सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी बैठकांचे सत्र

पिंपरी – गेली दोन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहराला भेडसावणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्‍नांवर महापालिकेत आता लोकप्रतिनिधींच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात तरी पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत, याकरिता भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर व पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी (दि. 29) निगडी येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात बैठक घेतली. काही दिवसांपुर्वी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यालयात याच विषयावर बैठक घेतली होती.

या बैठकीत शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पाण्याचा पुरवठा कमी का होतो, याची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पाणी सोडणारे कर्मचारी आणि अधिकारी पाण्याचे योग्य नियोजन करून पुरवठा करत नसल्यास अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच सणासुदीच्या काळात संपूर्ण शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी स्वतः आयुक्तांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना जगताप यांनी या बैठकीत दिल्या.
दोन तास चाललेल्या या बैठकीत आमदार जगताप यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. पवना धरणात पुरेसे पाणी असूनही पिंपरी-चिंचवड शहराला अनियमित पाणीपुरवठा का होत आहे?, असा सवाल त्यांनी आयुक्त हर्डीकर व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केला. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी नगरसेवकांना त्रास होत असेल, तर आयुक्त म्हणून आपण स्वतः त्याची तातडीने दखल घेणे आवश्‍यक आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यायला हवी. त्याचे पूर्वनियोजन करणे गरजेचे होते. परंतु, प्रशासन कोठे तरी कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवना, आंद्रा तसेच भामा-आसखेड धरणातून मंजूर झालेला सुमारे 149 दशलक्ष घनमीटर पाण्याचा कोटा पिंपरी-चिंचवड शहरात आणण्याच्या उद्देशाने प्रशासनाने तातडीने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्याचा आदेश त्यांनी आयुक्तांना दिले. तसेच 24 तास पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काही समाजकंटक खंडणी मागून खोदकामात अडथळा आणत आहेत. असा प्रकार पुन्हा घडल्यास संबंधित समाजकंटकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासही आमदार जगताप यांनी सूचना केल्या.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम, रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्यासह या विभागाचे सर्व अभियंते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)