सेवा निवृत्ती’च्या लाभापासून वंचीत

अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या नशिबी लालफितीच्या झळा

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि. 26 – अंगणवाडीत आलेल्या प्रत्येक बालकाला आपल्या मुलासारखे सांभाळायचे, त्यांना छान, छान गोष्टी सांगायचा एवढचं काय तर त्यांना खाऊ-पिऊही घालायचे. त्यावेळी मानधन किती मिळते याचा विचार न करता मुलांच्या आनंदात आपला आनंद माणून सेवानिवृत्तीपर्यंत पोहचायचे. सेवानिवृत्तीनंतर राज्य शासनाकडून मिळणाऱ्या “सेवा निवृत्तीचा लाभ’ हा त्या सेविका आणि मदतनीसांसाठी खरी पुंजी असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. दुर्दैव म्हणजे लाभ मिळणाऱ्यापैकी काही लाभार्थी मदतनीस आणि सेविका यांचे निधन झाले तरी “एलआयसीकडून’ लाभ मिळत नाही. त्यामुळे जिवंत असेपर्यंत तरी सेवा निवृत्तीचा लाभ मिळेल का असा प्रश्‍न निवृत्त सेविका आणि मदतनीस यांनी उपस्थित केला आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने सेविका आणि मदतनीस यांच्या सहाय्याने जिल्ह्यात अंगणवाड्या चालवल्या जातात. तटपुंज्या मानधनावर या सेविका आणि मदतनीस मुलांवर संस्कार करत असतात. 25 ते 30 वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त झालेल्या सेविका आणि मदतनीस यांना “एलआयसी’मार्फत “निवृत्तीचा लाभ’ दिला जातो. त्यामध्ये किमान पाच वर्षे सेवा होणे आवश्‍यक आहे. ज्या सेविकेने वीस वर्ष सेवा केली. त्यांना निवृत्तीनंतर एलआयसीकडून एक लाख रुपये तर तीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर मदतनिसला 75 हजार रुपये एक रकमी दिले जातात. त्यासाठी या निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत महिला आणि बालकल्याण विभागाकडे पाठविले जाते. तेथून सर्व प्रस्ताव एलआयसीकडे वर्ग होतात. एलआयसीकडून संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

परंतु, एलआयसीकडून पत्राद्वारे करण्यात आलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव थेट एलआयसीकडे पाठवण्यात आले. त्यानुसार 2014 ते 2017 या कालावधीत निवृत्त झालेल्या 135 अंगणवाडीसेविका, मदतनिसांची यांची यादी पाठविण्यात आली आहे. हा प्रस्ताव 94 लाखांचा आहे. प्रस्ताव पाठवून अनेक महिने झाले तरी अद्याप एलआयसीकडून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळाला नाही. याबाबत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाकाडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या 135 कर्मचाऱ्यांपैकी 18 कर्मचारी मयत झाले आहेत. त्यामुळे हा लाभ आता त्यांच्या वारसांना मिळणार आहे.

कोट
सेवानिवृत्त सेविका आणि मदतनीस यांना सेवा निवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी एलआयसीकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद दिला जात नाही. दरम्यान, यापुढे ज्या अंगणवाडीसेविका, मदतनिस निवृत्त होतील, त्यांच्या सेवानिवृत्ती लाभाचा प्रश्न उद्‌भवू नये. यासाठी कर्मचारी निवृत्त होण्याआधीच सहा महिने त्यांच्या सेवानिवृत्ती लाभाचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
– दीपक चाटे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)