सोक्षमोक्ष: अपयशावरील “रामबाण’ उपाय 

हेमंत दसाई 

शिवसेना भाजपशी युती तोडण्याची शक्‍यता कमी आहे. पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालावर युतीत कोण शिरजोर होणार, ते अवलंबून असेल. आपले आर्थिक अपयश झाकण्यासाठी मोदी सरकारनेच परिवाराला साद घालून, राममंदिर चळवळीचा तवा तापवण्याची योजना केली असावी. आपल्या दुबळेपणाची जाणीव झाल्यावर देवाची आठवण होणे, हे स्वाभाविकच आहे. 

असमाधानकरक आर्थिक विकासदर, बड्या उद्योगपतींकडील न फिटणारी कर्जे, शेतमालाच्या आधारभावात पुरेशी वाढ न होणे, अर्धवट राहिलेले पायाभूत प्रकल्प यासारख्या असंख्य समस्या देशापुढे असताना, आता त्या चर्चाविश्‍वातून मागे पडल्या आहेत. उलट अयोध्येतील राममंदिरच भारताचे भाग्य निश्‍चित करेल, असे वातावरण निर्माण केले जात आहे. “अयोध्या हा न्यायालयाचा नव्हे, तर श्रद्धेचा विषय आहे आणि श्रद्धेची मोजदाद न्यायालयात करता येत नाही. त्यामुळे सरकारने कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता, वटहुकूम किंवा कायद्याच्या रूपात ठोस पाऊल उचलावे. राममंदिराच्या मुद्द्यावर आता हिंदू स्वस्थ बसणार नाहीत. झोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला मी अयोध्येत आलो आहे’, असे उद्‌गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन काढले. तर अयोध्येतील राममंदिरासाठी अट्टहास कायम ठेवत, सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे.

-Ads-

सरकारच्या आश्‍वासनांमुळे आतापर्यंत बाळगलेला संयम संपला आहे, असा इशारा सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे. ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यास जेवढा प्रतिसाद मिळाला, त्याच्या कित्येक पट प्रतिसाद नागपूरमधील विश्‍व हिंदी परिषदेच्या “हुंकार सभे’स मिळाला. अयोध्येत शिवसेनेने आपली एक शाखा स्थापन केली. अर्थात ही उत्तर प्रदेशातील शाखा असल्यामुळे तेथे काम करण्यास मर्यादाच येणार. शेवटी ती परप्रांतातील शाखा. सेनेतर्फे अयोध्येत राममंदिराबाबतची घोषणाबाजी सुरू असतानाच, त्यांना काही तरुणांनी हटकले. “महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील लोकांना मारझोड करून हाकलण्यात येते; इथे येऊन तुम्ही आम्हाला तुमच्या आंदोलनात सामील व्हायला सांगता, हे कसे?’ असा सवाल करण्यात आला. तेव्हा शिवसैनिकांना पळताभुई थोडी झाली.

“आम्ही तुम्हाला रामराज्यासाठी मते दिली होती, राममंदिरासाठी नव्हे’, अशा आशयाची प्रतिक्रिया नोंदवणारे राज ठाकरे यांचे व्यंगचित्र शिवसैनिकांना अस्वस्थ करून गेले. ज्या विश्व हिंदू परिषदेच्या हुंकार सभेत मोहन भागवतांनी “संयम संपल्याची’ भाषा केली, त्या व्यासपीठावर साध्वी ऋतंभरा उपस्थित होत्या. अयोध्येच्या आंदोलनात चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल या साध्वींविरुद्ध खटले भरण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी कारसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने जनक्षोभ उसळला होता. जनहिताचे काम रोखले तर त्याचा काय परिणाम होतो, हे त्यावेळी दिसून आले, याची आठवण देत, भागवतांनी सरकारला इशाराच दिला आहे. याचा अर्थ, संघ-भाजप-शिवसेना यांना कायद्याची फारशी पत्रास नाही.

