#सोक्षमोक्ष: इंडिया टुडे – इंडिया टुमॉरो : काय होणार नक्की? 

हेमंत देसाई 
दोन-तीन वर्षांपूर्वी झालेल्या विविध पाहण्यांमध्ये राहुल गांधींबद्दल पाच-सहा टक्‍के देखील जनता अनुकूल नव्हती. त्या तुलनेत त्यांनी आता लक्षणिय प्रगती केली आहे. तसेच कॉंग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडीचा मतदानातील हिस्सा उल्लेखनीयरीत्या वाढत असून, जिंकून येणाऱ्या जागांबाबत मात्र संपुआ अजूनही मागे आहे. 
“इंडिया टुडे’ हे देशातील एक प्रतिष्ठित नियतकालिक आहे. त्यांचा न्यूज चॅनेलही असून, तो “टाइम्स नाऊ’ व “रिपब्लिक’ सारखा भाजपमय झालेला नाही. “इंडिया टुडे’ने “कार्व्ही इनसाइट्‌स’ या संस्थेसमवेत “मूड ऑफ द नेशन’ ही पहाणी हाती घेतली होती. दिनांक 18 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या या अहवालानुसार, जर ताबडतोब निवडणुका झाल्या, तर भाजपला जादूई आकडा साध्य करता येणार नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान व्हावेत, अशी 49 टक्‍के लोकांची इच्छा असून, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावावर 27 टक्‍केलोकांनी शिक्‍कामोर्तब केले आहे.
अलीकडे भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांची धावपळ चांगलीच वाढली असून, मागच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पक्षाची एक महत्त्वाची बैठकही पार पडली. तसेच भाजपशासित मुख्यमंत्र्यांचीही एक बैठक झाली. मोदी-शाह यांना जनमनाचा अचूक अंदाज असून, त्यामुळेच विरोधकांना मागे टाकण्यासाठी ते सर्वशक्तीनिशी प्रयत्न करतात व यापुढेही करतील, यात शंका नाही. समजा, सन 2014 प्रमाणेच कॉंग्रेस व भाजपचे मित्रपक्ष तेच रहिले, तर काय होईल?
बसपा, सपा आणि तृणमूल हे मुख्य मित्रपक्ष वगळून, संपुआला 122 जागा मिळतील, तर भाजपप्रणीत रालोआला 281 व इतरांना 140 टक्‍केजागा मिळतील. रालोआला 36 टक्‍के संपुआला 31 टक्‍के व इतरांना 33 टक्‍के मते मिळतील. परंतु बसपा, सपा व तृणमूल हे पक्ष जर संपुआत आले, तर त्यांना 224 जागा मिळतील. अशा वेळी रालोआला 228 आणि इतरांना 91 जागा मिळतील. म्हणजे, संपुआच्या तुलनेत रालोआ फक्त 4 जागांनी पुढे असेल आणि सपा, बसपा यांच्याशी कॉंग्रेसची आघाडी होण्याची दाट चिन्हे दिसतात. जर हे मित्रपक्ष कॉंग्रेसच्या बरोबर आले, तर रालोआ 36 टक्‍के, संपुआ 41 टक्‍के व इतर 23 टक्‍के असा मतदानाचा हिस्सा होऊ शकतो.
आता कोणाच्याही मनात येईल की, जर संपुआचा मतदानाचा हिस्सा सर्वाधिक असेल, तर त्यांच्या जागा रालोआपेक्षा कमी का? तर याचे कारण, भाजपचा जनाधार उत्तर, पश्‍चिम व आणि वायव्य भारतात खूपच केंद्रित झाला आहे. त्यामुळे भाजपच्या जागा तेथे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. पाहणीमधून उभे राहिलेले तिसरे चित्र म्हणजे, अण्णाद्रमुक आणि वायएसआर कॉंग्रेस यांनी भाजपशी युती केल्यास, रालोआला 255, तर संपुआला 242 जागा मिळतील.
दक्षिणेत तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकची परिस्थिती बिघडत चालली असून, तपासयंत्रणांचे भय दाखवून, भाजपने त्यास वश करून घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याचवेळी द्रमुक नेते करुणानिधी यांचे स्मारक उभारण्यासंदर्भात झालेल्या चेन्नई येथील बैठकीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आवर्जून उपस्थित राहिले होते. द्रमुकलाही संकेत देण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. आंध्रमधील तेलुगू देसम रालोआबाहेर पडल्यामुळे वायएसआरच्या जगनमोहन रेड्डींची समजूत काढण्याची भाजपची धडपड चालू आहे. समजा टीआरएस आणि बिजू जनता दल रालोआच्या निवडणूकपूर्व आघाडीत सामील झाले, तर या आघाडीस 282 जागा मिळतील. काहीही झाले, तरी अजूनही भाजप पुढे असल्याचे दिसते. मात्र कॉंग्रेसही हळूहळू झेपावत असून, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीनपैकी दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत तरी कॉंग्रेसला यश मिळणे आवश्‍यक आहे. तसे घडले, तरच लोकसभेत कॉंग्रेस रालोआला जबरदस्त टक्‍कर देऊ शकतो.
