सोक्षमोक्ष: थरूर चुकीचे कुठे बोलले?   

File photo

हेमंत देसाई 

माजी परराष्ट्र तसेच मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, कॉंग्रेस नेते आणि विख्यात लेखक शशी थरूर हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने प्रकाशझोतात राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत “द हिंदु लिट फॉर लाईफ डायलॉग’च्या कार्यक्रमात थरूर म्हणाले, अयोध्येत रामाचा विशिष्ट जागीच जन्म झाला आणि म्हणून तेथेच राममंदिर झाले पाहिजे, अशी बहुसंख्य हिंदू लोकांची भावना आहे याची मला जाणीव आहे. परंतु दुसऱ्या कोणाचे धर्मस्थळ तोडून तेथे मंदिर बांधले जावे, असे कोणत्याही चांगल्या हिंदू व्यक्तीस वाटणार नाही.’ 

थरुर यांच्या या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. “सज्जन हिंदूंचा राममंदिराच्या उभारणीस विरोध आहे’, असे उद्‌गार थरुर यांनी काढल्याचे भाजपचे मंत्री आणि प्रसारमाध्यमे सांगू लागली. सर्वोच्च न्यायालयात राममंदिराचा खटला येण्यास काही दिवस असतानाच, ही कॉंट्रोव्हर्सी जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली. मध्यंतरी थरुर यांनीच “भारताचा हिंदू पाकिस्तान’ होऊ नये याची काळजी घ्यावी’, असे प्रतिपादन केले होते. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंना त्यांनी पाकिस्तानी’ अशी शिवी हासडली, असा प्रचार भाजपवाल्यांनी करण्यास सुरुवात केली. आता त्यांच्या आणखी एका वक्तव्याने वादळ निर्माण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्ष 2012 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्याने नरेंद्र मोदींबद्दल लिहिताना म्हटले होते, “शिवलिंगावर एक विंचू बसला आहे. तुम्ही तुमच्या हाताने तो दूर फेकू शकत नाही आणि चपलेने तो मारूही शकत नाही.’ लेखातील हे वाक्‍य उद्धृत करून, थरूर म्हणाले की, मोदींचे व्यक्तिवादी वर्तन संघाच्या लोकांनाही बेचैन करते. त्यामुळे ते मोदींना सहन करतात. हिंदुत्वाची चळवळ आणि मोदीत्वामधून त्याचे होणारे दर्शन, या दोन्हींमध्ये कसा फरक आहे, हे या उदाहरणावरून स्पष्ट होते.’ वास्तविक भारताचा धर्मनिरपेक्ष ढाचा अबाधित रहिला पाहिजे. तसा तो न राहिल्यास, भारताचे रूपांतर पकिस्तानात होईल, असे त्यांनी आपल्या “हिंदू पाकिस्तान’ या प्रतिक्रियेद्वारे व्यक्त केले होते. त्यात कोणतीही चूक नव्हती. कारण अडवाणींच्या रथयात्रेपासून भारतात धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणास गती आली आणि तेथून क्‍शन-रिक्‍शनचा सिलसिला सुरू झाला. बाबरी मशिदीचे रक्षण करण्यास नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकार साफ अयशस्वी ठरले. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांत कॉंग्रेसचा पराभव झाला. भाजपच्या सत्तेचा रस्ता साफ झाला. अर्थात हे सरकार अल्पायुषी ठरले, हा भाग वेगळा.

वर्ष 2014 मध्ये “मोदी लाट’ आली आणि कॉंग्रेस पक्ष अक्षरशः हतबल झाला. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यापासून, रा. स्व. संघाला थेट अंगावर घेण्यास सुरुवात केली आहे. संघाच्या विचारसरणीचाच कॉंग्रेसला मुकाबला करायचा आहे, हे त्यांना पक्के ठाऊक आहे. परंतु कॉंग्रेसचे अन्य काही नेते व प्रवक्ते हे लेचेपेचे आहेत. एका प्रवक्‍त्याने तर, थरूर यांच्या “हिंदू पाकिस्तान’ या विधानाशी कॉंग्रेस पक्ष असहमत असल्याचे सांगून टाकले. हा शुद्ध भेकडपणा व भंपकपणा होता. आता थरूर यांच्या “विंचवाच्या’ विधानानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्यावर आततायीपणे टीका केली आहे. “तमाम हिंदू बांधवांचा थरूर यांनी अपमान’ केल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. वास्तविक “पिंडीवरचे विंचू’ हा शब्दप्रयोग आपल्याकडे रूढ आहे. शिवाय त्यांनी एका लेखामधील हे वाक्‍य असल्याचे स्पष्ट केले होते. संघपरिवारात दोन विचारप्रवाह कसे आहेत ते स्पष्ट करत, त्यांनी तेथे “आपलेच दात आपलेच ओठ’ अशी परिस्थिती असल्याचेच अधोरेखित केले. हे योग्यच होते.

