सोक्षमोक्ष : “कर्नाटकातील करामत’

हेमंत देसाई 

कर्नाटकात झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांत कॉंग्रेस-जनता दल सेक्‍युलर (जेडीएस) आघाडीला जबरदस्त यश मिळाले असून, भाजपची दाणादाण उडाली आहे. आज देशातील 21 राज्यांत भाजपची सत्ता असून, उद्या ती सर्वच्या सर्व 36 राज्यांत येईल आणि भारत देश शतप्रतिशत भाजपयुक्‍त होईल, अशा वल्गना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केल्या आहेत. 

केरळमधील शबरीमल मंदिरातील महिला प्रवेशाविषयी मतप्रदर्शन करताना, शहा म्हणाले की, जे कायदे राबवता येतील तेच न्यायालयाने करावेत. कायद्यापेक्षा जनभावना या महत्त्वाच्या असतात. म्हणजे, न्यायव्यवस्थेचीही तमा न बाळगण्याचे सत्ताधारी पक्षाने ठरवलेले दिसते. निवडणूक आयोगही त्यांच्या सोयीने काही निर्णय घेताना दिसतो. रिझर्व्ह बॅंकेलाही आपल्या तालावर नाचवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर कर्नाटकात भाजपच्या सणसणीत श्रीमुखात बसली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्नाटकात लोकसभेच्या तीन व विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली आणि 67 टक्‍के असे चांगले मतदान झाले. हा सामना कॉंग्रेस व जेडीएसने चार-एक अशा फरकाने जिंकला. कर्नाटकात कॉंग्रेस व जेडीएसचे संयुक्‍त सरकार आहे. पैसा, आमिषे, दबाव, धमक्‍या या मार्गाने ते पाडण्याचे प्रयत्न भाजप हरप्रकारे करत आहे. येत्या काही दिवसांत कर्नाटकात भाजपचेच सरकारल पुन्हा येईल, अशा बातम्या पेरण्यात आल्या; परंतु त्यास यश मिळाले नाही. या पार्श्‍वभूमीवर, रामानगरम विधानसभा मतदारसंघातून जेडीएस उमेदवार अनिता कुमारस्वामी यांना सव्वालाख मते मिळाली, तर भाजप उमेदवारास फक्‍त सुमारे 15 हजार.

मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या अनिता या पत्नी असून, या विजयाद्वारे मुख्यमंत्र्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. जमखंडी विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार आनंद नयामगौडा 29 हजारांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. बल्लारीमध्ये कॉंग्रेस उमेदवार व्ही. एस. उगरप्पा भाजपच्या जे. शांता यांच्यावर दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्‍याने विजय मिळवला. खाण माफिया रेड्डी बंधूंचे श्रीरामुलु हे भाजपचे कर्नाटकातील सर्वोच्च नेते येडियुरप्पा यांच्या जवळचे. या लोकांशी संगनमत असल्यामुळेच काही वर्षांपूर्वी येडियुरप्पा भ्रष्टाचाराच्या सावटाखाली आले होते. नितीन गडकरी पक्षाध्यक्ष असताना येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रिपदावरून गच्छंती करण्यात आली होती. आता श्रीरामुलु यांचे बल्लारीवरील वर्चस्व संपत आले आहे, असे दिसते.

शिवमोगामध्ये येडियुरप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. राघवेंद्र यांनी जागा कायम राखून थोडीफार लाज राखली. मात्र मांड्या लोकसभा मतदारसंघातून जेडीएसचे उमेदवार शिवरामगौडा यांनी जवळपास सव्वातीन लाख मताधिक्‍याने विजय मिळवला. अर्थात वोक्कलिगांचा पगडा असलेल्या या मतदारसंघात पराभूत झालेल्या भाजप उमेदवारासही चांगली मते मिळाली, हे लक्षात घेतले पाहिजे. कॉंग्रेस-जेडीएसने दोन लोकसभा आणि दोन विधानसभा पोटनिवडणुकांत यश मिळवले. तर भाजपच्या पदरात फक्‍त शिवमोगाची लोकसभेची जागा आली. सामान्यतः पोटनिवडणुकांत सत्ताधारी फक्षाच्या बाजूने कौल पडतो, अशा अऩुभव आहे. मात्र कर्नाटकातले चित्र वेगळे होते. यापूर्वीही, उत्तर प्रदेश वा अन्यत्र झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपचा मुखभंग झाला आहे. वास्तविक कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी ही निवडणुकोत्तर स्थापन झालेली आहे.

