#सोक्षमोक्ष: भाजपतर्फे शिवपाल यांचा प्रतिपाळ?

हेमंत देसाई

आपल्याला पक्षात सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याची खंत काही दिवसांपूर्वीच मुलायमसिंह यादव यांनीही व्यक्‍त केली आहे. मात्र, हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नाही. मुलायम व शिवपाल यादव यांना भाजपच्या दरवाजात नेऊन ठेवण्यासाठी अमरसिंह मध्यस्थाची भूमिका वठवत आहेत.

दोन वर्षांपूर्वी मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीत घमासान सुरू झाले होते. मुलायम व त्यांचे बंधू शिवपाल यादव एकीकडे व मुलायम यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्याचे चुलते रामगोपाल यादव दुसरीकडे, असे चित्र निर्माण झाले होते. मुलायम यांच्याशी भांडण करून आणि आझम खान यांच्याशी उभा दावा मांडून पक्षाबाहेर गेलेले उपद्‌व्यापी राजकीय दलाल अमरसिंह त्यावेळी मुलायमसिंहांच्या बाजूने उतरले.

सध्या आझम खान व अमरसिंह यांच्यात अत्यंत खालच्या स्तराचे भांडण सुरू आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी अखिलेशने कॉंग्रेसशी आघाडी केली होती. अखिलेश व राहुल यांची पोस्टर्स “यूपी के दो लड़के’ अशा कॅचलाइनसह झळकली होती. त्यावेळी मुलायम व शिवपाल यांनी भाजपबाबत सॉफ्ट भूमिका घेतली होती. परंतु सपामधील मुलायम यांची सद्दी अखिलेशने संपवली असल्यामुळे त्यांचे काही चालले नाही. आता मात्र शिवपाल यांनी “समाजवादी सेक्‍युलर मोर्चा’ स्थापन केला असून, त्यामुळे सपामध्ये फूट पडली आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकांत सपा व बसपा एकत्र येणार आहेत. शिवपाल यादवांच्या या मोर्चात छोटे पक्ष आणि सपाने दुर्लक्षित केलेले समाजघटक असतील, असा दावा केला जात आहे.

सपामधील गुंड प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व शिवपाल यादव करतात. त्या पक्षाचे सरकार असताना भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले, त्यात शिवपाल गटाचाही मोठा वाटा होता. स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची त्यांची कोणतीही तात्त्विक भूमिका नाही. वास्तविक गेल्या वर्षीच स्वतंत्र पक्ष वा आघाडी स्थापण्याची तयारी त्यांनी केल्याचे बोलले जात होते. मात्र “जब नहीं पूछा जा रहा है, नहीं बुलाया जा रहा है, नहीं काम दिया जा रहा है, तो मैंने एक समाजवादी सेक्‍युलर मोर्चा बनाया है’, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

शिवपाल व काही भाजप नेत्यांची बैठकही अमरसिंह यांनी आयोजित केल्याचे त्यांनीच लखनौमध्ये सांगितले होते. चार महिन्यांपूर्वी शिवपाल यांनी दिल्लीत सपाचे सरचिटणीस, रामगोपाल यादव यांची भेट घेतली होती. “लोकसभा निवडणुकांपूर्वी अखिलेश व शिवपाल हे गट आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येतील’, असे तेव्हा ठरले होते. अर्थात, शिवपाल यांनी पक्षावर दबाव आणण्याचाच हा प्रयत्न होता; परंतु त्यानंतरही त्यांना पक्षात कवडीची किंमतही देण्यात आली नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीवरही त्यांना घेण्यात आले नाही. सपाच्या दृष्टीने यात काही वावगे झाले आहे, असे बिलकुल नाही. याचे कारण मुलायम यांचा करिष्मा कमी झाला असून, शिवपाल यांना कसलाही जनाधार नाही.