थरूर यांचे मोदी यांच्याविषयीचे “द पॅराडॉक्‍सियल प्राइम मिनिस्टर’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले असून, त्यानिमित्त काही कार्यक्रमही होत आहेत. मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. भयग्रस्त लोक, अस्थिर अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, शेतीचे उध्वस्तीकरण आणि असुरक्षित सीमा हे वर्तमान वास्तव असल्याचे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करताना सांगितले. “स्वच्छ भारत’, “कौशल्य विकास’, “मेक इन इंडिया’ आणि “बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ हे कार्यक्रम स्वागतार्ह होते. परंतु त्यांचीही नीट अंमलबजावणी झाली नाही. या देशाच्या शिल्पकारांनी अनेकतावादी, धर्मनिरपेक्ष, समतापूर्ण आणि पूर्ण स्वातंत्र्य असलेल्या राष्ट्राची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु या राष्ट्राचा पायाच उखडून टाकण्याचे प्रयत्न मोदी करत असल्याची टीका डॉ. सिंग यांनी केली आहे.

खरे तर, 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्या काही वक्तव्यांचे थरूर यांनी स्वागत केले होते. “सब का साथ सब का विकास’, यासारख्या त्यांच्या घोषणांमुळे आशा निर्माण झाली आणि थरूर यांनी त्यांचे कौतुकही केले. परंतु गेल्या साडेचार वर्षांत “मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्‍झिमम गव्हर्नन्स’ वगैरे केवळ वल्गनाच ठरल्या. पंतप्रधानांच्या कार्यालयातच सर्व सत्तेचे केंद्रीकरण झाले. “मोदी हे उत्तम सेल्समन असून, जनसंपर्क व मार्केटिंगमध्ये तरबेज आहेत. परंतु ते रिकामीच खोकी विकत आहेत’ असा शेरा थरूर यांनी रास्तपणे मारला आहे. थरूर यांनी अनेक वर्षे संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात उच्च पदांवर काम केले. त्यांचे नशीब जोरावर असते, तर वर्ष 2006 मध्ये ते बान की मून यांच्याऐवजी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बनले असते.

थरूर यांचे शेकडो लेख “न्यूयॉर्क टाइम्स’, “वॉशिंग्टन पोस्ट’, “टाइम’, “न्युजवीक’ अशा जगप्रसिद्ध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी कादंबरीही लिहिली आहे आणि इतिहास, संस्कृती, परराष्ट्र नीती, राजकारण व सामाजिक विषयांवर 17 पुस्तके लिहिली असून, त्यांचा खपही चांगला आहे. मात्र पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर थरूरही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तसेच उच्चभ्रू वर्तुळापुरतेच त्यांचे नाव सीमित राहिले आहे. केरळमधून ते लोकसभेवर निवडून येत असले, तरी थरूर हे देशव्यापी लोकप्रियता असलेले कॉंग्रेस नेते नाहीत. परंतु कॉंग्रेसला लोकप्रिय नेत्यांप्रमाणेच सुबुद्धपणे मांडणी करणारे वैचारिक नेतृत्वही आवश्‍यक आहे. पी. चिदम्बरम यांच्याप्रमाणेच थरूरदेखील तर्कशुद्ध, मुद्देसूद आणि रोखठोक बोलणारे आहेत. दोघांच्या मागे तपासयंत्रणांचा फेरा लागला असला, तरी ते संघ-भाजपवर तुफान हल्ला करतच आहेत. बुळबुळीत व पचपचीत भूमिका घेणाऱ्या कॉंग्रेसवाल्यांनी त्यांच्यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)