सैन्य सराव हा मोठ्या कार्याचा सकारात्मक प्रारंभ

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत : “अफेन्डिक्‍स’ लष्करी सरावाचा समारोप

पुणे -“भारत आणि आफ्रिकेतील राष्ट्रांचा हा सैन्य सराव शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच दहशतवादासारख्या जागतिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरेल. हा सराव संपलेला नसून, एका मोठ्या कार्याचा एक सकारात्मक प्रारंभ आहे. आगामी काळात सहभागी राष्ट्रांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होऊन जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल,’ असा विश्‍वास लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केला.

भारत आणि आफ्रिकन राष्ट्रे यांच्यामधील गेली दहा दिवस सुरू असलेला “अफेन्डिक्‍स’ या संयुक्‍त लष्करी सरावाचा समारोप बुधवारी औंध येथील मिलीटरी स्टेशन येथे झाला. याप्रसंगी जनरल रावत बोलत होते. यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी, आफ्रिकेच्या 17 राष्ट्रांचे अधिकारी आणि निरीक्षक राष्ट्रांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस नागरी परिसरातील दहशतवादी हल्ला आणि यावेळी पेरण्यात आलेले भूसुरूंग निकामी करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यानंतर सहभागी राष्ट्रांच्या जवानांचे संचलन झाले. या संचलनाचे निरीक्षण जनरल रावत यांनी केले. युद्धसरावात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध देशातील सैन्य अधिकाऱ्यांचा रावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

जनरल रावत म्हणाले,”वसाहतवादाच्या काळापासून ते आजच्या विकासाच्या वाटचालीपर्यंत भारत आणि आफ्रिका या देशांची एकमेकांचे घनिष्ठ संबंध आहेत. विकासाच्या प्रगती पथावर दोन्ही देशांनी एकत्रित वाटचाल केल्यास त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होईल. विशेषत: संरक्षण सामग्री उत्पादनात भारत वेगाने वाटचाल करत आहे. कमी पैशात उत्कृष्ट दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन करण्याच्या दिशेने देश वाटचाल करत आहे. याचा फायदा आफ्रिकेतील राष्ट्रांनादेखील होईल. त्यामुळेच अशाप्रकारच्या सरावाद्वारे व्यापारी संबंध प्रस्थापित होण्यासही मोठा फायदा होणार आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)