सुशिल कुमारचा धक्‍कादायक पराभव

बजरंग पुनियाचा विजयासह उपान्त्य फेरीत प्रवेश

जकार्ता: भारताचा आघाडीचा मल्ल सुशिल कुमारयाला आपल्याच पहिल्या सामन्यात बहरिनच्या अदाम बातोरोव्हकडून पराभूत व्हावे लागल्याने पात्रता फेरीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले असून दुसरा मल्ल बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटामध्ये आशिया क्रीडा स्पर्धेत दमदार सुरुवात केली असून पहिल्याच लढतीत बजरंगने 65 किलो वजनीगटात विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्‍चीत केला होता. यावेळी त्याने 65 किलो वजनी गटात आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. तर उपान्त्य फेरीतही त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा एकतर्फी पराभव करत अंतीम फेरी गाठुन भारताचे पदक निश्‍चीत केले.

-Ads-

बजरंगने पहिल्याच लढतीत सुंदर खेळ केला. खेळातील तांत्रिक गोष्टी त्याने घोटवून घेतल्या होत्या आणि तेच या सामन्यात पाहायला मिळाले त्यामुळे बजरंगने पिछाडी भरुन काढत उझबेगिस्तानच्या मल्लावर 13-3 अशी मात करत पुढील फेरीत प्रवेश केला. आपल्या चतुर आणि आक्रमक खेळाने बजरंगने पहिल्या लढतीत विजय मिळवला. तर उपान्त्य फेरीत बजरंगने मंगोलियाच्या प्रतिस्पर्ध्यावर 10-0 ने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बजरंगच्या या विजयासह एशियाड खेळांमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्‍चीत झालं आहे.

बहारिनचा प्रतिस्पर्धी मल्ल ऍडम बतिरोव्हने सुशीलवर 5-3 ने मात करत सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात सुरुवातीला 2-0 आघाडी घेतल्यानंतर केलेला बचावात्मक खेळ सुशीलला चांगलाच महागात पडला आहे. आता ऍडम बतिरोव्ह अंतिम फेरीत पोहचला असता तर सुशीलला रेपीचाच प्रकारात कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी मिळणार होती. मात्र, पहिल्या फेरीत सुशील कुमारवर मात करणाऱ्या ऍडम बतिरोव्हला उपांत्य फेरीत जपानच्या युही फुजीनामीकडून पराभव स्विकारावा लागला. यामुळे सुशील कुमारची रेपिचाजची संधी हुकली. तर 86 किलो वजनी गटात भारताच्या पवन कुमारची कंबोडियाच्या हेंग वुथीवर 8- 0 ने मात करत पुढील फेरीत प्रवेश निश्‍चीत केला आहे.

यावेळी 57 किलो वजनी गटात संदीप तोमरला पराभवाचा सामना करावा लागला आहे. संदीप तोमर इराणच्या रेझा अत्रीकडून पराभूत झाला असून रेझाने संदीपची झुंज मोडून काढत 15-9 अशा फरकाने सामना जिंकला. रेझा अत्री अंतिम फेरीत गेल्यास रेपिचाज प्रकारात संदीपला कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)