सेन्सॉरमुक्‍त मनोरंजनाचे नवे माध्यम   

विनिता शाह

मनोरंजनाचे क्षेत्र पूर्वी राजेरजवाड्यांपुरते सीमित होते. व्यक्‍तिगत स्वरूपाच्या मनोरंजनानंतर सामूहिक मनोरंजनाची अनेक माध्यमे आली. नाटक, सिनेमा आणि छोट्या पडद्यानंतर आता स्ट्रीमिंग मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन पुन्हा एकदा व्यक्‍तिगत होत आहे. कोणत्याही प्रकारचे सेन्सॉरचे किंवा कायद्याचे बंधन नसलेल्या या माध्यमाची खुलेपणा हीच ताकद असून, यासंदर्भात अद्याप गांभीर्याने चर्चाही सुरू झालेली नाही आणि स्ट्रीमिंग माध्यमाच्या प्रेक्षकांची संख्या वाढतच चालली आहे. या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. 

बमालिकांना सेन्सॉरच्या कक्षेत आणावे, अशी मागणी करणारी याचिका नुकतीच उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मोबाइलच्या छोट्या पडद्यावर किंवा लॅपटॉप, डेस्कटॉपवर मुक्‍त मनोरंजनाचे हे माध्यम कोणाच्याही नियंत्रणाखाली नसल्यामुळे मनोरंजनाच्या नावाखाली तिथे काहीही चाललेले असते. परिणामी, कुणावरील वैयक्तिक टीकाटिप्पणीपासून सेक्‍सपर्यंत आणि अभद्र शब्दांपासून खालच्या दर्जाच्या संवादांपर्यंत कशावरही नियंत्रण राहिलेले नाही, असे आक्षेप आता घेतले जाऊ लागले आहेत.

सेन्सॉरमुक्‍त माध्यम हातात आल्यामुळे वेबमालिकांची निर्मिती करणारेही कधी नव्हे एवढे मोकळेपण अनुभवत असून, या मोकळेपणाचा लाभ घेऊन इतर माध्यमांमध्ये जे दाखवता येत नाही, अशा मुद्द्यांना वाचा फोडायची की त्याचा गैरवापर करून रुचिहीन मनोरंजनाकडे वळायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न! तूर्त तरी त्यावर नियंत्रण नसल्यामुळे निर्माते आणि कलावंतांनीच हा निर्णय घ्यायचा आहे. नेटफ्लिक्‍स या इंटरनेट कन्टेन्ट सप्लायरच्या माध्यमातून प्रसारित होणारी “सेक्रेड गेम्स’ ही अशीच एक वेबमालिका अनेक कारणांनी चर्चेत आहे.

या मालिकेत राजीव गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी अनेकांची तक्रार आहे. मालिकेत अश्‍लील दृष्ये मुक्तपणे दाखविण्यात आली आहेत आणि अपशब्दांचीही मुक्त उधळण केली जाते, असाही आक्षेप आहे. अनेक वेबमालिकांबाबत असे आक्षेप घेतले जातात. वेबमालिका किंवा नेटफ्लिक्‍ससारखी माध्यमे ही एकंदरीतच सेन्सॉरच्या बंधनापासून मुक्त आहेत. मनोरंजनाच्या क्षेत्राचा प्रवास व्यक्तिगत मनोरंजनाकडून पुन्हा एकदा व्यक्तिगत मनोरंजनापर्यंत येऊन ठेपला आहे. पूर्वी राजेरजवाडे

स्वतःच्या मनोरंजनासाठी आपल्या कक्षात कलावंतांना आमंत्रित करीत होते. नंतर सर्वांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी, अगदी रस्त्यांवरही होऊ लागले. थिएटरमध्ये चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून मनोरंजन केल्यानंतर कलावंतांना दूरचित्रवाणीचा छोटा पडदा उपलब्ध झाला. आता पुन्हा एकदा हे माध्यम पूर्णपणे व्यक्तिगत होत असून, मोबाइल ऍप्लिकेशन आणि पर्सनल टीव्हीपर्यंत पोहोचले आहे. नेटफ्लिक्‍स, अमेझॉन प्राइम, ऑल्ट बालाजी, हॉटस्टार अशा नावांची अनेक माध्यमे बाजारात प्रचलित असून, त्यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपटाची परिभाषा बदलली आहे.

