सेतू कार्यालयात जाण्यापेक्षा दलालच बरे !

बावडा- शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तहसीलदार कचेरीतील दाखला हवाच. मात्र, हे दाखले घेण्यासाठी इंदापूर येथील नागरी सुविधा केंद्रातच जावे लागते. पण इथली कार्यपद्धती पाहता सर्वसामान्य, अडाणीच काय पण सुशिक्षित वर्गदेखील येथे जाण्यापेक्षा दलालांकडेच जाणे पसंत करतात. ते पैसे जास्त घेतात पण यांच्यासारखा त्रास तरी देत नाहीत असे ही सांगत आहेत.
इंदापूर तहसील कार्यालयांतर्गत चालविण्यत येणाऱ्या नागरी सुविधा केंद्रामध्ये (सेतू) गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक सुरूच आहे आहे. सेतूचा ठेका बदलला तरीही परिस्थिती मात्र, कायम असल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो आहे.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षण सवलती आदींसाठी लागणारी कागदपत्रे यामध्ये उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला, वय-अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला (डोमासाईल), विविध प्रतिज्ञापत्रे, तहसीलदार रहिवासी दाखला, 30 टक्के महिला आरक्षण, खुला गट, नॉन क्रिमिलेअर दाखला, शेतकरी दाखला आदी दाखले व कागदपत्रे नागरी सुविधा केंद्रातून (सेतू) दिली जातात. हे सेतू कार्यालय हे तहसीलदारांच्या अंतर्गत ठेकेदारी तत्वावर चालवले जाते.इंदापूर येथे तहसील कचेरीला लागूनच हे नागरी सुविधा केंद्र सुरू आहे; परंतु येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
असा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. याबाबत अनेक नागरिक, संघटना व कार्यकर्त्यांनी तोंडी व लेखी स्वरुपात तहसीलदार व वरिष्ठ कार्यालयात तक्रारी केल्या. त्यानंतर नुकतेच मंगळवार (दि.1) पासून जुन्या ठेकेदार कंपनीकडून ठेका काढून घेऊन जे. एम. के. इन्फोसॉफ्ट, औरंगाबाद या कंपनीकडे देण्यात आला; परंतु “नाकातले काढून नाकावरच’ लावले या म्हणीचा प्रत्यय नागरिकांना येतोच आहे.कोणत्याही दाखल्यासाठी हेलपाटे मारायला लावणे, अवाजवी रकमेची मागणी करणे, वैद्यकीय कारणासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी पैशाअभावी वेठीस धरणे असे एक ना अनेक प्रकार याठिकाणी अनुभवायला रोजच मिळतात.

  • सध्याची ठेकेदार कंपनी नवविनच आहे, त्यामुळे परिस्थिती सुधारण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. कदाचित काही दिवसांनी कामकाज सुरळीत होऊ शकते. पण यासाठी ठेकेदार कंपननीने व्यवस्थीत लक्ष घालायला हवे. तरीही आम्ही सेतू कार्यालय ठेकेदारी पद्धतीने खासगी कंपनीकडे देण्याऐवजी तहसील विभागाकडेच चालवण्यास द्यावे आम्ही उत्तम प्रकारे चालवून लोकांची गैरसोय थांबवण्याचा प्रयत्न करू, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती; परंतु एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून खासगी कंपनीकडे सेतू कार्यालय देण्यात आले.
    -श्रीकांत पाटील, तहसीलदार, इंदापूर
  • लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे
    इंदापूर येथे नागरी सुविधा केंद्रातील अवाजवी कारभाराकडे तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी यांनी आवर्जून लक्ष घालावे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होणार नाही. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घेता येईल. सेतूतील या कारभारामुळेच अनभिज्ञ लोकच काय पण सुशिक्षित लोकही या त्रासाला कंटाळून जातात याची लोकप्रतिनिधींनी अवश्‍य दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)