मागच्या विधानसभा निवडणुकीत सपाचे पानिपत झाले असले, तरी तेव्हा मोदींची लाट होती, हे लक्षात घेतले पहिजे. त्यामुळे त्यावेळी भाजपला जबरदस्त यश मिळून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनले. तेव्हा उत्तर प्रदेशात कोणाचेही राज्य असते, तरी त्या पक्षाचा व सरकारचा निवडणुकीत धुव्वाच उडाला असता. मात्र, त्यानंतर झालेल्या विविध पोटनिवडणुकांत बसपाशी आघाडी करून अखिलेश यांनी यश मिळवले. त्यापूर्वी अखिलेशने बंड करून मुलायमसिंह यांची पक्षाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आणि शिवपाल यांना तर पक्षाबाहेर काढले. त्यानंतर ते पुन्हा पक्षात आले, हा भाग वेगळा. सन 2017 च्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत मुलायम-अखिलेश यांचा वाद निवडणूक आयोगाच्या दरवाजापर्यंत गेला होता.

विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर शिवपाल यांनी पक्षापासून दूर अंतरावर राहणे पसंत केले; परंतु आग्रा येथे गेल्या ऑक्‍टोबरात पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले, तेव्हा शिवपाल यांनी पुतण्याला शुभेच्छा पाठवल्या होत्या. गेल्या मार्च महिन्यात राज्यसभा निवडणुकांपूर्वी अखिलेशने आयोजित केलेल्या एका भोजन समारंभास शिवपालजी हजर राहिले होते. फुलपूर, गोरखपूर व कैराना लोकसभा पोटनिवडणुकांत सपा-बसपाने भाजपचा पराभव केल्यानंतर अखिलेशचा आत्मविश्वास दुणावला आहे. दरम्यान, शिवपाल यांनी नुकतीच भाजप आघाडीतील सुहेल देव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांची भेट घेतली होती.

यावरून सपाची मते फोडण्यासाठी भाजपनेच शिवपाल यांना हाताशी धरले आहे, असे दिसते. अखिलेश मुख्यमंत्री झाले, ते सन 2012 मध्ये. त्यावेळी मुख्यमंत्री होण्याची शिवपाल यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु नाइलाजाने त्यांना मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे स्थान स्वीकारणे भाग पडले. शिवपाल यांच्याच प्रयत्नामुळे सन 2017 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी अमरसिंह यांचा सपात पुन्हा प्रवेश झाला. पक्षातून आपली हकालपट्टी करून, पक्षाची सूत्रे शिवपाल यांच्याकडे सोपवण्याचे कारस्थान अमरसिंह यांनी रचले आहे, असा अखिलेश यांना रास्त संशय होता. अमरसिंह यांच्यामुळेही काका-पुतण्यातील दुष्मनी वाढली.

या कारस्थानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी रामगोपाल यादव पुतण्याच्या मदतीस धावले. जेव्हा मुलायम यांच्या हातात पक्षाची सूत्रे होती, तेव्हा शिवपाल व अमरसिंह यांची दुकाने जोरात सुरू होती. आता मोदी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी देशव्यापी आघाडीचे प्रयत्न सुरू असतानाच, ते हाणून पाडण्याची योजना अमरसिंह व शिवपाल यांनी आखलेली दिसते.

यातून सपाची ताकद कमी होणार असून, त्याचा भाजपला फायदाच होणार आहे. सपा, बसपा कॉंग्रेस व राष्ट्रीय लोकदल अशी बडी आघाडी किंवा महागठबंधन आकारास येत असून, त्यामुळे राज्यातील भाजपच्या लोकसभेच्या जागा कमी होण्याची शक्‍यता आहे. गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत सपा-बसपाने करामत करून दाखवली आहे. ज्या जागेवरून सलगपणे पाचवेळा योगी आदित्यनाथ निवडून आले होते, तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. गोरखपूरमध्ये गोरखनाथ मठाचा मोठा प्रभाव आहे. असे असूनही हे घडल्यामुळे भाजप काळजीत आहे. अशा संकटकाळी मुलायम व शिवपाल भाजपच्या मदतीला धावून आलेले दिसतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)