या कंपन्यांनी केवळ मनोरंजनाच्या क्षेत्रात जम बसविला आहे असे नाही, तर स्ट्रीमिंग आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसारखे नवे शब्द लोकांना या कंपन्यांमुळे परिचयाचे झाले आहेत. व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉम्प्रेस करून इंटरनेटच्या साह्याने थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम म्हणजे स्ट्रीमिंग मीडिया होय. हे व्हिडिओ आणि ऑडिओ पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी ते कोणाच्याही हार्ड ड्राइव्हवर सेव्ह करावे लागत नाहीत. स्ट्रीमिंग मीडियाच्या क्षेत्रात दोन प्रकारच्या कंपन्या अस्तित्वात आहेत. ज्या कंपन्यांकडे

स्वतःचे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात अशा कंपन्या पहिल्या वर्गात मोडतात. अशा कंपन्यांमध्ये हॉटस्टार, ऑल्ट बालाजी या कंपन्यांचा समावेश आहे. दुसऱ्या वर्गात अशा कंपन्या आहेत, ज्या इतर मीडिया हाउसचे कार्यक्रम आपल्या व्यासपीठावरून प्रसारित करतात. नेटफ्लिक्‍स, अमेझॉन प्राइम या अशा कंपन्या होत. भारतात स्ट्रीमिंग माध्यमाचा प्रसार 2017 मध्ये 117 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. नेटफ्लिक्‍स हा भारतातील सध्याचा सर्वांत वेगाने वाढलेला स्ट्रीमिंग मीडिया मानला जातो. परंतु अमेझॉन प्राइमची नेटफ्लिक्‍सबरोबर मोठी स्पर्धा सुरू आहे. अर्थात, नेटफ्लिक्‍सच अधिक चर्चेत आहे. स्ट्रीमिंग मीडियाच्या आगमनाबरोबर आणखी एक शब्द आपल्या शब्दकोशात समाविष्ट झाला आहे आणि तो म्हणजे “बिंग वॉचिंग’. न थांबता किंवा अगदी थोडे ब्रेक घेऊन सातत्याने ऑनलाइन शो पाहणे असा या शब्दाचा अर्थ आहे.

भारतात “बिंग वॉचिंग’ इतके लोकप्रिय झाले आहे की, मेक्‍सिकोच्या खालोखाल भारताचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. स्मार्टफोनमधील असंख्य प्रकार आणि मोबाइल डाटा स्वस्त होणे या कारणांमुळे भारतात एकट्या नेटफ्लिक्‍सला एका दिवसात 14 कोटी तास एवढ्या प्रचंड सरासरीने प्रेक्षकवर्ग लाभला आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास भारतीयांकडून आठवड्याला एक अब्ज तास नेटफ्लिक्‍स पाहिले जाते. एकीकडे जिओसारख्या कंपन्यांनी मोबाइल डाटाची समस्या सौम्य केली आहे तर दुसरीकडे लोकांना वेळ कमी असल्यामुळे पारंपरिक टीव्ही आणि अन्य साधनांना वेळ देणे अवघड होत चालले आहे. अशा स्थितीत स्ट्रीम मीडिया लोकांना त्यांच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार कार्यक्रम पाहण्याचे स्वातंत्र्य बहाल करतो.

