सेनेचे ‘स्व-तंत्र’

जयदेव डोळे  (ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ)

डाच्या झाडाखाली जसे दुसरे रोपटे वाढत नाही तसे राष्ट्रीय पक्षाच्या सावलीत शिवसेना किंवा इतर स्थानिक पक्षांना वाढ संभवत नाही. सेनेच्या हिंदुत्वावरही संघ व भाजप यांनी डल्ला मारायला सुरुवात केल्यामुळे उद्धव ठाकरे यांची अडचण झाली आणि अखेर त्यांनी येत्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधींकडे आकर्षित होणारा तरुण वर्ग लक्षात घेऊन आदित्य ठाकरेला नेता म्हणून स्वीकारण्यात भाग पाडले आहे. येणाऱ्या काळात हिंदुत्व अथवा मुसलमान विरोध शिवसेनेने सोडून दिला पाहिजे. महाराष्ट्राचे भारतातील वर्चस्व आणि मुंबईचे जागतिक महत्व हे उद्यमशीलता, पुरोगामित्व, कर्तबगारी आणि बुद्धीमत्ता यावर टिकलेले आहे. त्याचा आधार मिळाला तर शिवसेना भाजपच्या तोडीस प्रतिस्पर्धक म्हणून उभी राहू शकते.

-Ads-

सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांचा भाषेच्या आधारावर राज्यनिर्मितीला विरोध होता. म्हणूनच स्वातंत्र्यचळवळीबरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत संघाचा सहभाग नव्हता. तिथूनच संघ विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहिला पाहिजे. शिवसेना महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर जन्माला आली असली तरीही तिच्यातील नेते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सामील होते. साहाजिकच राष्ट्र की महाराष्ट्र हा पेच नंतर शिवसेनेने महाराष्ट्र आपल्यापुरता ठेवून सोडवला. म्हणून आज कोणताही प्रादेशिक पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर युती करत नाही किंवा केली तरीही तो टिकवू शकत नाही. यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाषेच्या आधारावर राज्यनिर्मितीला विरोधाचे तत्त्व आहे.

शत-प्रतिशत भाजप याचा अर्थच मुळी भाषिक भेद संपवून राष्ट्रीय व धार्मिक ऐक्‍य टिकवण्याचे ध्येय समोर ठेवणारा पक्ष असे आहे. म्हणूनच वडाच्या झाडाखाली जसे दुसरे रोपटे वाढत नाही तसे राष्ट्रीय पक्षाच्या सावलीत शिवसेना किंवा इतर स्थानिक पक्षांना वाढ संभवत नाही. म्हणायला हिंदुत्व हा जरी समान मुद्दा असला तरीही संघाचे हिंदुत्व आणि शिवसेनेचे हिंदुत्त्व यात फरक आहे. संघाचे हिंदुत्व ब्राह्मणी तर शिवसेनेचे हिंदुत्व बहुजन आहे. सेनेच्या हिंदुत्वावरही संघ व भाजप यांनी डल्ला मारायला सुरुवात केली होती. म्हणूनच हिंदुत्त्वापुढे शिवसेना टिकू शकणार नाही म्हणून महाराष्ट्र आणि मराठी भाषा या अनुषंगाने शिवसेना आता वाटचाल करु लागली आहे.

शिवसेनेने मराठा, ओबीसी यांचा पाठिंबा मिळवला होता. मुसलमान आणि दलित यांच्या विरोधातील राग त्यांनी मराठवाडा भागात आपल्याकडे एकवटला होता. मराठवाड्यातील तीन जिल्हे सर्वस्वी शिवसेनेच्या प्रभावाखाली आहेत. अन्यत्र त्यांना तुरळक यश मिळते. परंतु हिंदुत्वाला मोठा प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याने शिवसेनेची अडचण झाली आणि त्यांनी वेगळेपणाचा मुद्दा उकरून काढला आणि आता येणारी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. तसे दोन्हीही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढले होतेच; पण आता सत्तेत राहूनही स्वतंत्र होण्याचा निर्णय करणे याचा अर्थ असा की, गुजरातमध्ये भाजपला मोठा फटका बसला आणि त्याने शिवसेनेचे डोळे उघडले. गुजरातेत ना हिंदुत्व चालले ना विकास; ना मोदी चालले ना पटेल. आता महाराष्ट्रात तसेच वातावरण उद्‌भवू होऊ शकते याचा अदमास शिवसेना नेत्यांना आला आहे.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी पुन्हा एकदा मुसंडी मारली असून जनमत भाजपला प्रतिकूल केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी आणि महाराष्ट्र या मुद्दयावर सत्ता टिकवायची; पण लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी मोठ्या पक्षांना वाव मिळेल असे वातावरण निर्माण करायचे आणि भाजपला कोंडीत पकडायचे असा डाव शिवसेना खेळते आहे. जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि अन्य संस्थांवर शिवसेनेचा प्रभाव वाढतो आहे. सहकार अथवा शिक्षण किंवा जनसंग्राहक राजकारण शिवसेना करत नाही. संस्थात्मक उभारणी किंवा विधायक स्मारके शिवसेनेला जमत नाहीत. तेथेही भाजपने शिवसेनेवर मात केली आहे.

