सुरेश धस यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते माजी मंत्री सुरेश धस यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टीत सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादीने निलंबित केले आहे. त्यामुळे ते आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. आता खुद्द पंकजा मुंडेंनीच सुरेश धस यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते भाजपसोबत काम करायला इच्छूक असल्याचा दावाही पंकजा मुंडे यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आष्टी इथे सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंनीही हजेरी लावली. सुरेश धस हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी दिवसभर चर्चा असतानाच पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रवेशाची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये असे सांगितले.
आपल्या भाजप प्रवेशावर जुन्या पक्षातीलच तथाकथित नेते हे तारखा सांगत सुटले आहेत, असे म्हणत सुरेश धस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आपल्यावर जे आरोप करत आहेत, त्यांना योग्य वेळी त्यांच्याच शैलीत उत्तर देऊ, असेही सुरेश धस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)