सुरेश साधले यांनी उलगडल्या वाडेकरांच्या आठवणी

सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) –
अजित वाडेकर यांच्या निधनाची बातमी कानावर आली आणि धक्काच बसला. विश्वास बसत नव्हता. साताऱ्याचे ज्येष्ठ क्रीडा संघटक सुरेश साधले प्रभात जवळ आपल्या आठवणी उलगडत होते.1965 ची साताऱ्यातील रणजी मॅच किंवा 1981 चा कराड येथील बाळू गुप्ते गौरव निधी यामध्ये वाडेकर यांनी शैलीदार फलंदाजी केली होती साताऱ्यातील रणजी ट्रॉफीचा निधी बाबू टांगेवाला याला देण्यात आला होता. सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी अजित वाडेकर यांचे उत्तम संबंध होते. संघटनेचे सचिव सुरेश महाजनी यांच्याशी त्यांचा उत्तम स्नेह होता. या वयातही त्यांचं बोलणं खरं ठरत होतं. या वयातही ते खेळाडू आणि खेळाची पारख उत्तम होती. त्यामध्ये मुंबईचा खडूसपणाही होताच. त्यामुळेच त्यांचं निधन चटका लावून जाणारं होतं. खरं तर वाडेकर यांनी भारताला परदेशात क्रिकेट मालिका जिंकायला शिकवलंत. त्यापूर्वी सामना अनिर्णित राखणे, हा आपल्यासाठी विजयासारखा होता. वेस्ट इंडिजमध्ये त्यांनी सुनील गावस्कर यांचावर विश्वास ठेवला आणि इतिहास रचला गेला. त्यांनीच सचिन तेंडुलकरला न्यूझीलंडमध्ये सलामीवीर म्हणून उतरवलं आणि एक महान क्रिकेटपटू पाहायला मिळाला. अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील. एक खेळाडू म्हणून वाडेकर क्‍लासिक होते, आक्रमक होते. स्लिपमध्ये कॅच पकडण्यात त्यांचा हातखंडा होता. एक कर्णधार म्हणून तर त्यांची तुलना होऊ शकत नाही, पण एक माणूस म्हणून ते ग्रेट होते. कोणत्याही कार्यक्रमात भेटल्यावर, काय रे, कसा आहेस असे चेहऱ्यावर स्मित ठेवून विचारायचे. आजचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले खेळाडू एवढा माज दाखवतात, पण त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असायचे. म्हणून बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित कायम राहायचे. देखल्या देवा दंडवत, असं कधीच ते वागले नाहीत. खरंतर त्यांच्यापुढे आम्ही कोण होतो, पण समोरच्याच वय कितीही असलं, तो आपल्या नातवाच्या वयाचा असला तरी ते त्याचा सन्मान करायचे. कधी कुणाला तुम्ही उडवून लावलं नाही. त्यांनी बऱ्याच गोष्टी, किस्से आम्हाला सांगितले. हे आमचं एक भाग्यच होतं. बरीच गुपित त्यांनी उलगडली. एकदा समोरच्यावर विश्वास बसला की वाडेकर आपल्या आठवणींचा खजिना त्याच्यापुढे रिता करायचे. बऱ्याच गोष्टी त्यांनी, कुणाला सांगू नकोस या विश्वासवर सांगितल्या. तापलेल्या तव्यावर खेकडा टाकल्यावर त्याचा आवाज कसा येतो, हे वाडेकर यांच्याकडून ऐकण्यात गंम्मत होती. वाडेकर खवय्ये होते. कोणता पदार्थ कधी खावा, कसा खवा, कधी खाऊ नये, याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्याचबरोबर काही गोष्टींमध्ये त्यांची शिस्त कमालीची होती. वय वर्ष 76 त्यांनी पॅड लावले. आणि थेट शिवाजी पार्कच्या मैदानात उतरले, तेव्हा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आमच्या पिढीला तुमची फलंदाजी पाहता आली नव्हती, ती इच्छा तुम्ही गेल्या वर्षी पूर्ण केली होती. 23 डिसेंबर 2017, हा तो दिवस होता. वाडेकर यांनी ज्यापद्धतीने गार्ड घेतला, ते पाहून त्यांची फलंदाजी कशी असेल याचा अंदाज आला. त्यामुळेच जेव्हा वाडेकर यांचा आयुष्याचा डाव संपला हे समजलं तेव्हा जीवनाला चटका बसला. पण जोपर्यंत क्रिकेटचा विषय निघेल तेव्हा वाडेकर यांची आठवण आल्यावाचून राहणार नाही. वाडेकरांशिवाय भारतीय क्रिकेटला पूर्णत्व मिळू शकत नाही, हे अंतिम सत्य आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)