आपला चळवळ्या व आंदोलक चेहरा कायम ठेवून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणे हेच शिवसेनेचे वर्तन राहिले आहे आणि ते तसेच राखू इच्छिते. भाजप मात्र महत्त्वाकांक्षी पक्ष असल्याने आणि रा. स्व संघाला हिंदुराष्ट्र बनवण्याची घाई झाल्याने शिवसेनेसारख्या मित्रपक्षाला बेजार करणे आणि त्यावर मात करणे सुरु झाले होते. थोडक्‍यात महाराष्ट्राच्या अस्मितेवर हिंदुराष्ट्राची अस्मिता मात करु लागली होती. ज्या पक्षाचा आधारच महाराष्ट्र आहे त्या पक्षाला हे खपणे अशक्‍य होते. म्हणून शिवसेनेने महाराष्ट्रापुरता आपला प्रभाव पुन्हा एकदा स्वतंत्रपणे निर्माण करण्याचा निर्धार केलेला दिसतो.

दुसरे म्हणजे राहुल गांधींचा स्वीकार भारतीय नागरिक करु लागल्याचे दिसून येताच आदित्य ठाकरेचा नेता म्हणून स्वीकार करायला आता भाग पाडले जात आहे. तरुण वर्ग राहुल गांधींकडे आकर्षित होत असल्याचे दिसताच आदित्य ठाकरेलादेखील त्याच्या जोडीने नेता म्हणून उभे करण्याचा प्रयत्न शिवसेना करीत आहे. या दोन तरुणांच्या बरोबरीचा एकही नेता भाजपपाशी नाही. भाजप आता प्रौढ आणि वृद्ध नेतृत्वाच्या हाती गेली आहे. संघातही तरुण नेतृत्व नाही. त्यामुळे राहुल आणि आदित्य हे दोघे जण महाराष्ट्राला आपल्याकडे खेचू शकतील असाही शिवसेना नेत्यांचा अंदाज असू शकतो.

येन केन प्रकारेन भाजपचे मतदान आपल्याकडे खेचायचे आणि भाजपची मते विभागतील असे राजकारण करायचे शिवसेनेने ठरवले आहे. पण त्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता हा पाया त्यांना नव्याने उभा करावा लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षा शिवसेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण आदित्यच्या हाती सोपवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतो.
ओबीसी समाजघटक अजूनही भाजपकडे टिकून आहे. त्यांना आपल्याकडे कसे वळवायचे त्याचा विचार सेनेकडे झालेला दिसत नाही. पुन्हा दलित आणि मुसलमान यांच्या विरोधात शिवसेना गेली तर मात्र शिवसेनेचे शक्तीहरण होऊ शकते. कारण दोन हिंदुत्ववाद्यांच्या तुलनेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा अल्पसंख्याक गट त्यांचा स्वीकार करतील अशी शक्‍यता आहे. संघासारखीच भाषा शिवसेना करते.

जात पाळत नाही, धर्म पाळत नाही, वर्गीय भेद पाहात नाही असे शिवसेनेचे म्हणणे असते. मात्र आर्थिक धोरणांचा परिणाम हा विषमतेत होऊ लागल्याने शिवसेनेला आता अर्थविषयक तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक काही विचार मांडत रहावे लागतील. कारण सोशल मिडियाने तरुणांना धर्म व जात या पलीकडचे जग दाखवायाला सुरुवात केली आहे. राहुल गांधी आणि आदित्य हे त्या पलीकडच्या जगाचे प्रवक्ते आणि प्रतिनिधी आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा हिंदुत्व अथवा मुसलमान विरोध शिवसेनेने सोडून दिला पाहिजे.

महाराष्ट्राचे भारतातील वर्चस्व आणि मुंबईचे जागतिक महत्व हे उद्यमशीलता, पुरोगामित्व, कर्तबगारी आणि बुद्धीमत्ता यावर टिकलेले आहे. त्याचाच आधार शिवसेनेला मिळाला तर शिवसेना भाजपच्या तोडीस प्रतिस्पर्धक म्हणून उभी राहू शकते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)