सूडबुद्धीने कारवाई केल्यास जलसमाधी घेऊ

घोडनदी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा संताप : शशिकांत दसगुडे यांनी दिला इशारा

शिरूर- शिरूर घोडनदीजवळील कोल्हापुरी बंधारे बाजूला असणाऱ्या पाणीउपसा करणाऱ्या मोटारी जप्त करून पाईप व वीज कनेक्‍शन तोडण्याची कार्यवाही केली आहे. शिरूर नगरपरिषद व महसूल खाते यांच्या वतीने केलेली कारवाई चुकीची आहे. याबाबत शेतकऱ्याला कुठलीही पूर्वसूचना न देता केलेली आहे. शेतकऱ्यांच्या कार्याचा व पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आहे, हे प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे. यापुढे अशी कारवाई झाली तर या भागातील शेतकरी नदीत बसून जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे व शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव जाधव, विष्णूपंत दसगुडे, विजय दसगुडे, नवनाथ करे, भानुदास लोंढे, अशोक दसगुडे, संदीप कर्डिले, प्रल्हाद पवार, रंगनाथ दसगुडे, उत्तम धरणे, संजय दसगुडे, ज्ञानेश्‍वर दसगुडे, सुभाष कर्डिले उपस्थित होते.
शिरुर नगर परिषद, महसूल विभाग, वीज वितरण या विभागाने केली आहे. या कारवाईत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात पावसाने दडी मारल्याने ज्वारी, मूग, ज्वारी हे पिके आलेली नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. नुकतेच कांदा पीक जोमात आले अजून दोन-तीन पाण्याचे आवर्तन त्याला दिले तर तो कांदा काढणीला येणार आहे. गहू पिकाची तीच परिस्थिती आहे. अशा प्रकारे वीज कनेक्‍शन तोडून तोंडाशी आलेला कांदा व गहू यांचे नुकसान होणार आहे. यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत येणार आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांच्या जप्त केलेल्या मोटारी, पाईप पुन्हा शेतकऱ्यांना परत द्यावेत. शेतकऱ्यांना दिवसातून चार तास वीज कनेक्‍शन देऊन पाणी उपसा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जर प्रशासनाला कृषीपंपावर कारवाई करायची होती तर फक्‍त शिरूर तालुक्‍याच्या बाजूच्या मोटारींवर कारवाई का केली, असा सवाल बाजार समिती सभापती दसगुडे यांनी केला. पारनेर तालुक्‍याच्या बाजूने घोडनदीतील कोल्हापुरी बंधाऱ्यातून तीनशे ते चारशे मोटारी पाणी उपसा करत आहेत. त्यांची संख्या शिरूरपेक्षा मोठी आहे. त्यांच्यावर कारवाई करणे महत्त्वाचे आहे. परंतु शिरूरच्या बाजूने कारवाई का केली, याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यापुढील काळात पुन्हा शेतकऱ्यांच्या मोटारी, पाईप, यावर कारवाई करून त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला तर शेतकरी शिरूर घोडनदी बंधाऱ्यामध्ये उतरून शेतकरी जलसमाधीसारखे आंदोलन करणार आहेत. या प्रकारची कारवाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)