उद्धव ठाकरेंनी सहपरिवार अयोध्येतील राममंदिराचे दर्शन घेतले. त्यामुळे भाजपचा भडका बिलकुल उडेलला नाही. उलट “शिवसेना व भाजपचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश असल्याने ठाकरेंनी अयोध्येला जाणे चांगलेच आहे. ते युतीसाठीही पोषक आहे. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याने त्यांना प्रभुजी नक्‍कीच आशीर्वाद देतील’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत “भाजपला शिवसेनेच्या आशीर्वादाची’ गरज असल्यामुळेच फडणवीस हे ठाकरेंची मर्जी सांभाळत आहेत. गेल्या निवडणुकांच्या वेळी शिवसेनेवर तुटून पडणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत राहावे, हीच इच्छा असल्याचे स्पष्ट केले आहे.

वास्तविक काही काळापूर्वी दानवे यांनी शेतकऱ्यांना धमकी दिल्याचे वादग्रस्त वक्‍तव्य गाजले होते. तेव्हा शिवसेनेने दानवे यांना दानवाच्या रूपातच नेऊन ठेवले होते. तरीसुद्धा आज दानवे यांची शिवसेनेबद्दलची भूमिका अचानकपणे मऊ झाली आहे. शबरीमला मंदिराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश न पाळण्याची भूमिका घेणे, जम्मू-काश्‍मीरमध्ये बेकायदेशीरपणे राज्यपालांकरवी विधानसभाच बरखास्त करणे, उत्तर प्रदेश, प. बंगाल, केरळ येथे धार्मिक भावना भडकावणे यासारखी कृत्ये भाजपतर्फे केली जात आहेत. जम्मू-काश्‍मीरमध्ये तर पहिला हिंदू मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न भाजप बघत होता आणि त्यासाठी अन्य पक्षांमधून फोडाफोड करण्याचे उद्योग चालू होते. विकासाच्या मुद्द्यांवर चमकदार असे काहीच केले नसल्याने, धर्म, राष्ट्रवाद, पाकिस्तानविरोध, अस्मिता हे मुद्दे पुढे केले जात आहेत.

पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल डिसेंबरात लागतील. त्यावेळी देशातील लोकमताचे वारे नेमक्‍या कोणत्या दिशेने वाहत आहे, याचा अंदाज भाजपसह शिवसेनेलाही येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच विशिष्ट पवित्रा घेऊन, “आम्ही हे म्हणतच होतो, आम्हाला तसे वाटतच होते’, असे दावे करण्याची तयारी सुरू आहे. मोदी सरकारने मागच्या चार वर्षांत राममंदिरासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, असे शिवसेनेचे म्हणणे आहे व ते खरेच आहे. पण त्यासाठी शिवसेनेने निषेध म्हणून सत्तेबाहेर पडण्याचे धाडस केले नाही, हेही तितकेच खरे नाही काय? मुंबई महानगरपालिकेत सत्ता असूनही, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सेनेला बांधता आले नाही. मग त्यांना भाजपला प्रश्‍न विचारण्याचा काय अधिकार आहे? मुंबईत परप्रांतीयावर हल्ले करणाऱ्या सेना नेत्यांना उत्तर भारतीयांच्या प्रश्‍नांना उत्तरे तरी देता येतील काय? अशी टीका विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केली आहे. पुन्हा ठाकरेंच्या दौऱ्यावेळीच अखिल भारतीय संत समितीची धर्मसभा आयोजित करण्यात आली.

1990 च्या दशकात जेव्हा रामजन्मभूमी आंदोलन झाले, तेव्हा विहिंपचे नेते बाळासाहेबांना भेटून गेले होते. त्यानंतरच बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांची एक तुकडी अयोध्येला रवाना केली होती. विहिंप व शिवसेना यांच्यातील तसे सलोख्याचे संबंध नाहीत. सेनेच्या मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारात कोणतीही भव्यदिव्य कामगिरी केलेली नाही. मुंबई महानगरपालिका आणि बेस्टचा कारभार अतिशय वाईट आहे. त्यामुळे आपली ही कामगिरी लपवण्यासाठी आणि भाजपला आपली गरज असल्याचे माहीत असल्यामुळे त्याच्यावर दबाव टाकून, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची शिवसेनेची रणनीती आहे.

What is your reaction?
6 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)