सोक्षमोक्ष: चंद्राबाबूंचा चेहरा चर्चेत का? 

हेमंत देसाई 

देशात राजकीय अशी आवश्‍यकताच निर्माण झाली आहे की, बिगरभाजप पक्षांमध्ये ऐक्‍य व्हावे लागेल, असे चंद्राबाबूंचे मत आहे. एक मात्र खरे की, राज्याराज्यातील राजकीय परिस्थिती अलग अलग असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील महागठबंधन निर्माण होणे कठीण आहे. 

2019 सालच्या लोकसभा निवडणुकांत भाजपविरोधी राष्ट्रव्यापी आघाडीचा प्रयत्न आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एम. चंद्राबाबू नायडू करत आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच त्यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख़ अब्दुल्ला यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आणि हे तिघेजण तिसरी आघाडी निर्माण करत असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. परंतु त्याचवेळी नायडू यांनी योगायोगाने’ कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचीही इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भेट घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चंद्राबाबू यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीस रामराम ठोकला आणि त्यानंतर केंद्र सरकारविरुद्ध अविश्‍वासाचा ठरावही आणला. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यास केंद्राने नकार दिल्यामुळे ते संतापले होते. ऑक्‍टोबर महिन्यात त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती, तसेच भाजपमधून बाहेर पडलेले यशवंत सिन्हा यांचीही भेट घेतली होती. चंद्राबाबू, पवार आणि अब्दुल्ला यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, देशाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने ते एकत्र आले आहेत. एक किमान समान कार्यक्रम निश्‍चित करून, त्यानंतर चंद्राबाबू वेगवेगळ्या प्रदेशातील नेत्यांशी बोलणी करणार आहेत. देशातील लोकशाही धोक्‍यात आहे.

सीबीआय आणि रिझर्व्ह बॅंकेसारख्या संस्थांच्या स्वायत्ततेवर आक्रमण होत आहे, असे अब्दुल्ला यावेळी म्हणाले. तर, मला सत्तेची हाव नसून, केवळ लोककल्याणापोटीच मी सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती चंद्राबाबू यांनी दिली. नवी दिल्लीत त्यांनी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांचीही भेट घेतली. देशात राजकीय अशी आवश्‍यकताच निर्माण झाली आहे की, बिगरभाजप पक्षांमध्ये ऐक्‍य व्हावे लागेल, असे चंद्राबाबूंचे मत आहे. वास्तविक चंद्राबाबू हे प्रथम संजय गांधींच्या नेतृत्वाखाली युवक कॉंग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांचे सासरे एन. टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केल्यानंतर, ते त्यात सामील झाले व रामाराव यांच्यानंतर त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आली.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकार स्थापन झाले, तेव्हा चंद्राबाबू हे त्याचे प्रमुख म्होरक्‍ये होते. 1980च्या दशकात रामाराव यांनी कॉंग्रेसविरोधी पक्षांची आघाडी उभारण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र राजकारणात परिस्थिती सतत बदलत असते. गेल्यावेळी भाजपशी आघाडी असताना, त्यांनी लोकसभेत आंध्रमधील 42 पैकी 29 जागा जिंकल्या होत्या. यावेळी वायएसआर कॉंग्रेसशी त्यांना सामना करावा लागणार आहे. वायएसआरचे भाजपशी संबंध सलोख्याचे होत आहेत, असा संशय त्यांना होता व त्यामुळेच मागास राज्याचा दर्जा दिला जात नाही हे निमित्त करून, त्यांचा पक्ष नरेंद्र मोदी सरकारबाहेर पडला.