भाजपकडे सरकार टिकवण्याइतके बहुमत नसल्यामुळेच या आघाडीने सरकार स्थापण्यात यश मिळवले. बाह्यतः ही संधिसाधूंची आघाडी आहे, असे वाटत असले, तरी महाराष्ट्रातदेखील भाजप-शिवसेना परस्परविरोधी लढले आणि नंतर सरकारमध्ये पुन्हा एकत्र आले. राजकारणात हे होतच असते. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेस-जेडीएसतर्फे एकत्रितरीत्या निवडणुका लढवल्या जातील. चौदा वर्षांनंतर बल्लारीमध्ये कॉंग्रेसने पुन्हा जोर पकडणे, हे विशेष आहे. खरे तर, विधानसभा निवडणुकीच्या वेळी नऊपैकी सहा जागा कॉंग्रेसने जिंकल्याच होत्या. सिद्धरामय्या आणि देवेगौडा व कुमारस्वामी यांनी कॉंग्रेस व जेडीएसच्या प्रचाराची आघाडी सांभाळली. विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर सिद्धरामय्या यांना टीकाकारांनी मोडीत काढले होते. परंतु पक्षावर त्यांचीच पकड आहे.

एकेकाळी सिद्धरामय्या हे देवेगौडांच्याच पक्षात होते. परंतु ती कटुता मागे ठेवून, उभयतांनी एकत्रपणे काम करायचे ठरवलेले दिसते. गेल्या मे महिन्यात झालेल्या निवडणुकांत भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने प्रचारात खूपच लक्ष घातले होते. साधनसामग्री व स्वयंसेवक-कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पुरवण्यात येत होते. पोटनिवडणुकांत मात्र भाजपने स्थानिक नेत्यांच्याच हाती सूत्रे दिली होती.

कॉंग्रेसने यावेळी लिंगायतांचा प्रश्‍नही चलाखीने हाताळला. त्याचाही पक्षाला फायदा झाला. लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देणे योग्य की अयोग्य, या प्रश्नात कॉंग्रेसने पडण्याचे कारण नव्हते, असे कर्नाटकातील कॉंग्रेस मंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. बल्लारीच्या प्रचाराची सर्व धुरा त्यांनीच सांभाळली होती. दुसरीकडे, भाजपने सत्ताधारी पक्षाचे आमदार फोडण्यावरच लक्ष्य केंद्रित केले होते. कुमारस्वामी सरकारचा कारभार कसा चालला आहे, यावर टीकाटिप्पणी कऱण्यापेक्षा कॉंग्रेस हा फोडाफोडीवर भर देणारा पक्ष असल्याचे चित्र निर्माण झाले. लोकसभा निवडणुकांस जेमतेम सहा महिने उरले असताना, कर्नाटकात तडाखा बसणे म्हणजे भाजपच्या दक्षिण दिग्विजयाच्या दृष्टीने अपशकुनच.

केरळमध्येही शबरीमल प्रकरणात धार्मिक ध्रुवीकरण करण्याची भाजपची धडपड आहे. कॉंग्रेस-जेडीएसने वर्षानुवर्षांचे मतभेद बाजूला सारून, एकदिलाने काम केले आणि जातीचे गणित नीट जमवले. भाजपच्या संघटनात्मक ताकदीशी मुकाबला करण्याची जिगर आपल्याकडे असल्याचे विरोधी पक्षांनी दाखवून दिले आहे. पण यामुळे लगेच 2019 मधील लोकसभा निवडणुकांत भाजपचा पराजय होईल, असा निष्कर्ष काढणे खुळचटपणाचे ठरेल. जेथे कर्नाटकसारखे तगडे प्रादेशिक नेते आहेत, तेथे भाजपशी दोन हात करता येतात. त्यामुळे राज्याराज्यातील छोट्या पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येणे, हे महत्त्वाचे आहे. प्रादेशिक पक्षांच्या महागठबंधनामुळे प्रसारमाध्यमांना आकर्षक मथळे व छायाचित्र मिळते. पण त्यापलीकडे काही साध्य होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)