. परंतु मंगळवारी पाहणी करणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहिले परंतु नगराध्यक्षा, पदाधिका-यांपैकी कुणीच उपस्थित नव्हते. 15 कोटी पैकी 4 कोटी च्या कामास सुरुवात झाली आहे परंतु ठेकेदारांकडून कामाचा दर्जा राखला जात नाही. निविदामध्ये असलेल्या अटी व शर्थीचे पालन केले जात नाही. मंगळवारी पाहणी केली असता मुरुमाऐवजी मातीचा भराव टाकलेला आहे. पिलरची उभारणी लाईन दोरीत नाही. देखरेखीला कुणी नसल्याने होणा-या क्रॉकिटीकरणाचा दर्जाची शाश्वती देता येत नाही.

नगरपालिकेचे कुणीच जबाबदार उपस्थित नसल्याने ठेकेदाराचे फावत असून त्याच्याकडून काम संपवण्यावर भर दिला जात आहे. हा प्रकल्प झाल्याने सोनगाव कचरा डेपोतील कच-यावर प्रक्रिया होणार असून सोनगाव आणि आसपासच्या गावातील रहिवशांचा त्रास कमी होणार आहे. अशा या नागरिकांच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रकल्पाबाबत पालिकेचे सत्ताधारी गंभीर नाहीत. प्रकल्पाचे काम सुरु असताना वारंवार भेटी देऊन त्याची तपासणी केली पाहिजे म्हणजे ठेकेदारावर प्रकल्प योग्यरितीने पूर्ण करण्याची जबाबदारी राहील. प्रकल्पात त्रुटी राहून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचा त्रास नागरिकांना होणार आहे त्यामुळे वेळीच पालिकेच्या सत्ताधा-यांनी लक्ष दिल्यास प्रकल्प दर्जेदार होईल. प्रकल्पात त्रुटी राहिल्यानंतर नागरिकांच्या प्रश्नांना सत्ताधा-यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत असेही श्री. मोने यांनी स्पष्ट केली आहे. पालिकेच्या केबिनमध्ये बसून टक्केवारीवर भांडण्यापेक्षा आणि जनतेच्या पैशावर ठेकेदाराला पोसण्यापेक्षा सुरु असलेल्या कामाची पाहणी केली तर ते सातारकरांच्या दृष्टीने हिताचे ठरले.

तुम्ही ज्या पध्दतीने काम करत आहात ती पध्दत चुकीची असून केबिनमध्ये बसून साता-याचा विकास होणार नाही. निकृष्ट दर्जाची खतनिर्मितीसारखी प्रकल्पाची जी कामे सुरु आहेत त्यामुळे भविष्यात तुम्हाला सातारची जनता माफ करणार नाही. कचरा डेपोमुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलला प्रदूषित पाणी लोकांना प्यावे लागत असून हे सुध्दा दुर्देव आहे. त्यावरही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच आतापर्यंत झालेल्या कामाची जिल्हाधिका-यांनी त्रयस्थ यंत्रणेमार्फत गुणात्मक तपासणी करावी तसेच तपासणी होऊन अहवाल येत नाही तोपर्यंत बिले काढली जाऊ नयेत अशी मागणी करणार असल्याचेही विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी स्पष्ट केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)