#सोक्षमोक्ष: विरोधकांची आघाडी खरेच होणार का? 

हेमंत देसाई 
मोदी-शाह हेच पक्ष चालवत आहेत, हे वास्तव असले, तरी त्यांनी पक्षाला रिझल्ट्‌सही मिळवून दिले आहेत. तेव्हा याबाबत कॉंग्रेसने बोटे मोडण्याचे कारण नाही. भाजप मित्र जोडण्याबाबत जशा वेगवान हालचाली करत आहे, तसे कॉंग्रेसबाबत म्हणता येणार नाही. विरोधकांच्या महागठबंधनाची नुसती चर्चाच सुरू आहे. 
भडकलेल्या इंधनामुळे देशभर अस्वस्थता असून, खते, कीटकनाशके यांच्याही किमती वाढल्यामुळे शेतकरी बेजार आहेत. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ भारत बंद पार पडला असतानाच, तिकडे भारतीय जनता पक्षानेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अजेय भाजपची घोषणा दिली गेली आहे. भाजपला कोणीही पराभूत करू शकणार नाही, असा आत्मविश्वासच व्यक्त करण्यात आला आहे. इंडिया शायनिंग, सब का साथ सब का विकास, मेक इन इंडिया अशा आकर्षक घोषणांचे भाजपला आकर्षण आहेच. कार्यकारिणी अधिवेशनाच्या परिसरालाही सदैव अटल असे नाव देण्यात आले होते. येत्या निवडणुकीत अटलजींच्या नावाचा चांगलाच वापर करून घेण्यात येणार आहे, असे दिसते.
कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी काही दिवस भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी आयोजित केली होती. त्यामध्ये केंद्र व राज्याच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला होता. येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका व 2019 मधील लोकसभा निवडणुका जिंकण्याची पद्धतशीर पूर्वतयारी भाजपने केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
भाजपशासित सरकारांच्या विविध योजनांचा लाभ 22 कोटी नागरिकांना झाला आहे आणि हे लाभार्थी मतदानकेंद्रावर येतील यासाठी प्रयत्न करावेत, असा निर्णयही बैठकीत झाला. पक्षाने विजयप्राप्तीसाठी कसे चातुर्याने नियोजन केले आहे बघा! या निवडणुका अमित शाह यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यासाठी, त्यांच्या पक्षाध्यक्षपदाची मुदत वाढवण्यात आली आहे. पक्षाच्या दृष्टीने हा योग्यच निर्णय असून, शाह पायाला भिंगरी लावून देशभर फिरत आहेत. पक्षात त्यांना आव्हान देण्याच्या स्थितीत कोणीही नाही. मोदी-शाह हेच पक्ष चालवत आहेत, हे वास्तव असले, तरी त्यांनी पक्षाला रिझल्ट्‌सही मिळवून दिले आहेत. तेव्हा याबाबत कॉंग्रेसने बोटे मोडण्याचे कारण नाही. भाजप देश जोडण्याचे काम करत असतानाच, कॉंग्रेस मात्र देश तोडण्याचे काम करत आहे, अशा आरोप शाह यांनी केला. तो हास्यास्पद असून, धर्माधर्मात फूट पाडण्याचे काम कोण करत आहे, हे सर्वश्रुत आहे. अनुसूचित जाती व जमाती कायद्यावरून विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत व समाजात दुही माजवू इच्छीत आहेत, असा आरोपही शाह यांनी केला. वास्तविक गेल्या चार वर्षांत देशातील दलितांवरील अत्याचार वाढले असल्याचे आकडेवारीही सांगते. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींत न्यायालयाने बदल सुचवला, तेव्हा केंद्र सरकारने तातडीने हालचाल केली नव्हती. रालोआ आघाडीतील रामविलास पासवान यांच्यासारख्या नेत्यांनीही याविरुद्ध आवाज उठवला. तसेच विरोधकांनी भारत बंद केला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली… त्यामुळे याबाबत भाजपने विरोधकांवर आरोप करण्याचे कारण नाही.
