सेवारस्त्यांवर वाहतुकीचा ताण

पालिकेच्या उदासिनतेमुळे अतिक्रमणांमध्ये वाढ

सातारा- पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील मुख्य रस्त्यापेक्षा सेवा रस्त्यावरील ताण प्रचंड वाढला आहे. हॉटेल महाराजाच्या पिछाडीला मोनार्क हॉटेल ते आयडीबीआय बॅंक कॉर्नरच्या मार्गावर वाहतुकीला टपऱ्यांचा अडथळा होऊ लागला आहे. या अतिक्रमणांना पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या कानपिचक्‍या मिळाल्यानंतरही सातारा पालिका लक्ष देणार का? हा खरा मुद्दा आहे. पालिकेच्या उदासीनतेमुळे महाराजा हॉटेलच्या पिछाडीला अतिक्रमणे गाजर गवतासारखी वाढली आहेत. राजकीय दबावाला भीक न घालता ही अतिक्रमणे तातडीने हटवल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

पोवई नाक्‍यावर सुरू झालेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून सुरू असलेली सातारा शहराची एकेरी वाहतूक व्यवस्था शिथिल करण्यात आली आहे. शहराच्या पूर्वेकडून गोडोली मार्गे पोवई नाक्‍यावरून स्टॅन्डला जाण्यासाठी मोनार्क चौक शाहू चौक रविवार पेठेतून शिक्षक बॅंक मार्ग हुतात्मा उद्यानाकडे जाण्याचा द्रविडी प्राणायम करावा लागत आहे. मोनार्क चौकातच रिक्षा स्टॅन्ड तसेच शाहूनगरकडे जाण्यासाठी तो एकमेव मार्ग असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. तिथे वाहतूक कर्मचारी अथवा सिग्नल यंत्रणा नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र या कोंडीला या परिसरात अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या टपऱ्या कारणीभूत आहे. साताऱ्यात फळकूट दादांच्या आश्रयाने टपऱ्या उभ्या राहिल्यात ही वस्तुस्थिती आहे. मोनार्क चौकातल्या टपऱ्यांचा गॉडफादर कोण हे समजायला मार्ग नाही. मात्र, या अतिक्रमणांकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष आहे हे नक्की.

अतिक्रमण हटावचा फार्स पुरे झाला
साताऱ्यात अतिक्रमण हटाव मोहिम हा चेष्टेचा विषय झाला आहे. तुम्हाला आमचचं अतिक्रमण दिसत का? या राजकीय ब्रह्मास्त्राचा वापर करून पालिकेची यंत्रणा गुंडाळली जाते. सुरूची, जलमंदिर या दोन सत्ताकेंद्राची नावे पुढे केली की राजकीय अभय मिळते हा सातारकरांचा पक्का समज आहे. शहरातून गोडोली मार्गे येऊन शहरात येण्यासाठी हॉटेल महाराजाच्या पिछाडीचा रस्ता हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे येथील टपऱ्यांची अतिक्रमणे काढावीत असा दबाव पालिकेवर वाढू लागला आहे. वाहतूक विभागानेसुध्दा तसे पत्र पालिकेला दिल्याचे समजते. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अतिक्रमणाच्या प्रश्नावरून पालिकेचे वेळोवेळी कान उपटले त पण पालिकेने हीच गंभीर बाब कानामागे टाकली आहे.

हॉटेल महाराजाच्या पाठीमागील भागात अंर्तगत वाहतूक वाढली आहे. येथील अतिक्रमणे तत्काळ काढण्यासंदर्भात संबधित अतिक्रमण हटाव पथकाला सूचना देण्यात येतील
शंकरराव गोरे मुख्याधिकारी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)