सोक्षमोक्ष : तेलंगणचा कौल कुणाच्या बाजूने?   

हेमंत देसाई 

तेलंगण विधानसभेत 119 जागा आहेत. 2014 च्या विधानसभेत भाजपने तेलुगू देसम पक्षाशी आघाडी कली होती. त्यावेळी भाजपला पाच आणि देसमला 15 जागा मिळाल्या होत्या. आता भाजपसमवेत तेलुगू देसमसारखा तगडा पक्ष नाही. तेलंगणमधील तिरंगी लढतीत शेवटच्या टप्प्यात भाजप टीआरएसला मदत करणार, की त्याच्याशी दोन हात करणार हे स्पष्ट झालेले नाही. वरून एकमेकांविरुद्ध लढल्यासारखे दाखवायचे आणि आतून युती करायची, असेही घडू शकते. 

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या वेळापत्रकात तेलंगणचे सर्वात शेवटी नाव आहे. तेथे 6 व 7 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. तेलंगण हे एकमेव राज्य असे आहे की, जेथे मुदतपूर्व विधानसभा निवडणुका होत आहेत. लोकसभा व विधानसभा या निवडणुका अलग अलग झाल्या, तरच आपण यशस्वी होऊ, हे लक्षात घेऊन, तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष आणि (आता काळजीवाहू बनलेले) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी हा निर्णय जाहीर केला.

कॉंग्रेस नेतृत्वाखालील तेलुगू देसम पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तेलंगण जनसमिती यांच्या आघाडीवर (“प्रजाकुतामी’) राव सातत्याने टीका करत आहेत. “तेलंगणची अस्मिता माझ्यामुळेच जपली जाऊ शकते’, असा त्यांचा दावा आहे. भाजपानेदेखील टीआरएस आघाडीला लक्ष्य केले आहे. याखेरीज एआयएमआयएम हा असदुद्दीन ओवैसींचा पक्षही रिंगणात आहे. मागच्या वेळी या पक्षाने वीसपैकी सात जागा जिंकल्या होत्या.

तेलंगणची अर्थव्यवस्था कृषी-आधारित आहे. जवळपास 55 लाख लोक शेतीचे खातेदार आहेत. गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या पाण्यातून शेती केली जात असली, तरी बहुसंख्य पिके पावसावर अवलंबून आहेत. सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारी “रयतबंधू योजना’ राबवली आहे. तलावांमधील गाळ काढण्यासाठी “मिशन काकाटिया’ सुरू करण्यात आले आहे. शिवाय 42 लाख शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. परंतु तरीही राज्यात गेल्या चार वर्षआंत 4500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. केसीआर यांनी शेतकऱ्यांचा उद्धार केला असेल, तर इतक्‍या शेतकरी आत्महत्या होण्याचे कारण काय? किमान आधारभाव मागितले, म्हणून “खम्माम’ शेतकऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या, हे लोक विसरलेले नाहीत, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. अर्थात मध्य प्रदेशातील मंदसौर येथे भाजपच्या शिवराजसिंह चौहान सरकारने शेतकऱ्यांवर बेछूटपणे गोळीबार केला होता, याचेही विस्मरण जनतेला झालेले नाही.

तेलंगणमधील शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई न देता, त्यांची जमीन बळकावली जात आहे, अशी टीका कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार काहीही करत नसल्याची टीकाही केली जात आहे. ही टीका विचारात घेऊन, बेरोजगारांना दरमहा तीन हजार रुपये भत्ता दिला जाईल, असे आश्‍वासन टीएरएसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. पण सरकारी कार्यालयातील रिकामी पदे भरण्याऐवजी, मोफत भत्ता देण्याचे आश्‍वासन देऊन तरुणांचा अपमान केला जात आहे, अशी टीका भाकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरावरम सुधाकर रेड्डी यांनी केली आहे. कॉंग्रेसने तर प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देण्याचे वचन दिले आहे.

मात्र टीआरएसचे दोन प्रमुख नेते कॉंग्रेसमध्ये गेले आहेत. तेलंगण राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष टी. नरसा रेड्डी आणि विधान परिषदेतील आमदार एस. रामुलु नाईक यांनी कॉंग्रेसप्रवेश केला आहे. यापैकी नाईक हे टीआरएसचे संस्थापक सदस्य आहेत. टीआरएसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार डी. श्रीनिवासही कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत. श्रीनिवास हे वर्ष 1969 पासून कॉंग्रेसमध्येच होते. पण वर्ष 2015 मध्ये ते टीआरएसमध्ये आले होते. ते आंध्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते.

वर्ष 2014 मध्ये नरसा रेड्डी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून टीआरएसविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली होती. व्ही. प्रताप रेड्डी यांनी तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार म्हणून याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. नरसा रेड्डी व प्रताप रेड्डी दोघेही कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्यामुळे केसीआर हादरले आहेत.

“तेलंगणमधील सत्तेचा लाभ फक्त केसीआर यांच्या कुटुंबीयांना मिळाला आहे. त्यांनी तुफान भ्रष्टाचार केला असून, ते आपल्या पक्षाच्या नेत्यांनादेखील भेटत नाहीत’, असा आरोप केला जात आहे. दुसरीकडे, प्रक्षोभक भाषणे केल्याबद्दल यापूर्वी तडीपार झालेल्या तेलंगणमधील स्वामी परिपूर्णानंद यांनी भाजपमध्ये पदार्पण केले आहे. स्वामीजी हिंदू वाहिनीचे संस्थापक आहेत. मी कर्मयोगी म्हणून भाजपमध्ये दाखल होत आहे, असे उद्गार स्वामीजींनी पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत काढले. शाह यांनी त्यांचे स्वागत केले होते.

स्वामीजींच्या आगमनामुळे केवळ तेलंगणातच नव्हे, तर आंध्र प्रदेश व एकूणच दक्षिण भारतात फायदा मिळेल, असा भाजपचा होरा आहे. तेलंगणमध्ये भाजपला फारसे महत्त्व नाही. हीच गोष्ट आंध्र, तामिळनाडू व केरळची. त्यामुळे दक्षिण भारतात पाय रोवायचे असतील, धर्मांधता आणि धर्मद्वेष याचाच आधार घेतला पाहिजे, असे भाजपला वाटत असणार. त्यामुळे केरळमध्ये शबरीमल मंदिरातील प्रवेशावरून चिथावणीखोरीचे राजकारण सुरू झाले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर, या मध्यावधी निवडणुकीत मतदार कोणाला पसंती देतात, हे पहाणे रंजक ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)