#सोक्षमोक्ष: पवारांचे टायमिंग काय सुचवतेय? 

हेमंत देसाई 
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मुख्य प्रवक्ते नवाब मलिक तसेच जितेंद्र आव्हाड हे भाजपच्या ठाम विरोधातील आहेत. त्यामुळे पवारांच्या बाजूने सारवासारव करण्यास पक्षाने नवाबजींना पुढे केले. पण त्यात त्यांना यश न आल्यामुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावर ती जबाबदारी आली. परंतु नागरी हवाईमंत्री असताना प्रफुल्लभाईंनी केलेली विमानांची खरेदी वादग्रस्त ठरली होती. चौकशीचे शुक्‍लकाष्ठ मागे लागू नये म्हणून प्रफुल्लभाई भाजपशीही संबंध ठेवून आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून, भ्रष्ट आहेत, असा आरोप कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे सतत करत आहेत. थेट पुरावा नसताना पंतप्रधानास भ्रष्ट म्हणणे, हे जरा अतीच झाले. परंतु तरीही राहुलजींनी राफेल विमानांच्या खरेदीबाबत जे सवाल उपस्थित केलेले आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. कॉंग्रेस हा पक्ष भ्रष्ट असून, भाजपचे कपडे मात्र ड्रायक्‍लीन केलेले आहेत, असा दावा केला जातो. हा दावा सपशेल खोटा असल्याचे सिद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून राफेल व्यवहार हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. लोकपालाची नियुक्‍ती करण्यासदेखील मोदी सरकारने सव्वाचार वर्षे लावली. कर्जबुडव्या उद्योगपतींना देशाबाहेर जाऊ दिले.
त्यापैकी उद्योगपती विजय मल्ल्‌या यांना देशाबाहेर जाऊ देण्यास मदत करणारा सीबीआयमधील अधिकारी मोदींच्या विश्‍वासातील होता. आता तर सीबीआयमधील दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांमध्येच जाहीर वाक्‌युद्ध पेटले असून, मोदींच्या काळात तपासयत्रणांचा यथेच्छ गैरवापर होत आहे. हे सर्व असतानादेखील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पावर यांनी, राफेल विमाने उत्तम असून, पंतप्रधानांच्या हेतूंबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, अशा आशयाचे वक्‍तव्य केले. देशात व महाराष्ट्रात कॉंग्रेस हा राष्ट्रवादीचा सर्वात जवळचा मित्रपक्ष आहे. असे असताना, कॉंग्रेसच्या पायात पाय घालण्याचे काम पवारांनी केले आहे. त्यामुळे संतापून जाऊन, राष्ट्रवादीच्या अमर-अकबर-अँथनीतील, अकबर ऊर्फ तारीक अन्वर यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. राफेल प्रकरणी पवारांनी मोदींची केलेली पाठराखण तारीकजींना पसंत नव्हती.
बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणी संसदीय चौकशी समिती नेमण्याची विरोधकांची मागणी कॉंग्रेसने मान्य केली होती. त्याचा काही उपयोग झाला नाही, परंतु अशी समिती राफेल प्रकरणीही नेमण्यास हरकत नाही, असे मत पवारांनी व्यक्‍त केले. मोदींची पालखी उचलली, असा आरोप होऊ नये म्हणूनच पवार यांनी हे उद्‌गार काढले असावेत. तसेच राफेल प्रकरणी तांत्रिक माहिती जाहीर करण्याची मागणी योग्य नसल्याचे मत पवार यांनी व्यक्‍त केले. वास्तविक अशी तांत्रिक माहिती द्यावी, ही मागणी कॉंग्रेसने कधीही केलेली नाही. राफेल व्यवहारात उद्योगपती अनिल अंबानींचे नाव मोदी सरकारनेच घुसवले, असा स्पष्ट आरोप फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलान्द यांनी केला होता. मात्र अनिल अंबानींबद्दल पवार एक अक्षरही बोलले नाहीत. ज्या चॅनेलने पवारांची मुलाखत घेतली, तो चॅनेल अनिल यांचे वडील बंधू मुकेश अंबानी यांच्या मालकीचा आहे.
