“सेल्फी पॉइंट’वर बसवा धोक्‍याचे सूचनाफलक

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सर्व विभागाच्या यंत्रणांना आदेश
नगर – सेल्फी काढण्याच्या नादात जिल्ह्यातील प्रेक्षणीय व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांचा जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पर्यटनस्थळे धोक्‍याच्या ठिकाणी सेल्फीबाबतची बोधचिन्ह आणि सूचना फलक बसवावेत, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व विभागाच्या यंत्रणांना काढले आहेत.
जिल्ह्यात कळसुबाईचे शिखर हरिश्‍चंद्रगड रतनगड याबरोबरच अकोले तालुक्‍यातील दुर्गम भागात असणारे प्रवरा मुळा नद्यांचे उगमस्थान रंधा धबधबा मोहटादेवी प्रवरा संगम यासारखी अनेक निसर्गरमणीय तसेच धार्मिक पर्यटनस्थळे मोठ्या प्रमाणावर आहेत. या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी जिल्ह्यात वर्षभर पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. जिल्ह्यातील धरणे बॅक वॉटर परिसर अभयारण्य तलाव धार्मिक प्रसिद्ध मंदिरे लेणी डोंगरदऱ्या आणि गड किल्ले यांची संख्या मोठी आहे. अशा पर्यटनस्थळांच्या ठिकाणी स्वतःचे फोटो काढण्याकडे अलीकडच्या काळात पर्यटकांचा कल वाढलेला आहे. सेल्फी काढण्याच्या नादात किंवा अनावधानाने तोल गमावून अनेकदा पर्यटक जीव गेल्याची उदाहरणे आहेत. अशा ठिकाणी निषिद्ध क्षेत्र धोक्‍याचे ठिकाण अशा प्रकारचा सूचनाफलक लावण्यात यावा, तसेच आवश्‍यकतेनुसार सुरक्षा कठडे लावण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रशासनातील संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्‍त, जिल्हा पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा नियोजन अधिकारी, कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे क्रमांक 1 आणि क्रमांक 2 कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प, कार्यकारी अभियंता जागतिक बॅंक प्रकल्प, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग, शहर अभियंता अहमदनगर महापालिका, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, नगरपालिका नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवसी उपजिल्हाघिकारी यांनी निर्देश दिले आहे.

धोक्‍याच्या ठिकाणी पर्यटकांना बंदी
प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात अनेकदा पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर घडल्या. या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांचा जीव वाचवण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेच्या हेतूने पर्यटनस्थळी असणाऱ्या धोक्‍याच्या ठिकाणी सेल्फी पॉइंटवर बोधचिन्ह आणि सूचना फलक लावण्यात यावे, असे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले. याअनुषंगाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची संख्या लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने उपायोजना करण्यात येत आहेत.धोक्‍याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालावी तसेच कोणत्याही प्रकारची जीवीत व वित्तीय हानी होणार नाही, याबाबत आवश्‍यक उपाययोजना करून त्याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, अशा सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)