#सोक्षमोक्ष: जोगी यांचे एकाच वेळी कॉंग्रेस – भाजपला आव्हान 

हेमंत देसाई 
राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोरम आणि छत्तीसगड राज्यांत नजीकच्या भविष्यकाळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी राजस्थान, मिझोरम व मध्य प्रदेशात भाजपची सत्ता घालवू, असा आत्मविश्‍वास कॉंग्रेसला वाटत आहे. मात्र, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला यश मिळेल, याची ग्वाही देता येईलच असे नाही.
नव्वद सदस्यीय छत्तीसगड विधानसभेत सन 2013 च्या निवडणुकीनंतर भाजपकडे 49, तर कॉंग्रेसकडे 39 आमदार होते; परंतु दोन्ही पक्षांच्या मतदानाच्या टक्‍केवारीत फार फरक नव्हता. भाजपला 41 टक्‍के, तर कॉंग्रेसला 40.3 टक्‍के मते मिळाली होती. यावरून कोणीही असे म्हणेल की, भाजपचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या दीर्घकालीन सत्तेला विटून जनता कॉंग्रेसलाच मत देईल. परंतु कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी सन 2016 मध्ये कॉंग्रेस पक्ष सोडून, स्वतःच्या छत्तीसगड जनता कॉंग्रेसची (जेसीसी) स्थापना केली. त्यावेळी त्यांच्या पक्षात कॉंग्रेसचे तीन आमदार दाखल झाले होते.
छत्तीसगडमध्ये 12 टक्‍के लोकसंख्या अनुसूचित जातींची असून, त्यापैकी 75 टक्‍के लोक सतनामी या अनुसूचित जातीचे आहेत. सतनामी मतांवर जोगी यांची पूर्ण पकड आहे. अलीकडेच जोगी यांनी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांची भेट घेतली. हे दोन पक्ष आगामी निवडणुकीसाठी आघाडी स्थापन करू शकतात.
आगामी विधानसभा निवडणुकींसाठी “जेसीसी’ने आपल्या 26 उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली आहे. रमणसिंग यांच्याविरुद्ध स्वतः जोगी उभे राहणार आहेत. “जेसीसी’ने स्वतंत्र निवडणुका लढवल्या, तर भाजपविरोधी मतांत फूट पडणार आहे. अखिल भारतीय कॉंग्रेसचे छत्तीसगडचे प्रभारी पी. एल. पुनिया यांनी मात्र जोगी यांच्या “जेसीसी’शी समझोता होण्याची शक्‍यता फेटाळून लावली आहे.
रायपूर-बिलासपूर-जंजगीर या पट्ट्यातील 24 जागांवर विरोधी मतांच्या फुटीचा परिणाम होणार आहे. म्हणजेच, तेथे भाजपला फायदा होईल. सन 1990 च्या दशकात बसपाचा उदय होत असताना, काशीराम यांनी गुरुदासपूरप्रमाणेच बिलासपूर-जंजगीर विभागातून लोकसभा निवडणूक लढवली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाला 4.3 टक्‍के, तर गोंडवन गणतंत्र पार्टीला 1.6 टक्‍के मते मिळाली. वास्तव हे असे असूनही, जोगी यांच्यासारख्या विश्‍वासघातक्‍याशी आघाडी न करण्याचा कॉंग्रेसचा निर्धार कायम आहे.
जोगी हे छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री होत. मात्र त्यांचे मुख्यमंत्रीपद फार काळ राहू शकले नाही. सन 2003 मध्ये जोगी मुख्यमंत्री झालेले असतानाच, कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर कॉंग्रेसने त्यांना प्रदेश संघटनेपासून दूरच ठेवले. जोगी यांना नंतर एक मोठा अपघातही झाला होता. किमान 15 वर्षे उपेक्षा सहन केल्यानंतर, जोगी एकाच वेळी कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनाही आव्हान देत आहेत.
मुख्यमंत्री रमणसिंग यांची ही सलग तिसरी टर्म. “छत्तीसगड संचार क्रांती योजना’ आणि “मुख्यमंत्री टिफिन वाटप योजना’ या दोन योजनांवर भाजपचा सर्वाधिक भर आहे. दोन्ही योजना गेल्याच महिन्यात घोषित करण्यात आल्या; अर्थातच निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच, हे नक्‍की.