पारंपरिक माध्यमांमध्ये भाषा, स्थान आणि वेळेचे निर्बंध असतात; मात्र स्ट्रीमिंग मीडियावर लोक जे हवे ते हवे तेव्हा पाहू शकतात. मनोरंजनाचे हे माध्यम सर्व प्रकारच्या कायदेशीर बंधनांपासून आणि मुख्य म्हणजे सेन्सॉरच्या कचाट्यापासून दूर आहे. या माध्यमात कोणतीही मालिका प्रसारित करण्यासाठी सेन्सॉरची अनुमती घ्यावी लागत नाही. त्यामुळेच पारंपरिक माध्यमांवर असतात तशा मालिकांपासून अगदी बोल्ड मालिकांपर्यंत अनेक प्रकार या माध्यमात उपलब्ध आहेत. हे माध्यम संपूर्ण जगाला एका व्यासपीठावर आणते आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असलेली मनोरंजन सामग्री एकाच ठिकाणी उपलब्ध असणे हे या माध्यमाच्या यशाचे महत्त्वाचे कारण ठरले आहे.

इंटरनेट हे आजकालच्या जगातील इतके सशस्त माध्यम आहे की, जवळजवळ प्रत्येक टेलिव्हिजन चॅनेलने आपापले मोबाइल ऍप्लिकेशन बाजारात उपलब्ध केले आहे. या ऍप्लिकेशनना लाभलेल्या सबस्क्राइबर्सची संख्याही मोठी आहे.
सर्वसामान्य टेलिव्हिजन चॅनेलचे ऍप्लिकेशन आणि स्ट्रीम मीडिया यामध्ये जो महत्त्वाचा फरक आहे, त्यामुळेच स्ट्रीमिंग मीडियाने सर्वसामान्य टेलिव्हिजन चॅनेलपेक्षा आघाडी घेतली आहे. एकीकडे स्ट्रीम मीडियावर अशा वेबमालिका असतात, ज्या खास त्या माध्यमासाठीच तयार केलेल्या असतात, त्याच वेळी सामान्य ऍप्लिकेशन आपल्या टेलिव्हिजनवर येणाऱ्या मालिकाच प्रदर्शित करतात.

त्यामुळे सामान्य टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना फारसे काही नवीन पाहावयास मिळत नाही. नेटफ्लिक्‍स आणि अमेझॉन प्राइम यांसारखे स्ट्रीम मीडिया प्लॅटफॉर्मच मनोरंजन क्षेत्राचे भविष्य आहेत. अर्थात, येथेही इंटरनेटच्या माध्यमात असलेल्या सर्व समस्या आहेतच. पहिली समस्या म्हणजे, हे माध्यम सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी खुले आहे. त्यामुळे मुले काय पाहतात, याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी अर्थातच पालकांवर येऊन पडते.

टीव्ही चॅनेलपासून अगदी भिन्न असलेली नेटफ्लिक्‍ससारखी कन्टेन्ट सप्लायर माध्यमे खुलेपणामुळे बाजारपेठेत मोठ्या वेगाने जम बसवीत असल्याचे पाहायला मिळते. ऑल्ट बालाजीमधील काही कार्यक्रम या खुलेपणाच्या बाबतीत नेटफ्लिक्‍सशी स्पर्धा करू पाहत आहेत. ऑल्ट बालाजीच्या एका कार्यक्रमात सुरुवातीलाच इशारा दिला जातो की, हा कार्यक्रम पाहताना आवाज कमी ठेवा. आपण खूपच वेगळे असे काहीतरी पाहणार आहात… दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास या माध्यमाद्वारे “सॉफ्ट पॉर्न’ दाखविले जाते. अशा प्रकारांबद्दल गंभीर चिंतन तर दूरच; पण गंभीर विचारविनिमयही अद्याप सुरू झालेला नाही. अर्थात, यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेमधून विषयाला तोंड फुटले आहे. हा विषय पुढे कोणते रूप धारण करतो आणि त्यामुळे “खुलेपणा’ ही स्ट्रीमिंग माध्यमाची मुख्य ताकद किती प्रमाणात टिकून राहते, हेच आता पाहायचे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)