लोकसभा पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशात बसपा, समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेस यांनी आघाडी करून, भाजपला झटका दिला होता. गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर, हार्दिक पटेल व जिग्नेश मेवाणी यांची मदत घेऊन कॉंग्रेसने भाजपला जीव नकोसा केला होता. कर्नाटकमध्ये कॉंग्रेस, भाजप आणि जनता दल सेक्‍युलर हे तीन पक्ष एकमेकांविरुद्ध लढले. बहुमत नसतानाही, येडियुरप्पा यांनी सरकार स्थापन केले आणि लगेचच त्यांच्यावर उताणे पडण्याची वेळ आली. जनता दल सेक्‍युलरच्या कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले व त्यात कॉंग्रेस पक्ष सामील झाला. या शपथविधी सोहळ्यास विविध बिगरभाजप पक्षांचे नेते व्यासपीठावर हजर होते आणि त्यानंतर त्यांनी हातात हात घालून एक फोटोही दिला. तेव्हापासून भाजपविरोधी महागठबंधन अस्तित्वात येणार, अशी चर्चा सुरू झाली. परंतु मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कॉंग्रेसशी आघाडी करण्याचे टाळून, मायावतींनी धक्का दिला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकांत स्वतःला यश मिळण्याबाबतचा भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे.

मात्र याचा अर्थ, लोकसभेत मायावती कॉंग्रेस व इतारंसमवेत महागठबंधनात सामील होणार नाहीत, असे नव्हे. मायावती यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांच्यावर झोड उठवली आहे. परंतु कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वा पूर्वाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध त्यांनी ब्र’ही उच्चारलेला नाही. राहुलजींनीही मायावतींबद्दल सौम्य भूमिका घेतली आहे. महागठबंधन अस्तित्वातच येऊ नये, ही भाजपची स्वाभाविक इच्छा आहे. कॉंग्रेससोबत हातमिळवणी करून, तेलुगू देसम पक्षाची तत्त्वे चंद्राबाबूंनी पायदळी तुडवली आहेत. आपले सरकार वाचवण्यासाठी त्यांनी पक्षाच्या विचारांना हरताळ फासत, पक्षाचे संस्थापक रामाराव यांच्याही पाठीत खंजीर खुपसला आहे, असे टीकास्त्र भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी सोडले आहे. कॉंग्रेसशी युती करून तेलुगू देसम पक्षही खड्डयात जाणार आहे, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली आहे. चंद्राबाबू यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींसाठी कॉंग्रेससमवेत हातमिळवणी केल्यामुळे, वायएसआर कॉंग्रेसनेही झोड उठवली आहे.

अर्थात बिगरभाजप पक्ष राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याची शक्‍यता दुरापास्त आहे. तरीसुद्धा विविध पक्षांना समान मंचावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव होईल, याची पवार यांना खात्री आहे. समजा भाजपला सध्यापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या आणि तरीही त्या इतर पक्षांपेक्षा जास्त असतील, तर मोदींऐवजी नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थन देईल का, या प्रश्नावर ते उत्तरले की, भाजपच्या कोणत्याही नेत्याला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही.

‘पण महाराष्ट्रात 2014 मध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीने राज्याच्या स्थैर्यासाठी’ भाजपला पाठिंबा देऊ केला होता, हे येथे नोंदवायलाच हवे. एक मात्र खरे की, राज्याराज्यातील राजकीय परिस्थिती अलग अलग असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील महागठबंधन निर्माण होणे कठीण आहे. त्याला तसा अर्थही नाही. उदाहरणार्थ, तेलुगू देसमने महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पाठिंबा देणे आणि राष्ट्रवादीने आंध्रात देसमला समर्थन देणे, यास तसा काहीही अर्थ नाही. परंतु सार्वत्रिक निवडणुकांनंतर आम्ही हातात हात घालून केंद्रात सशक्त सरकार देऊ शकतो, असे चित्र मात्र बिगरभाजप पक्ष निर्माण करू शकतात. ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतील, त्या पक्षाचा नेता अन्य आघाडीतील सर्व पक्षांची अनुमती घेऊन पंतप्रधान होऊ शकतो.

भारतात अध्यक्षीय पद्धत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे निवडणुकांनंतरही महागठबंधन अस्तितावात येऊ शकते. 2004 साली लोकसभा निवडणुकीत रालोआचा पराभव झाला आणि त्यानंतरच संयुक्त पुरोगामी आघाडी निर्माण झाली होती. 1977 साली जनता सरकार असेच अस्तित्वात आले होते. मोदी की राहुल गांधी, अशी दंगल असल्याचे चित्र रंगवणाऱ्यांनी हा इतिहासही समजून घेतला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)