सेव्हन लव्हज चौक-मार्केटयार्ड वाहतूक कोंडी फुटणार!

प्रातिनिधिक चित्र

उड्डाणपुलास मंजुरी 


कात्रज, बिबवेवाडी, गंगाधामकडे जाणाऱ्यांना दिलासा

पुणे- कोंढवा, गंगाधाम, बिबवेवाडीकडे जाणाऱ्या आणि या भागातून पुणे स्टेशन तसेच हडपसरकडे येणाऱ्या वाहनांसाठी सेव्हन लव्हज चौक ते मार्केटयार्ड (वखार महामंडळपर्यंत) सुमारे 650 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या 28 कोटींच्या खर्चास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या पूलामुळे या भागातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.

या रस्त्यावर गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी वाढलेली आहे. रस्ता रूंदीकरणानंतरही वाहनांची संख्या अधिक असल्याने ही कोंडी कमी होत नाही. त्यामुळे या पुलाची मागणी केली होती. त्यानुसार, तो 2017-18 च्या अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आला होता. त्याच्या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे तातडीने त्याचे काम सुरू करून ते वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.
– श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, भाजप

याशिवाय पुलामुळे हडपसरकडून मार्केटयार्ड, कोंढवा, बिबवेवाडी, गंगाधाम तसेच पुढे कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध होणार आहे. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी हा उडडाणपूल उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार, तो 2017-18 च्या अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आला होता. त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. सुमारे 9 मीटर रूंदीचा हा पूल असणार आहे.

स्वारगेट, पुणे स्टेशन तसेच हडपसरकडून आलेली वाहने मार्केटयार्ड तसेच पुढे गंगाधाम आणि कोंढव्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र, सेव्हन लव्हज चौकापासून पुढे सॅलिसबरी पार्क तसेच पुढे मार्केटकडे जाताना तसेच येताना या रस्त्याचे रुंदीकरण झालेले असले, तरी डायसप्लॉट झोपडपट्टीमुळे हा रस्ता वाहतुकीस अपुरा पडतो. परिणामी, सकाळी-सायंकाळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.

या रस्त्यावरून मार्केटयार्डसमोरून सातारा रस्ता, धनकवडी तसेच पुढे गंगाधाम चौकातून बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगरकडे जात-येत असल्याने वाहनांची संख्या लक्षणीय असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून या नेहरू रस्त्यावर सेव्हन लव्हज चौक ते मार्केटयार्ड ( वखार महामंड़ळ) गोडाऊनपर्यंत उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. सुमारे 650 मीटर अंतराचा हा पूल असून त्यावरून दुहेरी वाहतूक असणार आहे. या पुलासाठी सुमारे 28 कोटी 31 लाख रूपयांचा येणार असून त्याचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्यास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

भविष्यात होणार दुमजली पूल
महापालिकेकडून सेव्हन लव्हज चौक ते मार्केटयार्ड (वखारमहामंडळपर्यंत) उभारला जाणारा हा पूलही भविष्यात दुमजली होणार आहे. महापालिकेकडून नेहरू रस्त्याच्या काही मार्गावर एचसीएमटीआर रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला असून या रस्त्याचा विचारही या पुलाच्या रचनेत करण्यात आलेला आहे. त्यानुसार, पुलाचे बांधकाम करतानाच त्याचे खांब हे एचसीएमटीआर रस्त्याच्या रचनेशी सुसंगत असणार असल्याचे या सादरीकरणात सांगण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी हा नवीन पूल दुमजली करता येणार आहे.

असा असेल पूल 
650 मीटर
पुलाची एकूण लांबी


9 मीटर
पुलाची एकूण रूंदी


28 कोटी रुपये
खर्चास मंजुरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)