कॉंग्रसला उशिरा का होईना, जाग आली असून, महाराष्ट्रात कॉंग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. मात्र कॉंग्रेस पक्षामध्ये एकजूट दिसत नसून, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, सुशीलकुमार शिंदे एकत्रितपणे काम करत आहेत, अशी प्रतिमा निर्माण झालेली नाही. महाराष्ट्रात कॉंग्रेसकडे तरुण-तडफदार नेता नाही. दिल्लीसारख्या राज्यात “आप’शी आघाडी करायची की नाही, यावरून पक्षातच मतभेद आहेत.
ज्या राज्यात कॉंग्रेसची ताकद अत्यंत मर्यादित आहे, (बिहार, तामिळनाडू) तेथे ती वाढवण्याचे कोणतेही प्रयत्न सुरू असल्याचे दिसत नाही. भाजपने संपूर्ण पक्ष मोदींच्या हवाली केला आहे. त्याप्रमाणे कॉंग्रेसकडे राहुल गांधींशिवाय दुसरा चेहराच नाही. कॉंग्रेसमधील वेगवेगळे नेते एकत्रितरीत्या भाजपवर हल्लाबोल करत आहेत, असे दिसत नाही. अगदी इंदिरा गांधींच्या काळातही सिद्धार्थशंकर रे यांच्यापासून ते वसंतराव नाईक, ग्यानी झैलसिंग यांच्यासारखे अनेक नेते कॉंग्रेसमध्ये आपापली जागा टिकवून होते. केवळ सोनिया गांधीच नव्हे, तर जयराम रमेश, पी. चिदम्बरम, प्रणव मुखर्जी असे एक से एक नेते प्रोजेक्‍ट केले जात होते. आज मात्र फक्त आणि फक्‍त राहुल गांधी यांनाच प्रोजेक्‍ट केले जात आहे. राफेलसंबंधी आरोप करतानाही, माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी एकच पत्रकार परिषद घेतली. वास्तविक, या सर्व व्यवहाराची चिकित्सा करून, त्यासंबंधीची टिप्पणी करण्याची जबाबदारी अँटनींवरच सोपवायला हवी होती.
अँटनी बोलण्यामध्ये कमी पडतात, असे वाटत असेल, तर स्वतः डॉ. मनमोहन सिंग किंवा जयराम रमेश यांच्यावर ही जबाबदारी टाकायला हवी होती. कोणत्याही व्यवहाराच्या खोलात जाणे आवश्‍यक असते. केवळ ढोबळ आरोप करून उपयोगाचे नाही. प्रतिपक्षावर आऱोप कसे करायचे, हे तंत्र कॉंग्रेसने भाजपकडून शिकून घेतले पहिजे. बोफोर्सच्या वेळी अरुण शौरी, जसवंत सिंग, अरुण जेटली, एस. गुरुमूर्ती असे अनेकजण माहिती खणून काढत होते, बोलत होते वा लेख लिहित होते. कॉंग्रेसतर्फे आरोप केले जातात, पण त्यापूर्वी नीट अभ्यास केला जात नाही.
सन 2013 मध्ये मोदींकडे जेव्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहिले जाऊ लागले, तेव्हापासून त्यांनी प्रचारसभांचा सपाटा लावला. माजी सैनिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, स्त्रिया, दलित, आदिवासी, ओबीसी अशा वेगवेगळ्या समाजघटकांसमोर त्यांनी आपला अजेंडा ठेवला. “गेल्या 70 वर्षांत कॉंग्रेसने अहोरात्र फक्‍त भ्रष्टाचार केला,’ हे असत्य लोकांच्या मनावर बिंबवले. त्याचवेळी संपूर्णपणे विकासाचा कार्यक्रम लोकांसमोर ठेवून, त्यांना “अच्छे दिन’चे स्वप्न दाखवले.
“मी सतत देशासाठी काम करत आहे आणि मला कशाचाही मोह नाही,’ ही प्रतिमा ठसवण्यात ते यशस्वी झाले आहेत. याउलट कॉंग्रेस पक्ष फक्‍त मोदी किती वाईट आहेत, हेच सांगत राहिला आहे. जनतेसमोर मोदींची अद्याप चांगली प्रतिमा असल्यामुळे, त्यांना टार्गेट करून, कॉंग्रेस स्वतःचे नुकसानच करून घेईल. “इंडिया टुडे’च्या पाहणीतले “इंडिया टुमॉरो’चे चित्र हे असे आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)