सुशिलकुमार मोदींचा एक हजार कोटींचा घोटाळा

नितीशकुमारांनी आता कारवाई करावी

पाटणा – बिहारचे उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांनी सन 2005 ते 2010 या काळात एका स्वयंसेवी संस्थेमार्फत तब्बल एक हजार कोटी रूपयांचा घोटाळा केला असून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणी नितीशकुमार यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. या घोटाळ्यात सुशिलकुमार मोदींचा थेट हात आहे असा दावाहीं त्यांनी केला आहे.

येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, बिहारचे अर्थमंत्री असताना त्यांनी हा घोटाळा केला असून त्यांनी स्वयंसेवी संस्थे मार्फत त्यांना मिळालेला निधी खासगी खात्यात वर्ग केला आहे त्याविषयीचे सज्जड पुरावे उपलब्ध आहेत. भ्रष्टाचाराच्या विषयी झिरो टॉलरन्सची भूमिका घेणाऱ्या नितीशकुमार यांनी त्यांना आता तात्काळ बडतर्फ करून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. चारा घोटाळ्यापेक्षा हा घोटाळा मोठा असून त्यात केवळ सुशिलकुमार मोदी हे एकटेच नव्हे तर भाजपचे खासदार अश्‍विनकुमार चौबे, माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन, मनोज तिवारी हे अन्य नेतेही सामिल आहेत.

या सर्वांच्या सहभागाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. याच सुशिलकुमारांना आता नितीशकुमारांनी अर्थमंत्री केले आहे. या घोटाळ्याची राज्याच्या यंत्रणेकडून सध्या चौकशी सुरू आहे पण त्यावर आपला विश्‍वास नाही असे नमूद करून लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालून निष्पक्ष चौकशीचा आदेश दिला पाहिजे. मुख्यमंत्री शहरी विकास योजनेतील विविध खात्यांचा 700 कोटी रूपयांचा निधी एकट्या भागलपूर जिल्ह्यातून अन्यत्र वळवण्यात आला आहे. ही बाब राज्य सरकारच्याच एसआयटीने मान्य केली आहे. केवळ तीन दिवसांच्या चौकशीत इतका मोठा निधी उघड झाला असून हा आकडा आता एक हजार कोटींपेक्षाहीं मोठा असू शकतो असे ते म्हणाले. या प्रकरणी गेल्या मंगळावारी एक गुन्हा दाखल झाला आहे. आणखी दोन गुन्हे बुधवारी दाखल झाल्याकडेही लालूप्रसाद यादव यांनी पत्रकारांचे लक्ष वेधेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)