“संचार क्रांती’च्या द्वारे महिला व तरुणांना स्मार्टफोन दिले जाणार आहेत. तर “मनरेगा’मधील मजुरांना दुपारचे जेवण देण्याची कल्पना “टिफिन योजनेत’ अनुस्यूत आहे. शिवाय केंद्राच्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाच्या योजनांची जाहिरात करण्याचा भाजपचा कार्यक्रम आहे. रायपूरचे जिल्हाधिकारी ओ. पी. चौधरी यांनी नोकरीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीला जाऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. चौधरी हे लोकप्रिय सनदी अधिकारी असून, छत्तीसगड सरकारच्या कार्यक्रमांची जाहिरातबाजी करण्याच्या मोहिमेत पक्ष त्यांचा उपयोग करून घेईलच. त्यांना एखाद्या मतदारसंघातून तिकीटही मिळण्याची शक्‍यता आहे.
कॉंग्रेसच्या अंतर्गत अहवालानुसार, बसपाची मते निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे बसपाला आपल्या बाजूने वळवण्याचा कॉंग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाचा प्रयत्न आहे. तसे घडल्यास, कॉंग्रेसच्या दृष्टीने ती हिताचीच बाब असेल. कॉंग्रेसने संघटनेवरसुद्धा लक्ष पुरवले आहे. इलेक्‍शन बूथ समित्यांच्या प्रमुखांचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. पाच बूथचा एक “सेक्‍टर’ असेल. बूथचे व्यवस्थापन करण्याबाबत सेक्‍टरप्रमुखांना धडे दिले जात आहेत. विविध राजकीय प्रश्‍नांवर कॉंग्रेसची काय भूमिका आहे, तसेच इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रे बिघडल्यास काय करायचे, याबद्दलचे मार्गदर्शनही पक्षातर्फे पुरवले जात आहे.
“छत्तीसगड के चार चिन्हारी… नरवा, गरुवा, घुरवा, बारी’ ही कॉंग्रेसची प्रचारातली घोषणा असेल. त्याचा अर्थ छोटे झरे, गुरेढोरे, घरगुती कचरा आणि शेतीवाडी असा आहे.
जोगी यांच्या सभांना चांगली गर्दी होत असून, त्यामुळे त्यांचे विरोधकही चाट पडले आहेत. रायपूर ते रतनपूर अशी “विजययात्रा’ही त्यांनी काढली. जोगी यांना व्हीलचेअरवरूनच फिरावे लागत असून, त्यांचा रथ त्यादृष्टीनेच डिझाईन करण्यात आला होता. रमणसिंग यांनी 12 मे रोजी दांतेश्‍वरी माता मंदिरास भेट देऊन, प्रचाराचा नारळ फोडला. जोगी यांनी रायपूरच्या बंजारी मंदिरास भेट दिली आणि प्रचाराची पहिली फेरी समाप्त करताना, महामाया मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी कोणत्या देवळात जाणार, याचे औत्सुक्‍य जनतेच्या मनात आहे.
रमणसिंग सरकारने केलेला रेशन घोटाळा व आदिवासींवरील अत्याचार, नक्षलवाद या मुद्द्यांचा वापर कॉंग्रेस तसेच “जेसीसी’ करेलच. तर भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा हुकमी एक्का आहे. मात्र, मोदींचा करिश्‍मा पूर्वीइतका राहिलेला नाही. विरोधी पक्ष जनतेपुढे कसा पर्याय ठेवतात आणि त्यांची आघाडी कशी होते, यावर छत्तीसगडचे राजकीय गणित अवलंबून आहे. एरवी प्रत्येक राज्यात “साधू आणि जोगी’ असतातच. छत्तीसगडच्या राजकारणातच एक “जोगी’ आहे. तो आणि बसपा काय करामत दाखवतात, हे बघावे लागेल. सध्या तरी लक्ष “छत्तीासगडच्या रमता जोगी’वरच आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)