भाजप निवडणुकीस सिद्ध होत असताना, विरोधकांच्या हालचाली मात्र संथगतीने होत आहेत. भाजपविरोधी फेडरल फ्रंट उभारण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यंनी तेलंगणचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. परंतु राव यांनी विधानसभा बरखास्त करून, मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा केली आहे. ती करताना, कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राव यांनी अर्थातच आपली पातळी सोडली. परंतु आपण फेडरल फ्रंटबरोबर जाणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले. त्यामुळे भाजपला अत्यानंद झाला आहे. गेल्या महिन्यात राज्यसभा उपसभापतींच्या निवडणुकीत टीआरएसने गैरहजेरी लावून, अप्रत्यक्षपणे भाजपला मदतच केली होती. आता तर केसीआर हे थेट भाजपच्याच छावणीत दाखल झाले आहेत. तेलंगणमधील टीआरएस-भाजप यांच्या संभाव्य युतीस तोंड देण्यासाठी, कॉंग्रेस तेलुगू देसमचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबर आघाडी करण्याचे प्रयत्न करणार आहे. परंतु भाजप मित्र जोडण्याबाबत जशा वेगवान हालचाली करत आहे, तसे कॉंग्रेसबाबत म्हणता येणार नाही. विरोधकांच्या महागठबंधनाची नुसती चर्चाच सुरू आहे.
राहुल गांधी यांनी कैलासयात्रा केली, तर अमित शाह यांनी राज्याराज्यात भेटी देऊन, तेथील कार्यकर्त्यांना अगोदरपासूनच प्रोत्साहित केले आहे. इतर पक्षांशी आघाडी करण्याची जबाबदारी राहुलजींनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी व त्यांच्या सल्लागारांवर टाकली आहे. वास्तविक ते पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी याबाबत कधीतरी पुढाकार घेतलाच पाहिजे. शिवाय सोनियाजींची प्रकृतीही तितकीशी बरी नसते.
मध्य प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी कमलनाथ यांची मागेच निवड झाली आहे. ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून सलग नऊवेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांची वैयक्तिक लोकप्रियता व मतदारसंघातील काम वादातीत असले, तरी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांच्याबरोबर त्यांची बोलणी बरेच महिने नुसतीच सुरू आहेत. अद्याप त्याची फलश्रुती काहीच नाही. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने माझ्याबरोबर आघाडी करावी, अन्यथा कुठेच नको, या मुद्‌द्‌यावर मायावती ठाम आहेत. उत्तर प्रदेशात बसपा-सपा यांनी संयुक्तपणे पोटनिवडणुका लढवून यश मिळवले. लोकसभा निवडणुका ते एकत्रच लढवणार आहेत. परंतु आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना मायावतींच्या भेटीला पाठवून, बसपा-सपा आघाडी होऊ नये, यासाठी शाह धडपडत आहेत. मायावतींविरुद्धचे भ्रष्टाचाराचे प्रकरणही उकरले जाऊ शकते. आपल्या बाजूने नेत्यांना वळवण्यासाठी दबावतंत्र कसे वापरायचे, हे भाजपला नीट ठाऊक आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहेत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. परंतु अजून आघाडीची कोणतीही चर्चा नाही, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर करून टाकले…महाराष्ट्रातील जनसंघर्ष यात्रेच्या वेळी कोल्हापुरात लोकसभेची उमेदवारी कॉंग्रेस की राष्ट्रवादीच्या व्यक्तीला द्यायची, यावरून मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्रात लोकसभेच्या 168 जागा आहेत. बिहारमध्ये नीतीशकुमार यांच्या जदयूने आपल्याबरोबर यावे, असे कॉंग्रेसला वाटते. शाह यांनी नीतीशकुमार यांच्याबरोबरचे जागावाटपाबद्दलचे मतभेद ताबडतोब दूर केले. तर तिकडे राष्ट्रीय जनता दलाचे तरणेबांड नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव गरजले की, नीतीशकुमारांबरोबर पुन्हा युती केवळ अशक्‍य. महाराष्ट्रात शिवसेनेला बरोबर घेतले, तर त्याचा कॉंग्रेस व राष्ट्रवादीला फायदाच होणार आहे. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोघेही सातत्याने शिवसेनेलाच लाखोली वाहत आहेत.
निवडणुका जवळ येत चालल्या असून, प्रादेशिक पक्ष आपापले गड सुरक्षित करण्याच्या मागे आहेत. भाजपविरोधातील प्रादेशिक तसेच छोटे पक्ष यांचे महागठबंधन उभारण्यात कॉंग्रेसला अद्याप यश मिळालेले नाही. त्यामुळे 2019 मध्ये भाजपला आव्हान कसे देणार हा प्रश्‍नच आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)