सुशील, साक्षी यांच्यावर भारताची मदार 

कुस्तीत पदकासाठी बजरंग, विनेश यांना संधी

जकार्ता: दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा सुशीलकुमार आणि रिओ ऑलिम्पिक कांस्यविजेती साक्षी मलिक या अव्वल कुस्तीगिरांना आशियाई क्रीडास्पर्धेतील उद्या (रविवार) सुरू होत असलेल्या कुस्ती स्पर्धेत आपला दर्जा सिद्ध करावा लागणार आहे. तर त्याच वेळी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट या गुणवान युवा कुस्तीगिरांवर भारताची कुस्तीतील पदकांसाठी मोठी मदार आहे. गेल्या इंचेऑन आशियाई स्पर्धेत भारतीय कुस्तीगिरांना पाच पदकांवर समाधान मानावे लागले होते. तर योगेश्‍वर दत्तने भारतासाटी एकमेव सुवर्णपदक जिंकले होते. परंतु या वेळी भारतीय कुस्तीगीर निश्‍चितच सरस कामगिरी करतील आणि अधिक पदकेही कमावतील, असा विश्‍वास भारताचे फ्रीस्टाईल प्रशिक्षक जगमिंदर यांनी व्यक्‍त केला आहे.

-Ads-

रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या साक्षी मलिकला आशियाई स्पर्धेत पहिल्या पदकाची संधी आहे. साक्षीला गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पुरुष व महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारातील स्पर्धा उद्या (रविवार) सुरू होत असून भारताच्या सहापैकी पाच कुस्तीगिरांना उद्या पहिली फेरी खेळावी लागणार असून बजरंग पुनियाला पहिल्या फेरीत उझबेकिस्तानच्या सिरोजिदिन खासानोव्हशी लढत द्यावी लागेल.

बजरंगने गेल्या काही दिवसांत सलग तीन सुवर्णपदके पटकावली आहेत. त्याने प्रथम गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णाची कमाई केली. त्यानंतर बिलिसी ग्रां प्री स्पर्धेत आणि मग इस्तंबूल येथील यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने सोनेरी यश मिळविले. त्याउलट दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशीलला बिलिसी ग्रां प्री स्पर्धेतील पहिलीच लढत गमगावी लागली होती. गेल्या चार वर्षांत सुशीलचा हा पहिलाच पराभव ठरला.

ग्रीको-रोमन प्रकारातील सामने सोमवारी सुरू होत आहेत. या प्रकारात 87 किलो गटातील हरप्रीत सिंग हे भारताचे पदकासाठी सर्वोत्तम आशास्थान असल्याचे ग्रीको-रोमन प्रशिक्षक कुलदीप सिंग यांनी सांगितले. महिला गटात जपानची युकी आयरी ही अव्वल प्रतिस्पर्धी दुसऱ्या बाजूला असल्याने राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या विनेश फोगटला पदकाची सर्वोत्तम संधी असली, तरी रिओ ऑलिम्पिकमध्ये जिच्याविरुद्ध विनेशला दुखापत होऊन पराभव पत्करावा लागला होता, ती चीनची सुन यानन विनेशच्याच ड्रॉमध्ये आहे. पिंकीलाही उपान्त्य फेरी गाठण्याची संधी असून सर्वोत्तम कामगिरी केल्यास ती पदकही मिळवू शकते.

भारतीय कुस्ती संघ- 
पुरुष फ्रीस्टाईल संघ- संदीप तोमर (57 किलो), बजरंग पुनिया (65 किलो), सुशील कुमार (74 किलो), पवन कुमार (86 किलो), मौसम खत्री (97 किलो) व सुमित मलित (125 किलो),
पुरुष ग्रीको-रोमन संघ- ग्यानेंदर (59 किलो), मनीष (67 किलो), गुरप्रीत सिंग (77 किलो), हरप्रीत सिंग (87 किलो), हरदीप सिंग (97 किलो) व नवीन (130 किलो),
महिला फ्रीस्टाईल संघ- साक्षी मलिक (62 किलो), विनेश फोगट (50 किलो), पिंकी जाग्रा (53 किलो), पूजा धांडा (57 किलो), दिव्या काकरन (68 किलो) व किरण (72 किलो).

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)