कोल्हापूर – शाहूवाडी पोलीस ठाण्यातील पळून गेलेल्या सूरज्या-गोंद्या टोळीचा म्होरक्‍या सुरज आणि गोविंद या दोघांना पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. सुरज सर्जेराव दबडे (वय 20, वाठार ता. हातकणंगले) आणि गोविंद वसंत माळी (वय 20, कासेगाव ता.वाळवा) अशी या आरोपींची नावे आहेत.

जिल्ह्यातील शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या लॉकपच्या दरवाजाचे ग्रील उचकटून सुरज दबडे, ओंकार सुर्यवंशी, गोविंद माळी आणि विराज कारंडे या चार संशयित आरोपींनी शुक्रवारी पळ काढला होता. पळून गेलेल्या चार आरोपी पैकी शनिवारी (ता. 19) ओंकार सूर्यवंशी आणि विराज कारंडे या दोन आरोपींना पोलिसांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी-वाठार जवळ जेरबंद केले होते.

तर सुरज दबडे आणि गोविंद माळी हे दोघे आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. गेली दोन दिवस पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान (सोमवारी) सकाळी या दोन्ही आरोपींना देखील पोलिसांनी जेरबंद केले आहे. या चौघा आरोपीवर दरोडा, घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे 34 गुन्हे दाखल आहेत. या चौघा आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मोक्का लागण्याच्या भीतीनेच या आरोपींनी पोलिस कोठडीतून पळ काढला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)