शिवाय पवार आजवर अंबानी असोत व कोणत्याही उद्योगपतीबद्दल कधीही विरोधात बोललेले नाहीत. राहुल बजाज, अजित गुलाबचंद, विनोद दोशी किंवा अगदी विजय मल्ल्या हे त्यांच्या दोस्तीतले आहेत. पवार यांची मोदीस्तुती ऐकून, भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी लगेच ट्विप्पणी करून, पवारांची अप्रत्यक्ष प्रशंसाच केली. एकीकडे भाजपविरोधी देशव्यापी आघाडी उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असा दावा करून राष्ट्रीय राजकारणात आपण कशी महत्त्वाची भूमिका निभावत आहोत, हे दाखवण्याचा पवार प्रयत्न करत असतात. पण पवार हा असा नेता आहे की, त्यांना भाजप आघाडीतही वजन निर्माण करायचे आहे आणि विरोधी आघाडीतही. मात्र पवारांची ही चलाखी न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मुख्य प्रवक्ते नवाब मलिक तसेच जितेंद्र आव्हाड हे भाजपच्या ठाम विरोधातील आहेत. त्यामुळे पवारांच्या बाजूने सारवासारव करण्यास पक्षाने नवाबजींना पुढे केले. पण त्यात त्यांना यश न आल्यामुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावर ती जबाबदारी आली. परंतु नागरी हवाईमंत्री असताना प्रफुल्लभाईंनी केलेली विमानांची खरेदी वादग्रस्त ठरली होती. चौकशीचे शुक्‍लकाष्ठ मागे लागू नये म्हणून प्रफुल्लभाई भाजपशीही संबंध ठेवून आहेत.
अंबानींसारख्या उद्योगपतींशी त्यांचा दोस्ताना आहे. त्यामुळे पटेल यांच्या स्पष्टीकरणाने कोणाचेही समाधान झाले नाही.
त्यानंतर पवारकन्या सुप्रिया सुळे या पित्याच्या मदतीसाठी धावून गेल्या. पवारांची मुलाखत ट्विस्ट करण्यात आली, त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, वगैरे खुलासे करण्यात आले. संबंधित चॅनेलच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्‌द्‌यावरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षास पवारांवर टीका झालेली मात्र सहन होत नाही. राफेलवरून राष्ट्रवादी भाजपची कड घेत असल्याचे आरोप होताच, जितेंद्र आव्हाड तसेच राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे प्रभृतींनी ठाण्यात आंदोलन करण्याचे नाटक कले. त्यापूर्वी गेले काही महिने राफेल प्रकरण गाजत असताना मात्र राष्ट्रवादी कधीही रस्त्यावर आली नाही.
मुळात शरद पवार यांचे राजकारण विरोधात असतानाही सत्तेच्या आधारावरच होते. सत्ताधाऱ्यांशी ते कधीही पंगा घेत नाहीत. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी त्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे म्हणून नेमले होते. पवार तेव्हा स्वतःच राजकीय आपत्तीत सापडले असल्यामुळे, त्याचे निवारण करण्यासाठी ही नेमणूक करण्यात आली. गुजरात दंगलीत मोदी दोषी नसल्याचे न्यायालयाने सांगितल्यानंतर, या प्रश्‍नाची आणखी चर्चा करण्याचे कारण नाही, अशी भूमिकाही पवारांनी घेतली होती. मोदींनी राजधर्म पाळला नसल्याचे वाजपेयींचे मत होते. परंतु पवारांना मात्र हा विषय आणखी वाढवू नये, असे वाटत होते.
कॉंग्रेसचे अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही प्रफुल्ल पटेल यांनी आधी कॉंग्रेसच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनंतर राज्याच्या स्थैर्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. बारामतीतील पवारांचे वर्चस्व आणि काका – पुतणे या विषयावर कोरडे मोदी-शाह यांनी 2014
च्या निवडणुकांच्या वेळी ओढले होते. बारामतीत सुप्रिया सुळे लोकसभेसाठी उभ्या असताना मात्र मोदी तेथे भाजपच्या प्रचारासाठी गेले नव्हते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार पवारांनी वाचवले. त्यानंतर लगेच मोदींनी आपल्या राजकीय गुरूबद्दल जाहीरपणे स्तुतिसुमने उधळण्यास सुरुवात केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तर बारामतीत जाऊन, पवार हे विकासपुरुष असल्याचे गौरवोद्‌गार काढले. पवारांचे आताचे विधान व त्याची वेळ बरेच काही सूचित करणारी आहे, एवढे मात्र नक्‍की.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)