सेंद्रीय शेतीकडे वळालेला अवलिया!

कृषी वार्ता : शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास उंचावणारी अनोखी “मशागत’

नाणे मावळ – स्वातंत्र्योत्तर काळात अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खताचा वापर केला गेला. रासायनिक खते, कीटक आणि तण नाशकांचा अतिरेकी वापर झाला. उत्पादन वाढले, त्याबरोबरच उत्पादन खर्चही वाढला आणि शेतकऱ्यांचे “बजेट’ बिघडले. मावळातील कान्हे गावातील शिक्षक अनिल सातकर अशाच पद्धतीने सेंद्रीय शेती करीत आहेत. शेतमालाचा बेभरवाशाचा बाजारभाव, दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हरवलेल्या आत्मविश्‍वासावर फुंकर घालणाऱ्या सेंद्रीय शेतीविषयी दै. प्रभातने घेतलेला आढावा…

रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबरच माणसांचेही आरोग्य धोक्‍यात आले आहे. यासाठी “झिरो बजेट’ नैसर्गिक शेती हाच पर्याय असल्याने कान्हे (ता. मावळ जि. पुणे) येथील अनिल सातकर या तरुण शिक्षकाने आपल्या शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग करत पालेभाज्या व टोमॅटो, वांगी यांसारख्या पिकांचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. याकरिता शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्यापासून प्रेरणा घेत पेशाने शिक्षक असलेल्या सातकर यांनी आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर न करता “झिरो बजेट’ शेती करण्यास सुरुवात केली.

सातकर यांनी सर्वप्रथम देशी गायींचे संगोपन केले. देशी गायीचे दूध व मलमूत्र आरोग्यवर्धक आहे. तसेच शेतामध्येही मलमूत्रापासून तयार केलेल्या जीवामृतच्या फवारण्या केल्या आहेत. मोकळी हवा आणि चांगल्या सूर्यप्रकाशामुळे पीक जोरदार आले. देशी गाईचे मलमूत्र, शेण, गूळ व डाळीच्या पिठापासून तयार केलेले जीवामृत याचा वापर केल्याने पिकांच्या अंगात अधिक रोगप्रतिकारक शक्‍ती येते. याचबरोबर वेगवेगळे औषधी गुणधर्म असणाऱ्या झाडांचा पाला देशी गायीच्या गोमूत्रात कुजवून त्याचे दशपर्णी अर्क तयार करून त्याच्यात फवारण्या या पिकांवर करण्यात आल्याचे सातकर सांगत आहेत.

याशिवाय जीवामृत पाण्याबरोबर सोडण्यात आले. एकदा पिकांवर शिंपडले व एकदा त्याची फवारणी करण्यात आली. जमिनीची सुपीकता चांगली राहते. सर्वांनीच या सेंद्रीय शेतीचा अवलंब केला पाहिजे. जेणेकरून जमिनीच्या सुपीकतेबरोबरच मानवाचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असल्याचे सातकर सांगायला विसरत नाहीत. सातकर यांच्या शेतात यावर्षी कुठलाही खर्च न करता दीड लाख रूपये मिळतील, असे उत्पादन शेतात आहे. या शेतीतून मिळाणाऱ्या उत्पादनाचे “ऑनलाईन बुकिंग’ घेऊन विक्री व्यवस्थापन केले आहे. वर्षेभरासाठी भाज्यांचे दर निश्‍चित आहेत. सध्या तीस ग्राहकांनाच भाजी पुरवठा करत आहेत. पुढील वर्षांपासून 300 ते 500 ग्राहकांना भाजीपाला देण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यांच्या या कामात त्यांचे कुटुंबीयांची मदत घेतली जाते. त्यांच्या या शेतीला तालुका आणि जिल्ह्यातील अनेक कृतिशील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत शेतीच्या अनेक शाखा निर्माण झाल्या आहेत. कोरडवाहू शेती, बागायती शेती, रासायनिक शेती, सेंद्रीय शेती, निसर्ग शेती, “झिरो बजेट’ शेती याबरोबरच फळांची शेती, फुलांची शेती, भाज्यांची शेती अशा अनेक उपशाखा तयार झाल्या आहेत. नैसर्गिक शेती ही फायद्याची नाही, असा एक भ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नैसर्गिक शेती ही फायद्याची केली जाऊ शकते, याचेही उदाहरण आहेत.

गांडूळ शेती, गांडूळ खतनिर्मिती फायद्याची…
पूर्वी आपल्या देशात प्रत्येक शेतकरी स्वतःला लागणारे खत स्वतःच निर्माण करत होता. ती पद्धत आता उपयोगात आणण्याची गरज आहे. गांडूळ खतनिर्मिती, गांडूळ शेती असे प्रयोगही केले गेले पाहिजेत. वैज्ञानिक क्षेत्रात झालेली प्रगती लक्षात घेऊन कचऱ्यावर प्रक्रिया करून अतिशय कमी काळात कचरा कुजवून त्याचे खतात रूपांतर करता येते व तेही पूर्णपणे सनैसर्गिक पद्धतीने. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचण्याची गरज आहे.

सेंद्रिय शेतीकडे वाढता कल…
नैसर्गिक अन्नपदार्थ वापरण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. अशा पदार्थांना बाजारात वेगळी किंमत द्यायला ग्राहक तयार आहेत. देशी गायीच्या दूध, तुपाला अधिक पैसे दिले जातात. शंभर टक्‍केसेंद्रिय शेतमालाला ग्राहक अधिक पैसे देतो. आयटी क्षेत्रातील तरुण मंडळी नोकरी सोडून नैसर्गिक शेती करण्यावर भर देत आहेत. ठिकठिकाणी असे प्रयोग होत आहेत आणि त्यात अनिल सातकर यांसारखे तरुण यशस्वी होत आहेत.

रासायनिक खतांच्या अति वापराने शेतजमिनीचे “आरोग्य’ बिघडले. यासाठी आता शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे. बियाण्यांपासून “मार्केटिंग’पर्यंत जे संघटित होतील, तेच टिकतील. “झिरो बजेट’बरोबरच सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्‍यक असून, तरच शेतकरी समृद्ध होईल. तरुणांनी शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले पाहिजे.
– अनिल किसन सातकर, शेतकरी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)