सेंद्रीय उत्पादन घेणाऱ्या उद्योजिकांना प्रोत्साहन

पहिल्या मुंबई भारतीय महिला सेंद्रीय महोत्सवाला चांगला प्रतिसाद
मुंबई – रासायनिक उत्पादनांपासून आपल्या भावी पिढ्यांचे संरक्षण व्हावे तसेच कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे रोग टाळता यावेत, याकरिता आपण सेंद्रीय शेती आणि सेंद्रीय उत्पादनांचा स्वीकार केला पाहिजे. सेंद्रीय पिके आणि अन्नधान्यात असलेल्या सॅलिसिलिक आम्लामुळे कर्करोगाशी सामना करण्यासाठी सहाय्य होते तसेच पक्षाघात, हृदयविकार यासाठी कारणीभूत असणारे रक्तवाहिन्यांचे आकुंचन टाळता येते असे केंद्रीय महिला महोत्सव 2018 च्या अँबेसेडर जुही चावला यांनी सांगितले. भारतीय महिला सेंद्रीय महोत्सववादरम्यान त्या बोलत होत्या. स्त्रियांसाठी उत्तम, भारतासाठी उत्तम आणि तुमच्यासाठीही उत्तम ही या वर्षाच्या महोत्सवाची संकल्पना आहे.

सेंद्रीय वस्तुंमुळे होणारे आरोग्य आणि पर्यावरण विषयक फायदे अधोरेखित करणे हा या महोत्सवाचा हेतू आहे. तसेच सेंद्रीय वस्तू उत्पादक महिलांना मंच उपलब्ध करून देणे तसेच देशाच्या दुर्गम भागातल्या महिला उत्पादकांना विक्रीसाठी सहज उपलब्ध होणारे मार्ग उपलब्ध करून देणे हाही उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्लीनंतर प्रथमच महिलांसाठी सेंद्रीय महोत्सव साजरा केला जात असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार नंदिता मिश्रा यांनी स्पष्ट केले. लाखो महिला आणि शेतकऱ्यांसाठी शास्त्रीय माहिती मिळून त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी हा मंच असल्याचे त्यांनी सांगितले. अशा महोत्सवांमुळे तळागाळातल्या महिलांना प्रोत्साहन मिळेल असे सांगून महिलांनी अशा महोत्सवात सहभागी व्हावे आणि सेंद्रीय अन्नपदार्थ आणि शेतीविषयी माहिती सर्वत्र प्रसारीत करावी असे आवाहन नंदिता मिश्रा यांनी केले.

कडधान्य, ज्वारी, मका यासारखी सेंद्रीय अन्नपदार्थ नेहमीच्या अन्नपदार्थांपेक्षा अधिक महाग का असतात? या प्रश्‍नाचे उत्तर देतांना जुही चावला यांनी सांगितले की, सेंद्रीय बी-बियाणे अधिक महाग असते, त्यामुळे निर्मितीची प्रक्रियाही अधिक खर्चिक होते. मात्र सरकारी सेंद्रीय दुकानात याच वस्तू रास्त दराने उपलब्ध आहेत. सेंद्रीय अन्नपदार्थांबद्दल आणि अशा विक्री केंद्रांबाबत लोकांच्यात जागृती कमी असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या सेंद्रीय दुकानांबद्दल सर्वसामान्यांना अधिक माहिती होण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आणि व्यवस्थापकीय संचालक इंद्रा माला यावेळी उपस्थित होते.

2015 पासून भारतीय महिला सेंद्रीय महोत्सव साजरा केला जात आहे. यंदा महोत्सवाचे तिसरे वर्ष असून महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 16 ते 20 मार्च 2018 दरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई येथे आयोजित झालेल्या पाच दिवसांच्या महोत्सवात देशभरातून महिला सहभागी झाल्या. या महोत्सवात डाळी, कडधान्य, मसाले, सौंदर्य प्रसाधने, तेल, मध, लोणची, चहा, सेंद्रीय बी-बियाणे तसेच इतर जैविक उत्पादने उपलब्ध आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)