सेल सेल सेल

रेडिओ सुरू केला तो कुठल्या तरी दुकानाची जाहिरात चालू होती –
मावशी, आत्या, काकू, भाची, नणंद इ. सर्वांचे एरवी अजिबात पटत नाही सारखं एकमेकींवर कुरघोड्या करतात, पण विशिष्ट सेलला जायचं म्हटल्यावर मात्र त्यांचे एकमत असतं- म्हणून उद्याच आम्ही सर्व एकत्र जाणार आहोत- खरेदीला – सेलला. मला हसू यायला लागलं. दोन बायकांचं एखाद्या विषयाबाबत दुमत असू शकतं, पण म्हणून सेल हा विषय असा आहे की त्यावर तमाम बायकांचं एकमत व्हावं.

दरवर्षी जून, जुलै, ऑगस्ट हे महिने म्हणजे पावसाचे – नवीन शाळा सुरू होण्याचे इ. तसेच या महिन्यातच बऱ्याचशा दुकानात “सेल’ च्या पाट्या लागल्याचे सुद्धा! फक्त शेवटचे तीन दिवस, भारी साड्या निम्या किमतीत, एका साडीवर दुसरी साडी फ्री- अशा मोहक वाक्‍यांना बायका बळी पडून दुकानात शिरतातच आणि नको नको करत भरपूर खरेदी करतात.
ही बघा- एरवी रु. 4000 ची साडी फक्त आज 1200 रुपयांना आहे. हा पॅटर्न तर नवीनच आहे अगदी एकच पीस राहिला आहे म्हणून निम्या किमतीत आहे आणि हा रंग तर तुम्हाला खूपच शोभून दिसेल- असं म्हणताना तीन साड्या बाजूला ठेवल्या जातात.

पावसाळ्यात वापरण्यासाठी ही अगदी हलकी आहे. नुसती घरी वॉश करा आणि नेसा- इस्त्री नको- स्टार्च नको पण गेटअप बघा किती भारी- हे ठेवा बाजूला. अशी भुरळ पडते ना दुकानात गेल्यावर. त्यात दुकानात शेजारची बाई जी साडी पाहात असते तीच आपल्याला हमखास आवडते- जरा दाखवा हो ती साडी… नाही नाही मी घेतली आहे. तिचे उत्तर.

दुकानदार त्यातलाच दुसरा रंग दाखवितो पण तो आवडत नाही- नजर तिच्याच साडीवर. तर अशीही साडी खरेदी. बायकांचा अगदी जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा विषय. सेलमध्ये कमी किमतीला घेतलेली साडी मिरवताना होणारा आनंद वेगळाच.

पण मैत्रिणींनो हा सेल म्हणजे काय? खरंच आपल्याला ती साडी जितक्‍या रकमेला पडते तेवढीच तिची किंमत असते का? मग आता ही एवढ्या रकमेला देताना- दिवाळी दसऱ्याला याची किंमत वाढीव असल्याने दुकानदार किती फायदा मिळवितात. याचा विचार आपण करतच नाही. व्यापाऱ्याचं मूळ उद्दिष्टच मुळी “नफा’ मिळवणं आहे. मग कुणीही व्यापारी तोटा सहन करून माल विकेल का? इतका साधा विचार “सेल’च्या पाटीकडे पाहिल्यावर खरंच सुचत नाही. पाय ओढले जातातच. हीच मेख व्यापाऱ्यांनी ओळखली आहे. म्हणूनच दरवर्षी सेलचे मोठे बोर्ड, जाहिराती, एकावर एक फ्री, वगैरे चालू असते.

लिहीत बसले आणि फोनकडे लक्षच नव्हतं. मैत्रिणीचे तीन मिस्ड कॉल पाहिले- परत फोन केला- तर जोरात ओरडलीच अगं आहेस कुठे.

“अमूक-तमूक सेलची जाहिरात पाहिलीस नां- मी चार वाजता येते- पहिलाच दिवस आहे आज आजच जाऊ; नाहीतर नंतर सगळा गाळ राहतो. साड्या, ड्रेस मटेरियल, बेडशीट सर्व आहे.’ अगं अगं पण मी काही म्हणेपर्यंत तिने फोन कट केला. मी जाण्याची तयारी करू लागले.

– आरती मोने


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)